आपला देश स्वतंत्र होऊन 67 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या काळातील भारतीय व्यक्तीचे जीवन, खेड्यातील व लहानमोठ्या शहरातील खूपच साधे होते. आजच्यासारखी जबरदस्त वेगवान, रोज बदलणारी जीवनशैली कोणाच्याच स्वप्नात नव्हती.
गोडधोड खाणे फक्त सणांच्या दिवशी व तेही मर्यादित स्वरूपाचे असायचे. गोडधोड पदार्थात गुळाचा वापर असायचा. बहुतेक घरी सकाळी ज्वारी दुपारी जोंधला रात्री शाळू असा आहार गोरगरीब व श्रीमंतांकरिताही असायचा. ज्वारीला पर्याय म्हणून बाजरीचा वापर असे.
आजकाल सर्वांचेच दैनंदिन जीवन खूपखूप बदलले आहे. आतासारखी रात्रपाळी संस्कृती पूर्वी लोकांच्या स्वप्नातही नव्हती. त्याकाळात घरोघर कंदिलाच्या दिव्यांचा वापर असे. लोकांच्या दैनंदिन जीवनात पूर्वीच्या काळी मोकळा वेळ खूप असे. लोक आपापल्या धार्मिक कार्याकरिता वेळ देत.
आत्ताचे जीवन म्हणजे जेट युग सर्वच क्षेत्रांत आहे. केवळ महानगरे व लहानमोठी शहरेच नव्हे तर खेड्यापाड्यातही कोणीच थांबायला तयार नाही. कोणालाही विश्रांतीकरता सवड नाही. प्रत्येकजण रात्र ही दिवसाप्रमाणे समजून तऱ्हतऱ्हेच्या कामात स्वतःला अधिकाधिक गुंतवून घेत आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे जीवन एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात फसल्यासारखे झाले आहे. त्यामुळे लहानथोरांना, गरीब-श्रीमंतांना, शहरी व ग्रामीण जनतेला नित्य नवनवीन रोगांचा सामना करायला भाग पडते. एक काळ मानवी जीवनात फार थोडे शारीरिक व अल्प प्रमाणात मानसिक रोग होते. आता तुम्हा आम्हांला नित्य नवनवीन रोगांचा सामना करावा लागतो.
एकेकाळी आयुर्वेद ( Ayurveda for healthy health ) य ग्रंथात वाताचे ऐंशी, पित्ताचे चाळीस व कफाचे वीस विकार अशी सामान्यतः रोगांची गणती होती. आता समस्त मानवजातीला ग्रस्त करणाऱ्या रोगांची नावे घरातील बालचमूलाही माहिती आहेत, असे अनेकानेक नव्या रोगांचे सतत आक्रमण चालू आहे. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी तुम्ही आम्ही कधी स्किझोफ्रेनिया, पिसीओडी, पार्किन्सन अशा विकारांची नावे ऐकली नव्हती. आता आपल्या आसपास अशा नवनवीन रोगांचा सामना, सामान्य माणसापासून ते सरकार व वैद्यकीय क्षेत्रातील लहानथोरांना सातत्याने करावा लागत आहे.
माणूस जन्माला आला तेव्हापासून, त्याच्या प्रकृतीच्या तक्रारीकरिता उपचार शोधतोय. त्याला जमेल तसे, मनुष्यमात्राचे आपल्या परिसरात मिळणाऱ्या वस्तूंचे, रोजचे जेवणखाण्यातील पदार्थांचे औषध म्हणून, रोगांवरच्या उपचारांसाठी प्रयोग चालू असतात. कोणी सर्दीकरिता तुळीशीची पाने सुचवील तर दुसरी व्यक्ती मीठ, हळद, गरम पाण्याच्या गुळण्या सांगेल, तापाकरिता पारिजातकाच्या पानांचा काढा तर कोणी लंघनाचा आग्रह धरेल. उलटी थांबण्याकरिता कोणी साळीच्या लाह्या खाईल. तर कोणी आंबा किंवा जांभळाची कोवळी पाने खाऊन बरे होईल.
याचप्रकारे रोग वाढू नये म्हणून काही बंधने पाळली जातात. सर्दी, पडसे, मूळव्याध, त्वचाविकार याकरिता दही चालत नाही.
पोटदुखी विकारात पोहे, चुरमुरे, भडंग, भेळ, मिसळ अपायकारक आहे. तापामध्ये जास्त जेवणाने ताप उतरत नाही. मधुमेहात साखर, भात याबरोबच मीठ कमी केलं तर उतारा पडतो. एक ना अनेक उपचार आहेत. या उपचारांना पैसे पडत नाहीत. दिवसेंदिवस वैद्यक महागडे होत चालले आहेत. डॉक्टर किंवा हॉस्पिटलला भरपूर पैसे द्यायचे, पण समाधान नाही. यातून काही मार्ग निघतो का हे शोधण्याचा प्रयत्न या लेखमालेद्वारे करूया.
कोणतेच वैद्यक निसर्गाला सोडून रोगनिवारणाचे कार्य करू शकणार नाही. याकरिता गेल्या 45 वर्षांच्या वैद्यकीय अनुभवात सुचलेले साधे सोपे सुटसुटीत उपाय दैनंदिन जीवनात उपयुक्त पथ्यकारक, रोग निवारण करणाऱ्या सोप्या उपचारांची थोडक्यात माहिती या लेखमालेत असेल. सर्वसामान्यांच्या जीवनात कुपथ्य, रोग वाढविणारे अहितकारक पदार्थ किंवा वागणुकीतील सवयी यांचा विचार केला जाईल. आपण अनुभवा, चांगला अनुभव आला तर इतरांना सांगा, शंका आली तर जरूर विचारा.
आपल्या राष्ट्राच्या घटनेत सर्वसामान्य माणसाचे रोग निवारण करणे, या मार्गदर्शक तत्त्वातील एक प्रमुख भाग आहे. त्याकरिता आपले मध्यवर्ती व राज्य सरकार काही प्रयत्न करीत असतात. उद्देश चांगले आहेत. पण उपचारांची अंमलबजावणी नीट होत नाही. त्याला कारण आपले आरोग्य मंत्रालय पाश्चात्य विद्याविभूषितांच्या ताब्यात आहे. देश स्वतंत्र झाला. इंग्रज गेले. पण जाताना आमच्या काही पीडितांना इंग्राजाळलेले करून गेले. सर्वसामान्यांच्या रोगांकरिता आपल्या परिसरातच काही उपचार आहेत असा विचारच मंडळींना माहीत नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे बजेट असूनही रोगी, डॉक्टर, सरकार कोणालाच समाधान नाही. त्याकरिता सुजाण समाजाने या लेखमालेतील उपाय वापरून, त्याचा अनुभव घेऊन, शासकांना निसर्गोपचाराची कास धरावायचा आग्रह करावी ही माफक अपेक्षा.