रक्तक्षय म्हणजे रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे (बालकांमध्ये 11.5% पेक्षा कमी) किंवा लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी असणे. भारतात पाच वर्षाखालील जवळपास 58% बालके रक्तक्षयाने ग्रस्त आहेत. शालेयवयीन बालकांमध्ये आणि पौगंडावस्थेमध्येही रक्तक्षयाचे प्रमाण लक्षणीय आहे. रक्तक्षयाचे अनेक प्रकार आहेत. पण लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय हा सर्वात जास्त प्रमाणात दिसून येतो.
लोह शरीरात काय काम करते?
लोह बालकांच्या वाढीसाठी व विकासासाठी आवश्यक असते. त्याचबरोबर फुप्फुसांकडून घेतलेला ऑक्सिजन रक्तावाटे शरीरभर पोहोचवायचा आणि शरीरातील पेशींकडून कार्बन-डाय-ऑक्साईड गोळा करून फुप्फुसांकडे आणून द्यायचा हे महत्त्वाचे काम लोह (हिमोग्लोबिन) करते.
रक्तक्षयाची लक्षणे कोणती?
रक्तात हिमोग्लोबिनचे म्हणजे लोहाचे प्रमाण कमी असल्यास वरील कामे नीट होत नाहीत आणि खालील लक्षणे दिसतात.
थोड्या श्रमाने / थोडे खेळल्यानंतर थकून जाणे, मरगळ
काम / अभ्यास करण्याची क्षमता कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे
प्रतिकारशक्ती कमी होणे, सारखे आजारी पडणे
चेहरा, हाताचे तळवे, डोळे फिकट, पांढुरके व निस्तेज दिसणे
हाताचे व पायाचे तळवे थंड पडणे
चक्कर येणे, गोंधळल्यासारखे होणे
चिडचिडेपणा
सारखी झोप येणे, केस गळणे
भूक न लागणे
वारंवार धाप लागणे, वेगाने श्वासोच्छ्वास करणे
अनैसर्गिक पदार्थ खाण्याची इच्छा होणे उदा. माती, खडू, बर्फ, रंग
ही झाली वरवरची लक्षणे. पण रक्तक्षयाचा बालकांच्या वाढ व विकासावरही परिणाम होऊ शकतो.
रक्तक्षयाची कारणे कोणती?
बाळ अपुऱ्या दिवसांचे अथवा कमी वजनाचे असणे
बाळांना वरचे (गाईचे किंवा शेळीचे) दूध लवकर सुरु करणे
बाळांना सहा महिन्यांनंतर वरचे अन्न सुरू न करणे
1 ते 5 वयोगटात दररोज 500 मि.ली. पेक्षा जास्त वरचे दूध पिणे
आहारात लोह, जीवनसत्त्वे (ब-12, फोलिक ऍसिड), प्रथिने यांनी समृद्ध असणाऱ्या पदार्थांचे प्रमाण कमी असणे.
खाण्या-पिण्याचे नखरे, विशिष्ट पदार्थ (भाज्या, फळे) न खाणे
कुपोषण – वजन खूप कमी किंवा खूप जास्त असणे
शरीरात अनैसर्गिक रक्तस्राव होत असणे (उदा. बद्धकोष्ठतेमुळे शी करताना रक्स्राव होणे, मुलींना मासिक पाळीदरम्यान अतिरिक्त रक्तस्राव होणे)
काही आजार, जंतुसंसर्ग
पोटात जंत होणे
रक्तक्षयावर उपाय काय? बाळ जन्माला येते तेव्हा त्याच्या शरीरात काही प्रमाणात लोह साठवले असते. पण स्तनपानातून फारसे लोह मिळत नसल्याने बालकांना सुरुवातीचा काही काळ लोहाचे औषध द्यावे लागते. यामुळे त्यांची वाढ चांगली होते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
त्यानंतरच्या काळात रक्तक्षय आहे का आणि तो किती तीव्रतेचा आहे याची दरवर्षी तपासणी करावी (हिमोग्राम आणि गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने इतर चाचण्या). लक्षात ठेवायला सोपे म्हणजे मुलांच्या वाढदिवसाला किंवा त्याच्या आसपास तपासण्या कराव्या.
हिमोग्लोबिन खूपच कमी असेल तर डॉक्टर योग्य त्या गोळ्या-औषधे (सप्लीमेंट्स) देतील. क्वचितप्रसंगी रक्त चढवायला सांगतील. पण जर रक्तक्षय कमी तीव्रतेचा असेल तर आहारात योग्य काळजी घेऊनही हिमोग्लोबिनचे प्रमाण सुधारता येईल.
बालके आणि स्त्रियांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी भारत सरकारने लोह आणि फोलिक ऍसिडच्या गोळ्यांचे वितरण सुरू केले आहे. या गोळ्या नियमित घ्यायला हव्या; पण फक्त गोळ्या घेणे पुरेसे नाही. रक्त तयार करायला मदत करणाऱ्या प्रथिने, जीवनसत्त्व ब 12, क जीवनसत्त्व अशा इतर पोषकद्रव्यांकडेही पुरेसे लक्ष दिले पाहिजे.
यासाठी संपूर्ण आहारच सुधारायला हवा. शिवाय रक्तक्षयाचे मूळ कारण शोधून त्यावरही उपाययोजना करायला हवी. उदा. पोटात जंत झाले असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने जंताची औषधे घ्यायला हवी. शरीरात कुठे अनैसर्गिक रक्तस्राव होत असेल तर त्यावर उपचार करायला हवेत.
रक्तक्षय झाल्यावर किंवा होऊ नये म्हणून आहारात काय काळजी घ्यावी?
बाळाला वरचे अन्न सुरू करतानाच त्यात भाज्या, पालेभाज्या, फळे यांचा समावेश करावा. लहानपणीच सगळे खाण्याची सवय लावावी.
मुलांच्या आहारात (विशेषतः 1 ते 5 वर्षे वयादरम्यान) दुधाचे प्रमाण मर्यादित ठेवावे. काही मुले दिवसभर फक्त दूधच पितात. दूध-पोळी, दूध-भात, दूध-पोहे, शिकरण हेच पदार्थ आहारात घेतात. दुधात लोह नसते. त्यामुळे दुधाचा अतिरेक केल्यास हिमोग्लोबिन कमी होण्याची शक्यता असते. मुलांना दूध, दही, ताक सगळे धरून दिवसभरात 500 मि.ली. पेक्षा जास्त दूध देऊ नये.
अनेक मुलांना लहानपणापासूनच चहा – कॉफी पिण्याची सवय असते. ही सवय लोहाच्या तसेच कॅल्शियमच्याही शोषणासाठी मारक आहे. मुलांना अशी सवय लावू नये.
आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा. उदा. पालेभाज्या, खारीक, खजूर, काळे मनुके, अळीव, डाळिंब, हुलगे (कुळीथ) कारळे, काळा गूळ, चिकन, मासे, अंडी इ.
स्वयंपाकासाठी ऍल्युमिनिअमऐवजी लोखंडाची भांडी (कढई, तवा, पळी) वापरावी. स्वयंपाक करून झाल्यावर पदार्थ स्टीलच्या भांड्यात काढून ठेवावे.
जीवनसत्त्व क असणारे पदार्थ उदा. लिंबू, पेरू, संत्री, आवळा, ढोबळी मिरची, टोमॅटो इ. लोहाच्या शोषणासाठी मदत करतात. त्यामुळे आहारात अशा पदार्थांचा समावेश करावा. विशेषतः लोहयुक्त पदार्थांबरोबर क जीवनसत्त्वयुक्त पदार्थ घ्यावे. पालेभाज्यांवर लिंबू पिळावे, जेवणानंतर लिंबूपाणी घ्यावे.
काही लोह आणि प्रथिनयुक्त पाककृती : हळीवाची खीर
साहित्य :
हळीव – 1 टेबलस्पून
दूध – 1 कप
खजूर – 2
वेलदोडा पूड – 1 चिमूट
कृती:
हळीव अर्धा कप दुधात 1 तास भिजत टाकावे.
हळीव चांगले फुगल्यावर त्यात अजून अर्धा कप दूध घालून गॅसवर ठेवावे.
त्यात खजुराचे बारीक तुकडे करून घालावे. मिश्रण हलवत राहावे.
दलधाला उकळी आल्यावर गॅस बंद करावा.
वेलदोडा पूड घालून खीर खायला द्यावी.
मेथी किंवा पालकाची पचडी
साहित्य :
मेथी / पालक (स्वच्छ धुवून, चिरून) – 1 वाटी
मोडाचे मूग – 2 टेबलस्पून
ओले खोबरे – 1 टेबलस्पून
डाळिंबाचे दाळे – 2 टेबलस्पून
लिंबू – पाव
मीठ – चवीपुरते
फोडणीचे साहित्य
कृती:
चिरलेली मेथी किंवा पालक, ओले खोबरे, डाळींबाचे दाणे, मोडाचे मूग एकत्र करावे.
त्यात चवीपुरते मीठ घालावे, लिंबू पिळावे.
वरून मोहरी-हिंगाची फोडणी द्यावी.
कुळिथाचे (हुलग्याचे) पिठले
साहित्य:
कुळीथाचे पीठ- 2 टेबलस्पून
आमसूल – 2 तुकडे
लसूण – 4-5 पाकळ्या
हिरवी मिरची – 1 लहान
मीठ चवीपुरते
फोडणीचे साहित्य
कोथिंबीर
पाणी – 2 वाट्या
कृती :
लोखंडाच्या कढईत 1 टेबलस्पून तेल घेऊन जिरे, हळद, कडीपत्ता, हिंग व मिरचीची फोडणी द्यावी.
फोडणीत लसणाचे तुकडे ठेचून घालावे व कुरकुरीत होईपर्यंत परतावे. कुळीथाचे पीठ पाण्यात कालवून घ्यावे.
फोडणीत हे कालवलेले पीठ घालून उकळी येईपर्यंत हलवत राहावे. आमसुलाचे तुकडे व मीठ घालावे.
पिठले थोडे घट्टसर होत आले की गॅस बंद करावा. (हे पिठले नेहमीच्या पिठल्यापेक्षा पातळ असते.)
गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत