विविध प्रकारच्या उपचार पद्धतीच्या सहाय्यानं व्याधींवर मात करण्याचे तसंच रोगाच्या प्रसाराला आळा घालण्याचे प्रयत्न करण्यात आले. अलीकडे तर वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळू लागली आहे. त्यामुळे दुर्धर आजारावरील प्रभावी उपचारपद्धती अस्तित्वात आणणं शक्य होत आहे. अशा तऱ्हेनं अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याद्वारे तत्कालीन आजारांबाबत रुग्णांना दिलासा मिळणं शक्य झालं. काही संसर्गजन्य विकार तर बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आले. देवीसारख्या विकाराचं तर समूळ उच्चाटन करण्यात यश आलं. त्यावेळी विविध ठिकाणी “देवी रोगी कळवा, हजार रुपये मिळवा’ असं लिहिलेले फलक जागोजागी आढळत. परंतु आता या रोगाचे कोठे नावही दिसत नाही.
अर्थात, याचं श्रेय वैद्यकीय संशोधनाला जातं. अनेक संशोधकांनी अथक परिश्रमातून विकारांवर मात करणारी प्रणाली शोधून काढली. आजही विविध विकारांबाबतचं संशोधन सुरू आहे. याचा अर्थ वैद्यकीय क्षेत्रासमोर सतत कोणत्या ना कोणत्या विकारावर मात करण्यासाठी उपचार शोधण्याचं आव्हान कायम आहे. बदलत्या काळानुरूप काही नवे विकार डोकं वर काढत आहेत. सद्य:स्थितीत मधुमेह, हृदयविकार यांचं वाढतं प्रमाण हा मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. यामागील कारणांबाबत वेळोवेळी चर्चा केली जाते. ती कशी दूर करावीत हेही सांगितलं जातं. दुसरीकडे, या विकारांवर वेळीच कशी मात करता येईल, याबाबतचं संशोधनही अव्याहतपणे सुरू आहे. परंतु या विकारांच्या प्रसाराला पुरेशा प्रमाणात अटकाव करता आलेला नाही.
वैद्यकीय क्षेत्रासमोरील आणखी एक आव्हान म्हणजे ठराविक उपचारांचा त्या त्या विकाराच्या जंतूंवर प्रभाव कमी होत जाणं. एखाद्या विकारावर विशिष्ट औषध कामी येतंय, असं लक्षात आल्यावर त्यावरच भर दिला जातो. परंतु कालांतरानं त्या आजाराचे जंतू वा विषाणू या औषधालाही जुमानत नाहीत, असं दिसून येतं. साहजिक त्या आजारावर आधीची औषधं प्रभावहीन ठरू लागतात. अशा परिस्थितीत रुग्णांना कोणती नवी औषधं द्यायची, असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. यातून एक निष्कर्ष समोर येतो, तो म्हणजे, एखाद्या आजाराचे जंतू त्याच त्या प्रकारच्या औषधाला सरावतात. त्या औषधाचा प्रतिकार करण्याची शक्ती ते आपल्या ठायी निर्माण करतात. त्यामुळे त्या औषधाच्या वापरानं संबंधित विकारावर मात करता येत नाही. काही विशिष्ट औषधांबाबत ही परिस्थिती हमखास निर्माण होत आहे. त्यामुळे आता उपचारात विशिष्ट औषधांचा अधिक काळ वापर करणंही कठीण झालं आहे.
या पार्श्वभूमीवर अलीकडच्या काही संशोधनांमधून अँटिबायोटिक्सच्या वापराचे दुष्परिणाम मोठया प्रमाणात समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे अँटिबायोटिक्स शक्य तितकी टाळली पाहिजेत आणि योग्य वेळी, आवश्यक रुग्णांना तज्ज्ञांनीच ती लिहून द्यावीत.
भारतात मूत्रविकारग्रस्त रुग्णांचं प्रमाण वाढत असून त्यांच्यावर केलेल्या अँटिबायोटिक्सच्या प्रयोगाला काही बॅक्टेरिया दाद देत नसल्याचं दिसून आल्यामुळे मूत्रपिंडाच्या आजारांनी मरण पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत चालल्याचं दिसून आलं आहे. मूत्रमार्गाचा संसर्ग हा कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यापाठोपाठ सर्वसामान्य आजार बनत चालला असून हा बॅक्टेरियाजन्य आजार अनेकांच्या जीवावर बेतू पाहत आहे.
यावर केवळ गोळ्या देऊन उपचार करणं कठीण बनत चाललं असून, रुग्णांना इंजेक्शन द्यावीच लागत असल्याचं मूत्रविकारतज्ज्ञांच्या निरीक्षणातून समोर आलं. शिवाय अँटिबायोटिक्सच्या चुकीच्या उपचारांमुळे आणि काही वेळा बॅक्टेरियांमधील वाढत्या प्रतिरोधक शक्तीमुळे इंजेक्शनचाही उपयोग होत नसल्याचं दिसून येत आहे. अशा परिस्थितीत मूत्रमार्गाचा संसर्ग मूत्रिपडांपर्यंत पोहोचून त्यांचे आजार होण्याच्या शक्यता बळावलेल्या रुग्णांचं प्रमाण कमी करणं हे मोठं आव्हान आहे. मूत्रमार्गाच्या संसर्गाचा परिणाम म्हणून मूत्राशय, मूत्रनलिका यासारखे अवयव निकामी होण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसतं. अशा वेळी मूत्रपिंडाला इजा पोहोचवणारी काही अँटिबायोटिक्स देणं भाग पडत आहे. मात्र तीव्र अँटिबायोटिक्सचा सरसकट वापर करणं टाळलं पाहिजे आणि नाईलाज झाला तरच ती वापरावीत.
क्षमता वाढली पाच हजार पटींनी…
प्रतिजैविके अर्थात अँटिबायोटिक्सचा शोध हा मानवी आरोग्यासाठी क्रांतिकारक ठरला असला तरीही सध्याच्या काळात प्रतिजैविकांना दाद न देणा-या जीवाणूंचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने प्रतिजैविके निष्प्रभ ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिजैविकांच्या शक्तीत एक हजारपटीने वाढ करून त्यांना जीवाणूंना नेस्तनाबूत करण्याएवढे सक्षम बनविण्याची प्रक्रिया शोधण्यात आली आहे. प्रतिजैविकांना निष्प्रभ करणा-या जीवाणूंचे आव्हान जगभरात आ’वासून उभे आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जीवाणूंची यादीच प्रसिद्ध केली आहे. मात्र सध्या मोठया प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या व्हॅन्कोमायसीन या औषधात काही सुधारणा करून त्यांची शक्ती जीवाणू नष्ट करण्याएवढी वाढविण्यात यश आल्याचे या वैज्ञानिकांच्या गटाने सांगितले. प्रॉसिडिंग्स ऑफ नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्स’मध्ये या संशोधनाबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्याच्या काळात प्रतिजैविके निष्प्रभ झाल्याने अमेरिका, युरोपमध्ये दरवर्षी 50 हजार जणांचा मृत्यू होतो. भारतात तर याबाबत अधिक भयानक परिस्थिती आहे. भारतात 95 टक्के प्रौढ व्यक्तींमध्ये प्रतिजैविकांचा प्रभाव रोखणा-या जीवाणूंची लागण झाल्याची माहिती प्रोजेक्ट रेस्सिटेंस मॅप या संस्थेने दिली आहे. या पार्श्वभूमीवर या नवीन संशोधनाला महत्त्व आहे.