लहानपणापासून प्रत्येक व्यक्तींचे दातांचे आरोग्य थोड्या फार प्रमाणात दुर्लक्षित राहाते. दातांच्या तक्रारी खालील गोष्टींमुळे निर्माण होतात. जेवताना नीट चावून न जेवणे, घाईघाईने जेवणे, जेवणानंतर चूळ न भरता तसेच कामाला लागणे, जेवताना खूप पाणी पिणे. या सर्व गोष्टींमुळे दात, हिरड्या आणि तोंडातील लाळ यांचे आरोग्य बिघडते. हे आरोग्य टिकविण्यासाठी वनौषधी उपयुक्त आहेत. त्याचे अनेक प्रकार आहेत.
दातांची स्वच्छता राखण्यासाठी वनौषधींचा द्राव बनविता येतो त्यासाठी अशा वनौषधी निवडल्या आहेत की ज्यामुळे दात हिरड्यांचे आरोग्य तर सुधारेलच पण लाळेचीही गुणवत्ता वाढेल कारण लाळ हा जीवनरस आहे. तोंडाचे व पोटाचे अनेक विकार ह्या दूषित लाळेमुळे होत असतात.
तोंडाला वास येणे, हिरड्यांमधून रक्त-पू येणे, हिरड्या सुजणे, दात सळसळणे, कमकुवत होणे, दातांवर डाग, गरम किंवा गार पदार्थांमुळे झिंणझिण्या येणे, खूप गोड खाल्ले असता अथवा खूप आंबट खावून दात आंबणे, दाताच्या विकारामुळे तोंडात अल्सर तसेच घशाचे व टॉन्सिलचे विकार ह्या सर्वांसाठी हे दंतमंजन उपयुक्त आहे. हे दंतमंजन करण्याची कृती खालील प्रमाणे…….
स्वस्तिक दंतमंजन :
घटक द्रव्ये : गेरू चूर्ण 600 ग्रॅम, कापूर व तुरटी चूर्ण प्रत्येकी 40 ग्रॅम, सैंधव, हळद, पांढरा कात, बाभूळशेंग, हिरडा, बेहडा, आवळकाठी, बाभूळसाल, जांभूळसाल, बकुळसाल, कडुलिंबसाल, बाभूळशेंग, हिरडा चूर्ण प्रत्येकी 20 ग्रॅम, खैरसाल चूर्ण 100 ग्रॅम.
कृती : प्रथम त्रिफळा व सर्व सालींची चूर्णे एकत्र करावीत. त्यानंतर त्यात हळद, कात व बाभुळशेंग यांची चूर्णे क्रमाने मिसळावीत. नंतर तुरटी व सैंधव यांचे एकत्र मिश्रण वरील चूर्णात मिसळावे . मग हे सर्व मिश्रण गेरू चूर्णाबरोबर मिसळून एकजीव होईपर्यंत घोटावे. सर्वात शेवटी दंतमंजनाच्या डब्या वा पाकिटे भरण्याअगोदर कापूर मिसळावा म्हणजे कापराचा वास उडून जात नाही. चिमुटभर दंतमंजनाने रात्री व सकाळी हिरड्या व दातांना मसाज केल्यासारखे सावकाश मंजन करावे. हिरड्या व कमकुवत दांत, दांतातून रक्त येणे, दात किडणे, सळसळणे, वास येणे यावर उपयुक्त असे हे मंजन आहे.
मयूर दंतमंजन :
घटक द्रव्ये : आघाडा, हळद चूर्ण प्रत्येकी 100 ग्रॅम, सुंठ, मिरे, पिंपळी, कापूर, बाभुळशेंग, दालचिनी, खैरसाल चूर्ण प्रत्येकी 50 ग्रॅम, सोनकाव चूर्ण 300 ग्रॅम, कापूर, तुरटी चूर्ण प्रत्येकी 20 ग्रॅम, हळद ,पांढरा कात, बाभूळशेंग, हिरडा, बेहडा, आवळकाठी, बाभूळसाल, जांभूळसाल, बकुळसाल, कडूलिंबसाल, सैंधव चूर्ण प्रत्येकी 10 ग्रॅम.
कृती : प्रथम सर्व सालींची चूर्णे एकत्रित घोटावीत. नंतर सुंठ, मिरे पिंपळी, दालचिनी, हळद इत्यादि द्रव्ये एकत्र करावीत. त्यानंतर कापूराव्यतिरिक्त सर्व औषधे, गेरूबरोबर एकत्र करून घोटावी. सर्वात शेवटी कापूर मिसळावा व पाकिटे भरून ठेवावीत.
लहान चिमुट मंजनाने दात सकाळी व रात्री घासावेत. किडलेले दात, तोंडाला वास मारणे, पायोरिया यावर उपयुक्त.
या दंतमंजनमध्ये बाभूळ, बकुळ खैर व लोघ्रसाल, डाळिंबसाल, पिळू, गुळवेल, त्रिफळा व ज्येष्ठमध हे समप्रमाणात असतात. काळे मिठामुळे चव खारट होते व गुणवत्ता चांगली येते. हिरड्यांवर 1 ते 2 चिमूट पावडर टाकून (वरच्या हिरड्यांना वरून खाली ओढून मसाज तर खालच्या हिरड्यांवर खालून वर) मसाज करावा. भरपूर पाणी (शक्यतो कोमट) तोंडात घेऊन हे मंजन त्यात खुळखुळ करून मिसळून द्यावे.
आणखीन थोडे जास्त पाणी घेऊन हे वनौषधीचे पाणी तोंडात अर्धा ते एक मिनीट धरून ठेवावे. प्रेशरमुळे हे औषधी पाणी दातांच्या फटीतून व सर्व छीद्रांमधून झिरपून मुरले जाते. नंतर त्यातील अर्धे फेकून देवून अर्ध्या पाण्याने गुळण्या कराव्यात. ह्या अँस्ट्रींजंट पाण्यामुळे घशात असणारा चिकटा सुटून येतो. रोजच्या रोज हा चिकटा निघाल्यास घशाचे, श्वसनाचे रोग होत नाहीत. टॉन्सिल्सचे आरोग्यही सुधारते.
शरीरात जंतू शिरण्यास रोखले जाते प्रथम नाकामध्ये. तिथूनही प्रवेश मिळाला तर हा चिकटा त्यांचा अवरोध करतो व म्हणूनच हा चिकटा रोजच्या रोज बाहेर पडून नवीन चिकटा, अधिक कार्यक्षम असतो, तो तयार होणे आवश्यक असते. प्रदुषणाशी मुकाबला करण्यासाठी दिवसातून दोन वेळा ह्या दंतमंजनाने दात घासून त्यानेच गुळण्या कराव्यात. निसर्गाने दिलेल्या दातांच्या संरक्षण फळ्या मजबूत करण्यासाठी वनौषधींसारखे वरदान नाही.
मुखदुर्गंधीवर वनौषधींचा उपचार :
दात व हिरड्यांचे आरोग्य वनौषधीने उत्तम राखता येते. जीभ तोंडातल्या तोंडात डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे फिरवून वनौषधींच्या गुळण्या करणे व रोज मुखतील चिकटा काढणे तसेच अन्न पचन होण्यासाठी तोंडात घास अतिशय बारीक करणे आवश्यक आहे. रात्रीची मेजवानी टाळावी म्हणजे आम्लपित्त, आमवात व आमांशयाचे तसेच पचनाचे रोग होत नाहीत. ह्याबरोबरच आहारातून उग्र वासांच्या पदार्थांना म्हणजेच चायनीज, मसालेदार पदार्थ शक्यतो वर्ज्य करावेत. शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण ठेवले पाहिजे.
यकृताचे कार्य व्यवस्थित नसेल तर शरीरातील विषांचे उत्सर्जन नीट होत नाही. मग ही द्रव्ये लाळेतून बाहेर पडतात व मुखदुर्गंधी जडते. त्यासाठी रोज रात्री त्रिफळा म्हणजेच आवळा, बेहडा, हिरडा यांचे मिश्रण घ्यावे. तसेच नस्य तेलाने नस्य करावे. ऍरोमाथेरपिची तेले वापरूनही मुखशुद्धीसाठी माऊथ वॉश घरच्या घरी बनवता येतो. तो असा, पाव लिटर पाण्यात 5 थेंब पेपरमिंट तेल 13 थेंब लिंबू तेल व 1 थेब बडिशेप तेल मिसळावे. मिश्रण बंद बाटलीत ठेवावे व दिवसातून 4-5 वेळा गुळण्या कराव्यात. रोज नवीन पाण्याने गुळण्या केल्यास जास्त फायद्याचे.
जर लाळेचे स्त्रवणे कमी प्रमाणावर होत असेल तर अशांना जेवताना सतत पाणी प्यावे लागते. जेवताना वरचेवर पाणी पिण्याची सवय असेल तर लाळेचे स्त्रवणे कमी होत जाते व लाळग्रंथी संकुचित होत जातात. अशा वेळी स्वरयंत्रही कोरडे पडल्यामुळे अशांना वरचेवर कोरडा खोकला येतो. तसेच आवाज खराब होणे, घशात अडकल्याची भावना होणे या तक्रारी निर्माण होतात. जीभ तोंडात डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे फिरविण्याच्या व्यायामाने स्वरयंत्र ओलसर राहून खोकला तर थांबतोच पण आवाजही मधूर होतो.
जठरातील ऍसिड कमी होताच पोटात ऍसिडीटी वाढते ऍसिडीटीचे अनेक पेशंट केवळ ह्या लाळेच्या उपचारांनीच सुधारतात. सकाळी उठल्या उठल्या तोंडात साठणारी लाळही औषधी असून रात्रभर पोटात साठलेल्या ऍसिडीटीचा सामना करु शकते म्हणूनच उठल्या उठल्या ही लाळ व्यायामाने वाढवून पिण्याचे तंत्र हल्ली विकसित झाले आहे. जनावरे आपल्या कित्येक रोगांचा सामना या लाळेच्या औषधाच्या बळावरच करीत असतात.
दुसरा लाळेचा व्यायाम म्हणजे जबड्याची 30-35 वेळा उघडझाप करणे. निदान 10 ते12 वेळा करावी . म्हणजे लाळग्रंथीमधून लाळ सुटते. तसेच तोंडात सुटलेली ही लाळ सर्वत्र जिभेने फिरवावी व खुळखुळ करून वाढवीत राहावे व नंतर हळूहळू गिळावी. कानाच्या खाली जबड्यावर बोटांनी गोलाकार मसाज करावा. काही वेळा इथे दुखत असल्यास समजावे की लाळ ग्रंथी आकुंचित झाल्या आहेत व त्या नीट काम करत नसाव्यात.
तोंडात अन्नाचे बारीक तुकडे होऊन त्यामध्ये लाळेचे द्रावण मिसळ्यावर घास गिळावा. असे जेवल्यास अन्नाची चव वाढणे, कमी अन्न पुरणे, सारखी खा खा बंद होणे, गॅस व अपचन, ऍसिडीटी होणे थांबून वजनही कमी होते असा अनुभव आहे. कारण आहारातील पिष्टमय पदार्थांचे तोंडात पचन झाल्याने त्यांचे फॅट्समध्ये रूपांतर होवून चरबी म्हणून डिपॉझिट होणे थांबते. या लाळेच्या व्यायामामुळे अनेकांची ब्लडशुगर व कोलेस्टेरॉलही कमी झाले आहे. तेंव्हा हे व्यायाम करायला काही हरकत नाही.