[[{“value”:”
Akshay Kumar: बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमार केवळ अभिनयासाठीच नव्हे तर त्याच्या फिटनेस आणि शिस्तप्रिय जीवनशैलीसाठीही प्रसिद्ध आहे. नुकताच ‘हाऊसफुल ५’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अक्षयने, ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाच्या वादामुळेही हेडलाईन्स गाजवल्या होत्या. पण यावेळी तो आपल्या फिटनेस टिप्समुळे चर्चेत आला आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात खास खुलासा
‘युअर बॉडी ऑलरेडी नोज (Your Body Already Knows)’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अक्षय कुमारने आपल्या आहार पद्धती, फिटनेस आणि जीवनशैलीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. त्याने विशेषतः सायंकाळी लवकर जेवण्याचे महत्त्व आणि सोमवारी उपवास करण्याची सवय याबद्दल सविस्तर सांगितले.
“सगळे आजार पोटापासून सुरू होतात”
अक्षय म्हणाला,“मी सायंकाळी जास्तीत जास्त साडे सहापर्यंत जेवण करतो. कारण रात्री झोपताना शरीराचे डोळे, हात, पाय हे सर्व अवयव आराम करतात, पण पोटाला काम करावे लागते. आपण उशिरा जेवलो तर सकाळी उठल्यानंतर पोटाच्या आरामाची वेळ होते. मात्र लगेच आपण नाश्ता करतो, त्यामुळे पोटाला पुन्हा काम करावे लागते. त्यामुळे सगळे आजार हे पोटापासून सुरू होतात. जर आपण वेळेत, लवकर जेवलो तर आजार जवळ येणार नाहीत.”
त्याने पुढे सांगितले,“मी रविवारी संध्याकाळी जेवतो आणि त्यानंतर सोमवारी पूर्ण उपवास करतो. मी काहीही खात नाही. थेट मंगळवारी सकाळी माझा पहिला आहार घेतो.”
चाहत्यांची सकारात्मक प्रतिक्रिया
अक्षयच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “तो खूप शिस्तप्रिय आहे, जर भारतातील अर्धी लोकसंख्या त्याच्यासारखी शिस्त पाळली तर आपण जगात पहिल्या स्थानी असू.”
तर दुसऱ्याने म्हटलं,“मीही काही दिवसांपासून लवकर जेवायला सुरुवात केली आहे आणि खरंच झोप छान लागते, सकाळी हलकं-फुलकं वाटतं. हा छोटासा बदल पण फायदेशीर आहे.”
व्यायामातही वेगळा दृष्टिकोन
अक्षय कुमारने व्यायामाबद्दल बोलताना सांगितले की तो रॉक क्लायम्बिंग, खेळ आणि नैसर्गिक प्रकारचे व्यायाम करतो. तो म्हणतो,
“मी जिममध्ये वजन उचलत नाही. मला खेळ खेळायला, नैसर्गिक व्यायाम करायला आवडतात. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि मनालाही ताजेपणा मिळतो.”
अक्षय कुमारच्या या फिटनेस सवयी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की तंदुरुस्त शरीरासाठी योग्य आहार, योग्य वेळ आणि शिस्त यापेक्षा मोठं औषध नाही.
The post Akshay Kumar: ६.३० वाजता जेवण, सोमवारी उपवास आणि शिस्तबद्ध दिनचर्या; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट appeared first on Dainik Prabhat.
“}]]
