हळद ही आपल्या रोजच्या जेवणातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. हळदीने अन्नाला रंग आणि चव दोन्हीही प्राप्त होते. सर्वसाधारणपणे आपण प्रत्येकजणंच रोज भाज्या, आमटी आणि इतर फोडणी दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये हमखास हळदीचा वापर करतो. तर ही हळद गुणकारी तर आहेच परंतु हळदीमुळे आतड्यांचा कर्करोग टाळता येऊ शकतो असे संशोधनात सिद्ध झाले आहे.
हळदीतील रासायनिक घटक हे आतड्यांसाठी गुणकारी असतात. याशिवाय आतड्यांचा कर्करोग झाला असल्यास त्यावरही हळद गुणकारी ठरू शकते. अमेरिकेत केल्या गेलेल्या या संशोधनात भारतीय संशोधकांचाही समावेश आहे. भारतात मोठ्या प्रमाणात हळदीचा वापर खाण्यासाठी केला जात असल्याने ही चांगली गोष्ट असल्याचे संशोधकांनी म्हंटले आहे.
हळदीत क्युरक्युमिन आणि सिलीमारीन असे दोन घटक असतात. हे घटक आतड्यांच्या कर्करोगात गुणकारी ठरतात. हे दोन्हीही घटक हळदीत सक्रिय असतात. फायटोकेमिकल आतड्यांच्या कर्करोगाची वाढ रोखतो आणि त्याचा प्रसारही होऊ देत नाही.
कर्करोगाच्या पेशीशी झुंझण्यात गुणकारी असलेला हा घटक हळदीमार्फत मिळू शकतो. आतड्याचा कर्करोग असलेल्या काही रुग्णांवर याचा सातत्याने उपयोग करून पाहिला असता त्याचे सकारात्मक परिणाम झाले असल्याचे या संशोधनता निष्पन्न झाले आहे.