अकाचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं. कारण होतं तिच्या अंगाला येणारा दुर्गंध. त्यासाठी अलका संपूर्ण अंगाला परफ्युम वापरायची. तिच्या नवऱ्याला दम्याचा विकार होता. त्याला परफ्युमची ऍलर्जी होती. अलकाला आपल्याच अंगाचा दुर्गंध नकोसा व्हायचा, इतका की तिला आपल्या शरीराचा तिरस्कार वाटायचा. अंगाचा दुर्गंध जावा म्हणून तिने बरेच औषधोपचार केले, पण फायदा झाला नाही. शेवटी नवऱ्याने त्याच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि आता ती अंगाच्या दुर्गंधीपासून पूर्णपणे मुक्त झाली आहे.
अंगाचा दुर्गंध जाण्यासाठी बरेचजण कितीतरी किलोनं परफ्युम वापरतात. डिओडोरंट वापरतात. घाम येऊ नये म्हणून विविध प्रकारची पावडर्स वापरतात. त्यातही आता पुरुषांसाठी वेगळी आणि महिलांसाठी वेगळी परफ्युम आणि पावडरी बाजारात आल्या आहेत. त्याच्या जाहिराती टीव्हीवर तुम्ही बघत असालच.
अंगाला येणाऱ्या घामानं दुर्गंध येतो असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण घामाला तसा कोणताच गंध नसतो. घाम हे काही दुर्गंध येण्याचं महत्त्वाचं कारण नाही. दुर्गंध येतो तो त्वचेवरच्या बॅक्टेरियाचा! त्वचेमधल्या ऍपोक्राईन नावाच्या घामाच्या ग्रंथीवर होणाऱ्या रासायनिक परिणामामुळे येतो. या घामाच्या ग्रंथी काखेमध्ये, जांघेमध्ये आणि स्तनाग्रांवर जास्त प्रमाणात असतात. उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यातसुध्दा काखेमध्ये आणि जांघेमध्ये घाम मोठ्या प्रमाणावर येतो. या भागात केस आधीच जास्त असतात आणि त्यात बनियन किंवा अंडरवेअर घट्ट असते. त्यामुळे घामाचे बाष्पीभवन व्हायला कुठे जागाच नसते. अशा ठिकाणी नैसर्गिकपणे असलेले बॅक्टेरिया मोठ्या संख्येने वाढायला लागतात आणि अंगाला दुर्गंध यायला लागतो.
लहान मुलांच्या आणि वयस्करांच्या अंगाला दुर्गंध का येत नाही? काखेमध्ये घाम बऱ्याच कारणांमुळे येतो. घाबरल्यामुळे, वेदनेमुळे, लैंगिक उत्तेजनामुळे काखेमध्ये घाम येतो. काखेतल्या घामाच्या ग्रंथी वयात आल्यानंतर कार्य करायला लागतात.आणि लैंगिक ग्रंथी कार्यक्षम असेपर्यंत त्याही कार्यक्षम असतात. म्हणून मुलांच्या आणि म्हाताऱ्यांच्या अंगाला दुर्गंध येत नाही. एक्रीन ही एक प्रकारची घामाची ग्रंथी असते. या ग्रंथीतून जो घाम निघतो. त्याला थोडासा गंध असतो. या स्वेदग्रंथी संपूर्ण शरीराच्या त्वचेवर असतात, पण बॅक्टेरियांना राहायला जागा देत नाहीत. या स्वेदग्रंथीमुळे शरीराचे तापमान संतुलित राखले जाते. उष्णतेमुळे, व्यायामामुळे, अस्वस्थतेमुळे, मनावरच्या ताणामुळे या स्वेदग्रंथीतून जास्त घाम बाहेर पडतो. याचे प्रमाण जास्त वाढले तर हातापायांच्या तळव्यांना सतत घाम येतो. दुर्गंध येतो आणि पायाच्या बोटांच्या बेचक्यांमध्ये फंगस इन्फेक्शन होते. ( Avoid these foods in your diet to prevent bad breath )