डॉक्टर म्हटले की आठवतो पांढरा कोट, स्टेथोस्कोप, इंजेक्शने, गोळ्या-औषधे, तपासण्या, दवाखाना, वेटिंग, खर्च आणि डोळ्यामध्ये दाटते काहीशी भीती! “शहाण्याने डॉक्टरची आणि वकीलाची पायरी चढू नये; तिथून सुटका नाही.’ अशा म्हणी आपण लहानपणी ऐकल्या असतात.
पण माझ्या बाबतीत घडले उलटेच! मी पुण्यातल्या चार अशा डॉक्टरांच्या पायऱ्या चढले की, माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला! त्याचीच ही छोटीशी गोष्ट!
माझ्या कळत्या वयापासून मला आरोग्याच्या तक्रारींसाठी फारसे डॉक्टरांकडे जायला लागल्याचे आठवत नाही. 2009 साली एम.एस.सी. झाल्यानंतर मी पुण्यातल्या के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकले ते माझ्या इंटर्नशिपसाठी. नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागात (छखउण) डॉ. उमेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली माझी इंटर्नशिप सुरू झाली.
वैद्य सर म्हणजे कोणावरही छाप पडेल असे व्यक्तिमत्त्व. आमच्या पहिल्याच भेटीत मी भारावून गेले. वैद्य सरांचे अचूक निदान, डॉक्टर असूनही आहारशास्त्राविषयीचे सखोल ज्ञान आणि ऑस्ट्रेलियामध्ये शिकल्यानंतर भारतात परत येऊन इथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची हातोटी मला भावली.
बाळाच्या तब्येतीची माहिती पालकांना कळली पाहिजे, त्यांच्या सर्व शंकांचे निरसन झाले पाहिजे या हेतूने दुपारच्या वेळात चालणारे पालकांचे समुपदेशन मला खूप काही शिकवून गेले. वैद्य सरांची कामाविषयीची तळमळ, प्रसंगी स्वतःच्या खिशातून त्यांनी गरजूंना केलेली मदत मी जवळून पाहिली.
पुढे त्यांच्याबरोबर लहान मुलांच्या आहारावरचे पुस्तक लिहिताना त्यांची उत्तम भाषाशैली, सोप्या शब्दात विज्ञान समजावून सांगण्याची पद्धत मी कळत-नकळत शिकले. त्यांचे त्यांच्या आईवडिलांवर असलेले प्रेम आणि त्यांच्याबद्दल असणारा अभिमान मला त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून नेहमी जाणवला.
पुढे पीएच.डी.च्या निमित्ताने माझी ओळख झाली के.ई.एम. मधील प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. चित्तरंजन याज्ञिक यांच्याशी! पीएच.डी. दरम्यान आणि त्यानंतरही त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळाले. याज्ञिक दांपत्य म्हणजे साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी यांचे चालते-बोलते उदाहरण.
याज्ञिक सरांचे अफाट वाचन, इंग्रजी भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व मला चकित करते. जगभरातल्या सगळ्या घडामोडी आणि वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनबाबत त्यांच्याकडे अद्ययावत माहिती असते. अनेक रिसर्च पेपर्स जेव्हा ते साल आणि लेखकासह सांगतात, तेव्हा त्यांची स्मरणशक्ती आणि या क्षेत्रातील अनुभव बघून मी अवाक होते. अनेक पेशंट्सची नावे, त्यांचे बारीक सारीक तपशील त्यांना अचूक आठवतात.
मला आठवते, पहिल्याच भेटीत त्यांनी मला विचारले होते की मधुमेहाच्या कोणत्या बाबीवर तुला संशोधन करायचे आहे? थोड्याफार वाचनावर आधारित मी उत्तर दिले होते की, मधुमेह बरा होणे अवघड असल्याने मला मधुमेहाच्या प्रतिबंधावर काम करायला आवडेल. त्यासाठी मी आय.टी. कंपन्यांमधील स्थूल व्यक्तींवर काम करणे सुरू केले.
पीएच.डी. दरम्यान हळूहळू सरांच्या संशोधनाशी ओळख होत गेली. माझ्या लक्षात आले, सरांचा संशोधनाचा विषयही मधुमेह प्रतिबंधच आहे. पण ते याची सुरुवात मात्र करत आहेत बाळाचा जन्म होण्याआधीच! होणाऱ्या मातेचा आहार आणि आरोग्य सुधारून जन्मपूर्व मधुमेह प्रतिबंधाचा अनोखा मार्ग ते तीन पिढ्यांमध्ये अभ्यासत आहेत. केवढी ही दूरदृष्टी!
पीएच.डी. करतानाचे माझे दुसरे मार्गदर्शक म्हणजे डॉ. रविंद्र कुलकर्णी-हृदरोगतज्ज्ञ आणि ऑनलाईन हेल्थ मधील तज्ज्ञ! अगदी योगायोगानेच आमची भेट झाली आणि त्यांनी मला सर्वतोपरी मदत केली. नंतर त्यांच्या मर्गीीीं षीे कशरीीींफ संस्थेत सामावून घेतले ते वेगळेच. डॉ. कुलकर्णी म्हणजे कायम कार्यमग्न व्यक्तिमत्त्व.
अद्ययावत वेबसाईट आणि सध्या तरुणाईत लोकप्रिय असणारे सोशल प्लॅटफॉर्म्स वापरून आरोग्याबाबतची वैज्ञानिक माहिती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी, कॉर्पोरेट जगतातील ढासळत चाललेले आरोग्याचे चित्र बदलावे, यासाठी वेगळ्या वाटेने चालण्याचे त्यांचे प्रयत्न आता खूप विस्तारले आहेत. त्यांच्याबरोबर काम करताना मला माझ्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळते.
पीएच.डी. झाली म्हणजे इतिकर्तव्यता झाली असे नाही. तुझ्या संशोधनाभ्यासाचा उपयोग अधिकाधिक लोकांना झाला पाहिजे. त्यासाठी तू तुझ्या विषयावर अधिकारवाणीने, आत्मविश्वासाने बोलले पाहिजेस, लिहिले पाहिजेस, असं ते कायम सांगतात.
के.ई.एम. मध्ये काम करतानाच ओळख झाली बालरोगतज्ज्ञ (बाल आरोग्य तज्ज्ञ!) डॉ. कल्पना जोग यांच्याशी. त्या के.ई.एम. मधील बालमधुमेह विभाग संभाळतात. आमची ओळख होण्यापूर्वी मधुमेह म्हणजे ठरावीक आहार-भात नाही, केळी नाहीत, गोड नाही, अंड्याचा पिवळा बलक नाही, असे आहारतज्ज्ञ असूनही माझे (गैर)समज होते.
बालमधुमेह हा मधुमेहाचा अतिशय वेगळा प्रकार आहे. वाढीच्या वयात असणाऱ्या या बालमधुमेहींची रक्तातील साखर नियंत्रणात राखण्यासाठी कार्बोहायड्रेट काऊंटिंग ही आहारनियोजनाची विशिष्ट पद्धत जोग मॅडमनी मला शिकवली. या विषयातील पुस्तके वाचायला दिली, त्यासाठी लागणारा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा मला परदेशातून आणून दिला. आता मी या विषयातील एक्स्पर्ट म्हणून ओळखली जाते याचे सगळे श्रेय जोग मॅडमना आहे.
जोग मॅडमकडून शिकण्यासारखे खूप आहे. त्यांचा आहार अतिशय सकस आणि नियंत्रित आहे. त्यांचेही वाचन चौफेर आहे. एारिींहू म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिकावे. कित्येकदा बालमधुमेहाचे निदान झाल्यानंतर बाळाचे आईवडील खूप खचून जातात. अगतिक होतात. अशा वेळेला कित्येकदा 1-1 तास त्यांच्याशी बोलावे लागते, त्यांना समजेल अशा पद्धतीने बालमधुमेहाचे उपचार, घरी करायचे नियोजन समजावून द्यावे लागते.
याला जोग मॅडम कधीही कंटाळत नाहीत. लहान मुलांशी तर त्या इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बोलतात की, आपण पाहात राहावे! आपले म्हणणे समोरच्याला समजण्यासाठी रोजच्या जीवनातील विविध उदाहरणे देणे, छोट्या छोट्या युक्त्या सांगणे ही त्यांची खासियत! “जशी आपण आपल्या महागाच्या गाडीची काळजी घेतो, गाडीला इजा होऊ नये म्हणून जपतो, एखादा पोचा आला तरी हळहळतो. त्यापेक्षा किती तरी जास्त पटीने आपण शरीराला जपले पाहिजे.
आपले शरीर-त्यातील एकेक अवयव अमूल्य आहे. आपल्या चुकीच्या खाण्याने-पिण्याने, चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीराला आतून इजा होते, याची जाणीव ठेवली पाहिज.’ ही त्यांची शिकवण. खूप खूप शिकले मी जोग मॅडमकडून!
या सगळ्या डॉक्टरांमधले समान दुवे म्हणजे आपल्या कामाविषयी मनापासून प्रेम, नि:स्वार्थीपणा, परदेशात राहून-शिकूनही भारतात काम करण्याची (दुर्लभ) मनोवृत्ती, अनावश्यक औषधोपचार टाळून आहार-जीवनशैली
सुधारण्यावर भर, भरपूर वाचन, आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग आणि साधेपणा, निर्गर्वीपणा! अजून एक साम्य-त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ते नियमित करत असलेला व्यायाम! आधी केले मग सांगितले!! सगळ्यांची तब्येत त्यामुळे ठणठणीत आहे. डॉक्टरांनी स्वतः फिट असायलाच हवे की! तरच रुग्णांच्या आयुष्यात आनंदाचे आणि आशेचे किरण पसरवू शकतील हे देवदूत…
या डॉक्टर दिनाच्या निमित्ताने माझ्या आयुष्यातील या चार प्रेरणादायी डॉक्टरांना आणि जगभरातील समस्त डॉक्टरवर्गाला मानाचा मुजरा!
डॉ. तेजस लिमये