पुण्यात डेंग्यू (Dengue) , मलेरियाने अनेकजण हैराण झाले आहेत. आतापर्यंत 6 जणांना डेंग्यूमुळे जीवही गमवावा लागला आहे. पावसाने डासांची उत्पत्ती वाढली आणि त्यातून डेंग्यूही (Dengue) वाढला. डेंग्यूवर (Dengue) थेट उपचार नाहीत. चांगली प्रतिकारशक्ती असणे, डास होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणे हाच यावरील उपाय आहे. त्यामुळे सगळ्यांनी प्रयत्न केल्यास डास नक्कीच कमी होऊ शकतील आणि स्वतःबरोबरच शहरातील सगळ्यांचे आरोग्य सांभाळण्यास मदतही होऊ शकेल. त्यामुळे डेंग्यूविरोधात (Dengue) सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.
– डॉ. संजीव वावरे सहाय्यक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका
डेंग्यूची (Dengue) लक्षणे
ताप, डोके दुखणे, सांधे दुखणे, उलट्या, मळमळ
डोळ्यांच्या खोबणीत दुखते, हे डेंग्यूचे (Dengue) वैशिष्ट्य आहे.
धोक्याची लक्षणे
अंगावर लाल पुरळ येणे.
शरीराच्या कोणत्याही भागातून उदा.- हिरड्या, नाक आदी, रक्तस्राव होणे.
डेंग्यूचे (Dengue) प्रकार
डेंग्यूचे (Dengue) दोन प्रकार पडतात. ज्यामध्ये पहिला प्रकार हा साधा डेंग्यू (Dengue) असतो तर दुसरा प्रकार हा जीवघेणा ठरू शकतो.
पहिला प्रकार : फिव्हर (Dengue) डेंग्यू ः यामध्ये सामान्य व्हायरल फिव्हरसारखा ताप येतो. डोकेदुखी, अंगदुखी ही लक्षणे दिसतात.
दुसरा प्रकार ः या प्रकारात परत दोन प्रकार पडतात. ते म्हणजे डेंग्यू (Dengue) शॉक सिंड्रोम व डेंग्यू (Dengue) हेमोरेजिक फिवर. हे डेंग्यू (Dengue) अधिक धोकादायक असतात.
उपचार, तपासण्या
ताप आल्यावर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
प्राथमिक स्वरूपाची लक्षणे दिसल्यावर लगेच लॅब टेस्ट करून घ्या.
डेंग्यूसाठी (Dengue) एन एस वन ही तपासणी केली जाते. पण त्यावरून खात्रीने डेंग्यू झाला की नाही हे सांगता येत नाही. फक्त अंदाज येऊ शकतो.
संशयित रुग्ण कळू शकतो. ही टेस्ट केल्यानंतर एनआयव्हीकडे रिपोर्ट पाठवला जातो. त्यांच्याकडून डेंग्यू (Dengue) आहे की नाही, हे खात्रीशीररीत्या समजू शकते. आतापर्यंत पुण्यात 2,300 संशयित रुग्ण आढळले. त्यातील 160 जणांना डेंग्यू (Dengue) झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.
सध्या डेंग्यूच्या (Dengue) रुग्ण वाढत आहेत. यावर थेट उपचार नसल्याने हा आजार धोकादायक आहे.
आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नयेत, यासाठी काळजी घेणे चांगले, असे म्हटले जाते. डेंग्यूच्या (Dengue) बाबतीत हे अगदी सत्य आहे. डेंग्यू (Dengue) डासांमुळे होतो. डास होऊ न देण्याची व झाल्यास तातडीने नष्ट करण्याची जबाबदारी प्रत्येक घरात, सोसायटीत घेतली गेली तर डास होणारच नाहीत.
डेंग्यूचे (Dengue) डास हे स्वच्छ पाण्यात अंडी देतात. त्यामुळे पावसाचे पाणी हे त्यांच्या वाढीसाठी आदर्श असते. साधारणतः जून ते ऑक्टोबर हा काळ त्यांचा अंडी देण्याचा व वाढीचा असतो. त्यामुळे कुठेही पाणी साठू न देणे विशेषतः पावसाचे पाणी साठू न देणे महत्त्वाचे आहे.
डासाला अंडी घालायला पाच मिली पाणीही पुरेसे असते. म्हणजे बाटलीच्या एखाद्या छोट्या झाकणात साठेल इतक्या पाण्यातही ते अंडी घालू शकतात. पावसाचे पाणी सुमारे 4-5 दिवस डासांना अंडी घालण्यासाठी व वाढण्यासाठी पोषक असते. त्यामुळे थोडेसुद्धा पाणी साठणार नाही याची काळजी घ्या.
डेंग्यूची (Dengue) लक्षणे, उपचारही समजून घेतले पाहिजेत.
डास निर्माण होण्याची ठिकाणे :
कुंडी, मनीप्लॅटमध्ये साठू शकते.
कुंडीखालील प्लेटमध्ये पाणी साठते.
फ्रिज व एअरकंडिशन यांच्यामागील ट्रेमधील पाणी सतत बदलावे.
छपरातील पाण्याची जाळी सतत तपासावी.
ड्रम, बॅरल, कॅन यांना झाकण लावावे व या वस्तू दर दोन-तीन दिवसांनी धुवून कोरड्या कराव्यात.
ड्रेनेजवर जाळीचे झाकण लावावे
पाणी सतत वाहते ठेवणे
भंगार साहित्य टेरेस व सोसायटीच्या परिसरात ठेवू नये.
निरूपयोगी वस्तूमध्ये पावसाचे पाणी साठत असल्याचे या वस्तूची विल्हेवाट लावावी.
टाक्या, हौद, रांजण यावर नेहमी झाकण ठेवावे.
घराबाहेर जाताना घरात साठवलेले पाणी झाकून ठेवावे.
ऍनाफिलीस डास जनावरांनादेखील चावतो. त्यामुळे गायी-म्हैस यांच्या गोठ्यातील पाणी सतत बदलावे.
फरक-साम्य डेंग्यू- (Dengue) चिकुनगुनिया, मलेरिया-हिवतापमधील
डेंग्यू- (Dengue) चिकुनगुनिया
कारणीभूत डास – एडिस इजिप्ती
दिवसा चावतात.
उपचार- विषाणूजन्य आजार असल्याने निश्चित उपचार नाहीत. रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवर उपचार ठरतो.
मलेरिया – हिवताप
कारणीभूत डास ः ऍनॉफिलीस
हे डास रात्री चावतात.
उपचार आहेत. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू होऊ शकतो. तसेच उपचार अर्धवट सोडल्यास कालांतराने पुन्हा आजाराची लागण होऊ शकते.
थेट उपचार नाहीत
डेंग्यू (Dengue) हा विषाणूजन्य आजार आहे. आपल्या होणाऱ्या जीवाणूजन्य आजारांवर उपचार आहेत. पण, विषाणूजन्य आजारांवर नाहीत. त्यामुळे डेंग्यू (Dengue) अधिक अवघड होऊन बसतो. पण, डॉक्टर रुग्णाच्या प्रकृतीला सहाय्यक ठरतील असे उपचार देत असतात.
प्रतिकारशक्ती महत्त्वाची
ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, अशा व्यक्ती या आजारातून लवकर बाहेर पडतात. प्रतिकारशक्ती चांगली असल्यावर इतरही अनेक आजार होत नाहीत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य आहार, व्यायाम याकडे लक्ष दिले पाहिजे.
कोण ठरू शकते लवकर बळी?
ज्या व्यक्तींमध्ये विविध कारणांनी प्रतिकारशक्ती कमी झाली आहे, ते लवकर बळी ठरू शकतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, कीडनीचे आजार, लिव्हरचे आजार असे आजार असणाऱ्यांनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.
डास होऊ न देणे हाच उपाय
डास निर्माण न होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या डासांची अंडी स्वच्छ पाण्यात असतात. त्यामुळे ते साठू नये याची काळजी घेतली पाहिजे.
धूरफवारणी का होत नाही?
धूरफवारणीने डास जातात, त्यामुळे ती शहरात करावी असे अनेकांना वाटते. पण, या धूरफवारणीमुळे पर्यावरणाचे नुकसान होते. त्यामुळे ती सरसकट करता येत नाही. त्यामुळे जिथे डेंग्यू, (Dengue) मलेरिया, चिकुनगुनिया तापाचा रुग्ण आढळतो, त्याच भागात ती केली जाते.
पाण्यात घाला रसायने
टेमिफॉस हे रसायन महापालिकेतर्फे उपलब्ध करून दिले जाते. त्याचा नागरिकांनी वापर करावा. पाण्यात तेलाचे थेंब टाकल्यास तवंग येतो व डासाच्या आळ्यांना ऑक्सिजन मिळत नाही. हाही उपाय सांगता येईल. पण, हे सांगितल्यास पाणी साठले तरी चालेल असे नागरिकांना वाटू शकते. त्यामुळे मुळात पाणी साठणारच नाही, यासाठीच काळजी घ्या.
शहरात डेंग्यूचे (Dengue) प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रयत्न चालू आहेत. नागरिक जितके जास्त सहकार्य करतील, तितक्या जास्त प्रमाणात हा आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. नागरिकांनी घरात, सोसायटीत कोणत्याही प्रकारे पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. भंगार पडू देऊ नये. कारण टायर, भंगारातील वस्तू आदी ठिकाणी पाणी साठून डासांची निर्मिती होते.
डासांपासून होणारे आजार हे घरात, सोसायटीत जितकी स्वच्छता ठेवू, तितके नियंत्रित राहतील. सोसायटीत पाणी साठू नये, यासाठी जनजागृती अभियान करत आहोतच. त्याचबरोबर ज्या सोसायटीत अशाप्रकारे साठलेले पाणी दिसेल, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात येते. आतापर्यंत विविध सोसायट्यांकडून एक लाख 46 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
– डॉ. एस. टी. परदेशी
आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका