Baby Food – बरीच बाळे पाणी प्यायला का कू करतात. एक ते दोन वर्षे वयाच्या बाळांनी दिवसभरात साधारण आठशे मि.ली. ते एक लिटर पाणी व द्रवपदार्थ आहारात घेतले पाहिजेत. यासाठी आहारात ताक, नारळपाणी, सूप्स यांचा समावेश करावा.
जेवणाआधी हे द्रवपदार्थ देणे टाळावे. यामुळे आधीच पोट भरते आणि बाळे खायला कुरकुर करतात. याउलट जेवणानंतर पाणी प्यायला देताना पाण्यात थोडे लिंबू पिळावे (3-4 थेंब). यामुळे क जीवनसत्व पोटात जाऊन आहारातील लोहाचे शोषण होण्यास मदत होते.
बाळांच्या पोटाचा आकार लहान असतो. त्यामुळे एकावेळेला बाळे थोडेच खातात. मग हे थोडेच अन्न पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असायला हवे! बाळाच्या आहारात विकतचे, गोडाचे व तळलेले पदार्थ टाळा. खूप मसालेदार, तिखट आणि खारट पदार्थही बाळाला देऊ नका.
बाळाला एखादी भाजी आवडली नाही तर पुन्हा थोड्या दिवसांनी देऊन बघा किंवा त्या भाजीचे सूप/पराठा देऊन बघा.
त्या भाजीचे महत्व सांगा. एखादे गमतीदार उदाहरण द्या. उदा. गाजर खाल्ले की डोळे छान होतात! पालकाची हिरवीगार भाजी खाल्ली की रक्त लालेलाल होते! पोळीबरोबर जॅम, सॉस असे पदार्थ देणे कटाक्षाने टाळा.
खाण्याविषयीच्या आवडी-निवडी लहान वयातच तयार होतात. आणि त्याला खतपाणी घातले तर बाळे मोठी झाल्यानंतरदेखील काही विशिष्ट पदार्थ खाणे टाळतात किंवा अतिप्रमाणात खातात. याचे आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात. उदा. काही बाळांना दूध खूप आवडते. अशी बाळे मग सारखेच दूध मागतात किंवा दूध-पोळी, दूध-भात खातात.
पण दिवसभरात चारशे मिली पेक्षा जास्त दूध बाळाला देणे चांगले नाही. यामुळे लोहाची कमतरता व रक्तक्षय होण्याची शक्यता असते. याऊलट काही बाळांना दूध आजिबात आवडत नाही. अशी बाळे शाकाहारी असतील आणि आहाराचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर अशा बाळांमध्ये कॅल्शियम, जीवनसत्व ब- व जीवनसत्व ड, प्रथिने यांची कमतरता भासू शकते.
मधल्या वेळेच्या खाण्यासाठी बऱ्याचदा मुलांना बिस्कीटे, केक, चिप्स, कुरकुरे, चिवडा, बाकरवडी असे पदार्थ दिले जातात. हे टाळा. यावेळेला देण्यासाठी फळे, सुकामेवा, उकडलेले अंडे, चीजचा तुकडा, शेंगदाण्याचा लाडू हे पोषक पर्याय आहेत.
बाळांसाठी खाण्यापिण्याची एक दिनचर्या ठेवा, ठराविक वेळेला खायला द्या (आजारपणात हा दिनक्रम बदलू शकतो.). यामुळे बाळाच्या शरीराला एक प्रकारची शिस्त लागेल, सारखे चरणे टळेल, ठराविक वेळेला भूक लागेल आणि बाळाचे वजनही योग्य प्रकारे वाढेल. दोन जेवणांमध्ये कमीतकमी ते तासांचे अंतर ठेवा. या काळात काहीही खायला देऊ नका. जेवणाच्या वेळेच्या आधी खाल्लेले एखादे बिस्कीट किंवा चॉकलेटदेखील बाळाची भूक मारू शकते हे लक्षात ठेवा.
बाळाला एका जागी बसून खाण्याची सवय लावा. घरभर त्याच्या मागे पळत भरवू नका. जेवताना टी.व्ही., मोबाईल पूर्णपणे टाळा. या वेळात बाळाशी गप्पा मारून, बाळाला गोष्टी सांगून जेवणाची वेळ आनंददायी करा. यामुळे रडरड, चिडचिड न होता जेवण कधी संपले ते कळणार देखील नाही.
साधारण दीड वर्षानंतर मुले स्वतःच्या हाताने खाण्याचा प्रयत्न करतात. प्रथम बोटांच्या चिमटीत पदार्थ पकडून खायला शिकतात आणि मग चमच्याचा वापर करायचा प्रयत्न करतात. हे करताना बऱ्याचदा सांड-लवंड होते आणि आयांची चिडचिड होते! पण यातून बाळे शिकत असतात.
स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे बाळांना स्वतःच्या हाताने खायला प्रोत्साहन द्या. त्यातल्या त्यात हाताने खायला सोपे आणि फारशी सांडलवंड होणार नाही असे पदार्थ उदा. पोळी/भाकरी/थालिपीठ/पराठा/डोसा/धिरडी/इडली/फळे यांचे लहान लहान तुकडे करून द्या. चमच्याने खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाळांना एका छोट्या वाटीत डाळिंबाचे दाणे, चुरमुरे, ज्वारीच्या किंवा साळीच्या लाह्या देता येतील. चमचा देखील जरा छोट्या आकाराचा आणि थोडा खोलगट असावा. बाळाबरोबर तुम्ही देखील वाटी चमचा घेऊन खायला बसा. तुमचे बघून बाळ लवकरच शिकेल. बऱ्याचदा बाळाला आधी खायला घालून मग बाकीचे जेवायला बसतात. पण सर्वांच्या जेवायच्या वेळेतच बाळालाही जेवायला बसवा.
आपल्या बाळाची दुसऱ्या बाळांशी तुलना करू नका. प्रत्येक बाळाची भूक, खाण्याचे प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे त्या बाळाने पोळी पूर्ण खाल्ली आणि तू कशी खात नाही असे प्रश्न विचारू नका. बाळाने खाण्यास नकार दिल्यास आग्रह आणि जबरदस्ती करू नका.
आपले घर म्हणजे हॉटेल नाही याची जाणीव ठेवा आणि ती मुलांनाही करून द्या. एखाद्या दिवशी घरी बाळाच्या नावडीचा पदार्थ असेल, तर त्याच्या आवडीचा दुसरा पदार्थ बनवू नका किंवा बाळ मागेल ते करून देऊ नका. जे सगळ्यांसाठी केले आहे ते बाळालाही खायला द्या. कदाचित बाळ थोडे कमी खाईल. एखाद्या दिवशी बाळाने कमी खाल्ले तरी हरकत नाही. भूक लागल्यावर बाळ आपणहून येऊन जे असेल ते खाईल.
वेळोवेळी बाळांचे कौतुक करा.
जेवण संपवले, भाजी खाल्ली, न सांडता खाल्ले, आपल्या हाताने खाल्ले, नीट चावून चावून खाल्ले, खाताना तोंडाचा आवाज नाही केला की बाळाला शाबासकी द्या. यामुळे बाळांना या सगळ्या चांगल्या सवयी अंगीकारण्याचा नवा उत्साह येईल आणि आपोआपच त्यांचा आहार व आरोग्य सुधारायला मदत होईल.
बऱ्याचदा वाढदिवस, सण-समारंभ, पार्ट्या अशावेळेला बाहेरचे खाणे/गोड खाणे/तळलेले खाणे टाळता येत नाही. शक्यतो वर्षे पूर्ण होईपर्यंत बाळाला असे पदार्थ देणे टाळा. बाळाला घरून खायला घालून न्या किंवा बाळाचा डबा घेऊन जा. वर्षांनंतर कधीतरी थोड्या प्रमाणात असे पदार्थ खायला हरकत नाही. पण अशा पदार्थांचे नियमित सेवन बाळ व पालक दोघांसाठीही वाईटच!
बरेच पालक डॉक्टरांकडे आणि आहारतज्ञांकडे बाळाला भूक वाढण्याचे टॉनिक देण्याचा किंवा सप्लीमेंट्स देण्याचा आग्रह करतात. पण भूक वाढण्यासाठी टॉनिकची नाही तर बाळाने भरपूर खेळण्याची (आणि टी.व्ही./मोबाईल समोर बसून न राहण्याची!) गरज आहे. त्याचबरोबर भूकेच्या वेळी योग्य प्रकारचा पौष्टिक आहार घेतल्यास बाळाला कोणत्याही सप्लिमेंट्सचीदेखील आवश्यकता भासणार नाही.
The post Baby Food : ‘असा’ ठेवा वय एक ते दोन वर्षातील बालकांचा आहार ! appeared first on Dainik Prabhat.