“मला सगळं माहीत आहे” आणि “मी कधीच चुकत नाही” अशी (मुळात खोटीच) समजूत घेऊन वावरणारी लोकं आपल्या आजूबाजूला नेहमीच दिसत असतात. (यात मीसुद्धा आहे बरं का!) तर, सतत… समोरचा कसा चुकला, किंवा समोरच्याने कसं वागायला हवं हे आपण सतत बोलत असतो.
समोरच्या व्यक्तीतील कमतरता, दोष, चुका काढायला आपण नेहमीच तत्पर असतो. पण दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोटं आपल्याकडे असतात हे ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणजे मी इथे चुकीच्या माणसांचे किंवा चुकीचे समर्थन करते आहे असं मुळीच नाहीये, फक्त चूक दाखवणारा असा तोरा मिरवत असतो की, तो म्हणजे राजा हरिश्चंद्राचाच वंशज असावा. “माझं चुकलं’ असं म्हणायला इथे कुणीच तयार नाहीये हे दुःख आहे.
मुळात आपण माणूस आहोत, तर आपण तर चुका करणारच ना? मुळात समोरचा चुकला आहे हे केवळ एकच माणूस नाही ना ठरवू शकत? हे स्थळ,काळ,वेळ आणि व्यक्तिसापेक्ष असते. कधी कधी आपण गमतीत म्हणतो पण बघा “दहा माणसं बोलव इथे आणि विचार त्यांना की, तू चूक आहेस की नाही’ याचा अर्थ त्या माणसाला खात्री असते की तो बरोबर आहे.
लहान चूक, मोठी चूक किंवा गुन्हा म्हणू आपण हे सगळं जेव्हा एखाद्या नात्यात घडतं आणि ती चूक विसरली न जाता किंवा ती माफ न होता पुढे रेटली जाते तेव्हा ती एखादं घनिष्ट नातं तुटायला सुद्धा कारणीभूत होते आणि तेव्हा खूप वाईट वाटतं. कुठल्याही नात्यापेक्षा काहीही मोठं नसतं अगदी चूकसुद्धा .
एखाद नातं केव्हा जुळतं हो? एकमेकांना आवडतो, विचार जुळतात, आवडी जुळतात, जीवनाच्या ह्या प्रवासात त्या नात्याची सोबत हवी असते. मग ते नातं मैत्रीण, मित्र, दीर किंवा जाऊ, भावजय, नणंद ते अगदी सासू सुद्धा असते बरं
का? म्हणजे ही नाती लग्नानंतर जुळतातच फक्त ती एक नात्यातला एक भाग न होता जीवनाचा, जगण्याचा एक भाग होतात.
एखादी परिस्थिती अशी निर्माण होते आणि त्यात तो माणूस काहीबाही वागतो, त्याला कधीकधी जाणवत, किंवा कळतही नाही की, तो वागतो आहे ते चुकीचे आहे. त्या परिस्थिती त्याला जे योग्य वाटेल (मग ते इतरांच्या दृष्टीने अयोग्यही असू शकते) तो तसा वागतो. कधी कधी त्या चुकीने समोरच्या माणसाचे भौतिक दृष्ट्या नुकसान होत नाही, पण मन दुखावले जाऊ शकते, किंवा विश्वासघातसुद्धा होऊ शकतो. पण मग त्याला समजून न घेता, त्याचे काहीही ऐकून न घेता त्याला संपूर्ण दोषी मानून ते नातं तुटतं. खरंतर प्रत्येकाला सुधारायची संधी ही हवीच असते, किंवा द्यावीच, कारण आपण सुद्धा चुकू शकतो, ही वेळ आपल्यावर सुद्धा येऊ शकते हे तो समोरचा माणूस साफ विसरतो.
खरंतर सॉरी म्हटल्याने कोणी लहान होत नाही किंवा चूक सुधारलीसुद्धा जाऊ शकत नाही, पण ते ही म्हणणारे ह्या जगात खूप कमी आहेत, किंवा कोणी म्हंटलंच तर ऐकणारे खूप कमी, कारण येतो अहंकार आड, जो सर्वात मोठा शत्रू असतो एखाद्या नात्यात. म्हणजे आपण अहंकार पाळू, राग पाळू, द्वेष पाळू , पण माफ करण्याची क्षमता मात्र ठेवणार नाही.
ही चूक माफ ना करण्याचे सुद्धा एक गिल्ट असते बरं का! आणि ते घेऊन आपण कुठवर प्रवास करणार आहोत आयुष्यात जे वेळोवेळी आपल्यालाच कमीपणाची भावना पोसायला मदत करते? एकदा माफ करा किंवा विसरून जा समोरच्याची चूक (जी मुळात चूकही नसेल) बघा किती सुंदर आणि स्वच्छ वाटेल, आपलाच माणूस आहे ना, नातंही आपण जोडलेलं आहे, करा की तडजोड, कुठे काय कमी होणारे ?
तर माणूस व्हा, बाकी काही नाही…
– मानसी चापेकर