संवाद आपल्या मनुष्य प्राण्याच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग. कल्पना करा, आज जर मनुष्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये संवादच नसता तर? भाषा विकसितच झाल्या नसत्या तर? आपण कसे जगू शकलो असतो? आपल्या गरजा, भावभावना, विचार, कल्पना एकमेकांना कशा सांगितल्या असत्या? कशा व्यक्त केल्या असत्या. किती अवघड झालं असतं नाही जगणं? काही घडलंच नसतं आपल्या आयुष्यात.
खरंच संवाद म्हणजेच आपलं आयुष्य आहे. या संवादावरच सगळं जग चालू आहे. त्यामुळेच आपलं आयुष्य सुखकर सुरळीत चालू आहे. संवाद प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असं म्हणता म्हणता मात्र या सध्याच्या कॉम्प्युटर, इंटरनेट, मोबाइलच्या युगात हा एकमेकातला संवाद संपतच चाललाय. या सर्व माध्यमांमुळे दूरचे जवळ आलेत. हे खरंच; पण जवळचे दूर जात आहेत त्याचं काय? आपण अमेरिकेतल्या एखाद्या मित्राशी या इंटरनेटमुळे संवाद ताबडतोब साधू शकतो. पण आपल्या घरात काय घडतंय हे कित्येकदा आपल्याला माहीत नसतं.
पूर्वीचे लोक किती सुखी होते. पूर्वी आपल्या शेजारी आजूबाजूला कोण राहत, हे सगळ्यांना माहीत असायचं. शेजाऱ्या शेजाऱ्यांचं जवळचं हक्काचं नातं असायचं. एखाद्याच्या अडीअडचणीला सगळे धावून जायचे. कधीच कोणी एकटं नसायचं. पण आता… या बंद दारांच्या संस्कृतीत बिल्डिंगमध्ये तर सोडाच; शेजारी कोण राहतात हेसुद्धा माहीत नसतं.
प्रत्येकाने खरं सांगावं आज किती जण कामावरून, बाहेरून घरी आल्यावर आपला मोबाईल पूर्णपणे बाजूला ठेवून देतात आणि घरातल्यांशी मनमुराद संवाद साधतात, बोलतात? आज कितीजण टीव्ही बंद करून गप्पा मारत एकत्र जेवतात. हसत, खेळत गप्पा मारण्यात वेळ घालवतात? किती जण घरातल्यांबरोबर आपल्या अडचणी, अपयश, यश गुण्यागोविंदानं साजरं करतात; किंवा घरातला एखादा जिन्नस संपला तर हक्कानं शेजाऱ्यांकडून मागून आणू शकतात? किती जण आपण केलेले पदार्थ शेजाऱ्यांबरोबर वाटून खातात?
या साऱ्याचं प्रमाण हळूहळू कमी होत चाललंय. माणूस माणूसघाणा होत चाललाय. तो या मोबाईल, इंटरनेटच्या आहारी जात चाललाय. तेच त्याला आयुष्य वाटायला लागलंय. पण तो हे विसरतोय की आपल्याला एखादी गंभीर अडचण आली तर हे लाईक्स, मोबाइलवरचे मित्र उपयोगाला येणार नाहीत. तेव्हा मात्र आपलंच कोणीतरी लागणार आहे हे त्याच्या लक्षातच येत नाही. या सोशल मिडीयाच्या आहारी जाण्याचे परिणाम म्हणूनच मोबाइल, इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करावी लागत आहेत.संवादाचा अभाव, विसंवाद, विश्वासाचा अभाव यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालले आहे. या संवादाच्या अभावाने सर्वांच्याच आयुष्यात समस्या निर्माण केल्या आहेत.
समुपदेशनाच्या क्षेत्रात इतकी वर्षं काम करत असताना असं लक्षात यायला लागलंय की आता समस्या घेऊन येणाऱ्या कितीतरी जोडप्यांमध्ये, घरांमध्ये संवादाचा म्हणजे मोकळ्या, खुल्या संवादाच्या अभावामुळे समस्या निर्माण झाल्यात. हा अभावच त्यांच्यातील वाद-विवाद टोकाला नेत आहे.
मित्र-मैत्रिणींनो, असे सांगावेसे वाटते की, काळाबरोबर चालायचे तर इंटरनेट, कॉम्प्युटर, मोबाईल याला पर्याय नाही. हे खरेच आहे. यात कोणतेच दुमत नाही; पण मित्र हो, हेच म्हणजे आयुष्य नाही. हे आपल्या ध्यानात यायला हवे. प्रत्येकाचा एकमेकांशी असलेला संवाद वाढायलाच हवा. मग तो कुटुंबातील सदस्यांमधला असो किंवा कामावरच्या ठिकाणाचा. या यंत्रांवर माणसं जोडण्यापेक्षा आजूबाजूची, जवळची माणसं जोडायला हवी, त्यांच्याशी मनमुराद संवाद साधायला हवा.
कोणीतरी जवळच हवं ज्याच्याशी आपल्या समस्या मोकळेपणाने बोलता येतील. आपल्या आयुष्यातलं संवादाचं प्रमाण वाढवून तर पहा. मनावरचे, डोक्यावरचे निम्म्याहून जास्त ताणतणाव दूर होतील. आयुष्यातल्या अनेक समस्या दूर होतील. तणावमुक्त आयुष्य जगायचं असेल तर संवादाला पर्याय नाही हेच खरं.