काही कारणांमुळे बंदी घालण्यात आलेली तब्बल 439 औषधे अजूनही बाजारात विक्रीसाठी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बंदी घालण्यात आली असूनही विविध कारणांमुळे काही औषधे मेडिकल स्टोअरमध्ये मिळत असल्याचे म्हंटले आहे. यामध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे ही औषधे विक्रीस उपलब्ध असल्याचेही सांगितले जात आहे.
कोरेक्स, फेनसेडील या औषधांसह इतर 439 औषधे बाजारात उपलब्ध आहेत. यासंदर्भात माहिती देताना रसायन व खते मंत्री अनंत कुमार यांनी लोकसभेत या विषयावर चर्चा केली आहे. केंद्रीय औषध नियंत्रण संस्थेने या बंदी घालण्यात आलेल्या औषधांचे नमुने तपासून त्यावर बंदी घातली होती, परंतु संबंधित कंपन्या या विषयावर न्यायालयात गेल्या आणि त्यांनी न्यायालयाकडून स्वतंत्रपणे परवानगी मिळवली असल्याने त्यांची विक्री सुरू आहे.
न्यायालयानेच यामध्ये हस्तक्षेप केला असल्याने सरकारला या औषधांच्या विक्रीची परवानगी देणे भाग पडले. केंद्रीय औषध नियंत्रण संस्था ही अशी संस्था आहे की, ती परदेशातील कोणत्या शिफारशींचा विचार न करता स्वतंत्रपणे अहवाल देणारी संस्था आहे. इतरांनी औषधाविषयी घालून दिलेले नियम आम्ही आंधळेपणाने मान्य करू शकत नाही.
त्यासाठी आपल्या देशात असलेल्या कायद्यानुसारच या औषधांवर बंदी घातली होती, असे केंद्रीय औषध नियंत्रण संस्थेने म्हंटले आहे. आपल्याकडे असलेल्या कायद्यानुसार या औषधांवर बंदी असतानाही जर ही औषधे विकली जात असतील तर राज्य सरकार त्यांच्यावर कारवाई करू शकते असेही या संस्थेने म्हंटले आहे.