सुदृढ आणि व्याधीमुक्त शरीर आणि मन हे खऱ्या अर्थाने आरोग्याचे लक्षण म्हणता येईल. आपल्या शारीरिक आरोग्याइतकेच आपले मानसिक आरोग्यदेखील महत्वपूर्ण असते. कारण जर मन अस्वस्थ असेल, तर याचे परिणाम शरीरामध्ये कोणत्या न कोणत्या व्याधीच्या रूपाने दिसून येत असतात. याचे उदाहरण द्यायचे झाले, तर पाठदुखीचे देता येईल. पाठदुखीचा अनुभव आपण सर्वांनीच कधी ना कधी घेतलेला आहे. पण पाठ दुखत आहे ही शारीरिक व्याधी म्हणून त्यावर उपचार करीत असतानाच आपल्या पाठदुखीचा संबंध आपण अनुभवत असलेल्या मानसिक तणावाशी तर नाही, याचीही खात्री करून घेणे आवश्यक असते.
जसजसे वैद्यक शास्त्र प्रगत होत आहे, तसे नवनवीन अभ्यास समोर येत आहेत. या अभ्यासाच्या आधारे आता पाठदुखीवर उपचार करताना शारीरिक अस्वास्थ्यासोबतच मानसिक अस्वास्थ्याचा विचार वैद्यकीय तज्ञ करत आहेत. किंबहुना शारीरिक व्याधी आणि मानसिक अस्वास्थ्य यांचा फार जवळचा संबंध असल्याचे विज्ञानाने निश्चितपणे सिद्ध केलेले आहे. याच संबंधाना विज्ञानाने सायकोसोमॅटिक्स असे नाव दिले आहे. शारीरिक आरोग्याचा संबंध मानसिक स्वास्थ्याशी असल्याच्या निष्कर्षाप्रत विज्ञान अलिकडच्या काळामध्ये पोहोचले असले, तरी चीनी तज्ञांना मात्र हे ज्ञान फार पूर्वीपासून होते. शरीरस्वास्थ्याचा संबंध, मन तणावविरहित असण्याशी असल्याचे जाणून घेऊन चीनी तज्ञांनी पाठदुखीवरची उपचारपद्धती फार पूर्वीपासूनच शोधली होती.
मानसिक तणावाचा परिणाम केवळ पाठदुखी आणि डोकेदुखी यांद्वारेच पाहायला मिळतो असे नाही, तर मधुमेह, लठ्ठपणा, ऍस्थमा, हृदयरोग, या आणि अश्या अनेक व्याधींच्या रूपात पहावयास मिळत असतो. लहान मुलांमध्ये देखील मानसिक तणावाचा परिणाम पाठदुखीच्या रूपामध्ये समोर येत असल्यास कालांतराने याचा थेट परिणाम पाठीच्या कण्यावर होऊ लागतो. या व्याधीला वैद्यकीय भाषेमध्ये स्कोलीयोसीस म्हटले जाते. हा आजार प्रामुख्याने लहान मुलांमध्ये पहावयास मिळतो. या आजारामध्ये मुलाच्या पाठीचा कणा एका बाजूला वाकू लागतो, आणि काही काळाने त्याचा आकार इंग्रजी अक्षराप्रमाणे दिसू लागतो. जी मुले लहानपणापासून तणावाने भरलेल्या वातावरणामध्ये राहत असतात, आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत असतात, त्या मुलांच्या बाबतीत हा आजार उद्भविण्याची शक्यता असते.
मानसिक तणावामुळे पाठदुखी उद्भवित असल्याचे लक्षात आल्यास या तणावाला कारणीभूत असलेल्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनातून दूर करण्याचा प्रयत्न करणे हा सर्वप्रथम उपाय आहे. जर या गोष्टी दूर करणे शक्य नसेल, तर यांच्याशी निगडित तणाव कश्या प्रकारे हाताळावा यासंबंधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हितकारी ठरू शकते. त्यामुळे पाठदुखी उद्भवली, तर ती केवळ शारीरिक व्याधी आहे असे न समजता याचा आपल्या मानसिक तणावाशी संबंध नसल्याची खात्री करून घेऊनच पुढील उपचार करावेत.
आणखी काही तक्रारी…
हल्ली वयाची तिशी पार केल्यानंतर पाठदुखीचा त्रास सुरू झाल्याची तक्रार घेऊन अनेक पेशंट डॉक्टरकडे येतात. जीवनशैलीत झालेला बदल, सातत्याने बैठे काम करण्याची झालेली सवय या गोष्टी पाठदुखीला निमंत्रण देतात. हाडांमधील लवचिकता आता संपली आहे. कारण शरीराला तेवढा व्यायामच होत नाही. सकाळचे सूर्यकिरण न मिळाल्याने नैसर्गिक ड जीवनसत्वाची देखील कमतरता आढळते. बोन डेन्सीटी म्हणजे हाडांची घनता देखील कमी झाल्याने जरा कुठे पडला, शारीरीक कष्टाचे काम केले की, हाडे ठिसूळ झालेली असल्याने लवकर इजा होण्याची शक्यता असते. ही सगळ्यांचा परिणाम पाठदुखीवर होत असतो. ड जीवनसत्वाची कमतरता व पुरेसे जीवनसत्व न मिळणे यामुळे शरीरातील कॅल्शीअम कमी होऊ लागते. अशा वेळी तात्पुरता उपाय म्हणून कॅल्शीअमच्या गोळ्यांचा डोस दिला जातो मात्र नैसर्गिक आहारातून जेवढी जीवनसत्वे मिळतील तेवढी शरीराला चांगली असतात.
पाठदुखीसारखा आजार तर आता लहान मुलांमध्ये देखील दिसून येऊ लागला आहे. पूर्वी लहान मुले सुट्टी पडली, शाळा सुटली की, घराबाहेर मैदानात खेळायला जायची. आता मात्र मोबाईल, लॅपटॉप यावर बैठे खेळ खेळण्यात मुले गुंतलेली असतात. मैदानी खेळ नसल्याने शरीरातील स्नायूंची पुरेशी हालचाल होत नाही. मुलांचा स्टॅमिना- शारीरीक क्षमता देखील हळूहळू कमी होत जाते. हेच मुल पुढे मोठा झाल्यावर बाईक, कारचा प्रवास करू लागतो. नियमीत जीममध्ये जाऊन वर्कआऊट करणे, चालायला जाणे हे सगळे प्रकार कमी होऊ लागतात. पुढे कामाला लागल्यावर देखील बहुतांशी काम बैठे असल्याने व्यायाम हा बंदच होतो. त्यामुळे शारीरीक क्षमता कमी होऊ लागते. टिव्ही मोबाईलचे देखील वेड सध्या वाढले आहे. त्यामुळे देखील पाठदुखी, मानदुखीला निमंत्रण दिले जाते.
कधीतरी तरूणवयात अचानक जीमला जायचे डोक्यात येते आणि आपली शारीरीक क्षमता, हालचाल लक्षात न घेता भरपूर व्यायाम करून घाम गाळला जातो. काहीना अचानक सायकलींग, मॅरेथॉन रनिंगचे फॅड डोक्यात शिरते. भराभर व्यायाम केल्याच्या प्रकाराने शरीराच्या स्नायूंवर अचानक ताण पडल्याने स्नायू लचकणे, बोन इंन्जुरी होतात. त्यामुळे आपली शारीरीक क्षमता तपासून त्यानुसार हळूहळू व्यायाम वाढवत नेणे उचित ठरते.
सध्याच्या काळात वयाच्या 35-40 मध्ये हाडांची कार्यक्षमता कमी झालेली दिसते. ज्याना बैठे काम आहे, जे लोक एसीमध्ये बसून दिवसातले 7-8 तास क़ॉम्पुटरसमोर घालवतात अशानी आपल्या सकयूंची पाठीच्या मणक्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या नजरेच्या टप्प्यात थोडे खालच्या दिशेला मॉनीटर असला पाहिजे. ज्या खुर्चीवर तुम्ही बसणार आहात ती संपूर्ण पाठीला सपोर्ट करतेय का याकडे लक्ष ठेवा. बसण्याची चुकीची पध्दत पाठदुखीला निमंत्रण देत असते.
आपल्याला शाळा-क़ॉलेजमध्ये देखील – मिनिटांनी दुसरे लेक्चर सुरू व्हायचे, मेंदूची साधारणत एकाग्रतेची क्षमता मिनिटांची असते त्यामुळे तेवढ्या वेळेनंतर खूर्चीवरून उठून थोड रिलॅक्स व्हायला हवे. जेणेकरून डोळे, पाठ व मान याना थोडा आराम मिळेल. तुम्ही कॉम्पुटरसमोर बसला असताना खूर्चीत बसल्यावर तुमचे पायदेखील पुढे पसरवता आले पाहिजे. गुडघे खाली दाबून बसायची सवय झाल्यास गुडघेदुखीचा त्रास लवकर सुरू होऊ शकतो. पाठीचा मणक्याच्या दुखण्याकडेही दुर्लक्ष करून जमणार नाही. चुकीच्या पध्दतीने पाठीला आराम मिळाला नाही तर, पाठदुखी जगण असह्य करते.
शक्यतो तुम्हाला आहारातून पुरेशी जीवनसत्वे नैसर्गिक स्वरूपात कशी मिळावी याकडे लक्ष द्या. पाठीचा कणा हा शरीराचा महत्वाचा भाग आहे. तो नीट राहीला तर जीवन जगणेही सुसह्य होईल. वयाची 40 नंतर जर पाठदुखी सतत जाणवत असेल तर, डॉक्टरांचा सल्ला घ्या. पाठदुखीकडे दुर्लक्ष करू नका.
गर्भारपणात स्त्रीवर दुहेरी जबाबदारी असते. या काळात ती अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरी जात असते. गरोदरपणात उद्भवणारी पाठदुखी ही त्यातलीच एक समस्या. या पाठदुखीचा त्रासामागे अनेक कारणं व कमी उपचार आहेत. तीस टक्के गरोदर महिलांना गरोदरपणात किंवा प्रसूतीनंतरच्या सहा महिन्यांच्या काळात कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या पाठदुखीला सामोरं जावं लागतं, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काहींना हा त्रास बऱ्याच कालावधीपर्यंत सहन करावा लागतो.
गरोदर असताना त्या स्त्रीसाठी पाठदुखीवरील उपचार उपलब्ध नसतात कारण विकसित होणाऱ्या गर्भावर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. काही उपचार सुरक्षित असले तरी ज्या कारणामुळे पाठदुखी उद्भवली आहे त्यावर ही औषधे उपचार करत नाहीत. जोपर्यंत शरीर या दुखण्यावर मात करण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत केवळ वरवरच्या लक्षणांवर उपचार करतात.
गरोदरपणात पाठदुखी उद्भवण्याची कारणे : जगभरात झालेल्या पाहणीनुसार गरोदरपणातील पाठदुखीचे प्रमाण हे 40 टक्के इतके असते. त्या पैकी 30 टक्के महिलांना पाठीच्या खालच्या भागाचे दुखणे सहन करावे लागते. डॉक्टरांच्या मते महिला आपल्या पहिल्या प्रसूतीच्या वेळी पाठीच्या खालच्या भागातील दुखण्याला सामोऱ्या जातात. साधारणपणे गरोदरपणाच्या पाचव्या ते सातव्या महिन्यादरम्यान ही पाठदुखी दिसून येत असल्याचं की स्पाइन क्लिनिकचे अस्थिविकारतज्ज्ञ आणि संशोधन संचालक डॉ. गौतम शेट्टी यांनी सांगितलं.
यासाठी कारणीभूत असणारे घटक खालीलप्रमाणे : शरीराचे गुरुत्व केंद्र बदलून ते पुढील बाजूस येते. यामुळे पाठीच्या खालच्या भागावरील दाब वाढतो आणि त्यामुळे कण्यावर अतिरिक्त भार येतो. पोट आणि नितंबांमधील स्नायू कमकुवत झाल्यामुळेसुद्धा कण्यावर भार पडतो.
ज्यांची जीवनशैली कृतीशील आहे त्यांच्या तुलनेत बैठी जीवनशैली असलेल्यांना पाठदुखी होण्याची शक्यता अधिक असते. ज्या स्त्रियांना गरोदरपणात शारीरिक कष्टांचे काम करावं लागतं, त्यांना या अवस्थेत पाठदुखी होण्याचा संभव असतो. म्हणजेच कोणत्याही प्रकारची अतिरेकी हालचाल होता कामा नये.
तरुण वय आणि आधी झालेल्या अनेक प्रसूती हे सुद्धा पाठदुखीचे प्रमाण वाढण्यासाठीचे कारण आहे.
या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्याने मातेच्या आरोग्यावर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, प्रसूतीपश्चात होणारी पाठदुखी, मग ती वारंवार उद्भवणारी असो की सतत होणारी असो, तिचा संबंध गरोदरपणातील लक्षणांशी असतो. यापैकी बहुतेक प्रकारची पाठदुखी प्रसूतीनंतर 6 महिन्यांच्या काळात निघून जाते, पण काही प्रकारची पाठदुखी ही जास्त काळासाठीसुद्धा राहू शकते.
गरोदरपणात पाठदुखी नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या काही टिप्स
बसताना, उभे राहताना, चालताना अथवा झोपताना सुयोग्य शारीरिक स्थिती ठेवणे हे पाठीच्या खालच्या भागातील दुखणे उद्भवू नये यासाठी गरजेचं असतं. खूप काळ बसलेल्या स्थितीत राहू नका. कारण यामुळे तुमच्या कण्यावर अतिरिक्त भार येतो.
बसताना पाठीच्या मागे उशी ठेवा. जेणेकरून तुमच्या पाठीला आधार मिळू शकेल. गरोदरपणाच्या सुरुवातीपासून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आणि सल्ल्यानुसार पाठीचे आणि ओटीपोटाचे व्यायाम करावेत, जेणेकरून हे स्नायू सशक्त होतील. तुमच्या शरीराचा बांधा सुयोग्य राखतील आणि तुमच्या दैनंदिन क्रिया तुम्हाला सामान्यपणे करता येतील.
गुडघे पोटाजवळ (नी पुल), झोपलेल्या अवस्थेत पाय सरळ करून तो वरच्या बाजूला उचलणे (स्ट्रेट लेग रेझिंग), झोपलेल्या अवस्थेत वरच्या मानेवरच्या बाजूकडे आणणे (कर्ल अप) एका कुशीवर झोपून पाय वरच्या बाजूला उचलणे (लॅटरल स्ट्रेट लेग रेझिंग) आणि केगल व्यायामप्रकार अशा प्रकारचे व्यायाम करावेत, जेणेकरून गरोदर महिलांना पाठदुखीपासून आराम मिळू शकेल.
– डॉ. एस. एल. शहाणे