सतत बदलणाऱ्या हवेचा परिणाम त्वचा आणि केसांवर होतो. त्यांना हानी पोहोचते. त्यासाठी काय काळजी घ्यावी याची थोडक्यात माहिती.
आयुर्वेदाने नेहमीच माणसाकडे निसर्गाचा एक अविभाज्य घटक म्हणून पाहिलंय. हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम माणसावर होतो आणि माणूस निसर्गात फेरफार करतो. आपल्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतल्याने निरोगी राहण्यास मदत होते. हवामान तसेच पर्यावरणात झालेल्या बदलांची माहिती झाल्याने रोग्याची काळजी घेणे, पर्यायाने रोगाचे निर्मूलन करणे शक्य होते. पृथ्वीवर होणारे बदल लक्षात घेऊन आयुर्वेदाने वसंत, हेमंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, शिशिर हे सहा ऋतू मानले आहेत. मात्र हे सर्व ऋतू प्रत्येक देशांमध्ये जाणवतातच असे नाही. हेमंत, ग्रीष्म हे उत्तर ध्रुवावर तर वर्षा, शिशिर, शरद हे ऋतू दक्षिण ध्रुवावर आढळतात.
शारीरिक आरोग्याची आयुर्वेदिक संकल्पना तीन ऊर्जा संकल्पनांभोवती आहे. हे शरीरातील मानसिक किंवा रासायनिक स्त्रोत आहेत. या ऊर्जाघटकांवर संपूर्ण शरीराची क्षमता अवलंबून असते.
वात, पित्त आणि कफ हे तीन रस जीवनाकरता आवश्यक असून, यांच्या परस्परकार्यातूनच निरोगी जीवन साकारते. या तीन घटकांमध्ये परस्परांत असंतुलन निर्माण झाल्यास त्याची परिणती विविध प्रकारच्या आजारांची निर्मिती होण्यात होते. दोषाचे असंतुलन त्वचा आणि केस यामध्येही दिसून येते. त्यामुळेच त्वचाविषयक उपचारपद्धतींचे संतुलन करण्याची गरज वाढत्या प्रमाणावर भासत असून, ऋतूनुसार दोषाचे प्रकार बदलतात.
वात विकाराने दूषित त्वचा व केस
वातामुळे त्वचा तसेच केस आपले पोषकत्व टिकवून ठेवू शकत नाहीत. त्याकरता पोषकत्व वाढवण्याला प्राधान्य दिले पाहिजे. रासायनिक प्रिझर्वेटिव्हज वापरलेली स्कीन केअर उत्पादने टाळावीत. कारण यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचते आणि ती कोरडी पडते. तुमच्या त्वचेला तसेच केसांना पुरेसे पोषण मिळावे, यासाठी गरम, पोषक अन्न घ्यावं. कोरडे अन्न टाळा. रात्री लवकर झोपा आणि दररोज तेलाने मालिश करा.
गरम तसेच स्निग्ध पदार्थाचे सेवन करा (तूप व ऑलिव्ह ऑइल सर्वात चांगले)
संपूर्ण दिवसभर कोमट पाणी प्या आणि भरपूर प्रमाणात गोड, रसपूर्ण फळे खा. साधारणत: आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक असतं.
अल्कोहोलवर आधारित स्कीन क्लेनसर्स वापरू नका
साबणाऐवजी चणाडाळीची पावडर वापरा
दाणे, बदाम, अक्रोड आणि त्याचे तेल, तीळ, सूर्यफुलाच्या बिया आणि त्याचे तेल, द्राक्षबियांचे तेल, प्रिमरोज ऑइल, सोयाबीन ऑइल, सर्व प्रकारची धान्ये यांचे सेवन करावं.
कॅफीन, शीतपेय, साखर, चॉकलेट, पोटॅटो चीप्स आणि जंक फूड टाळावं.
पिंडाथायलम किंवा धनवंतरम कुझम्फू किंवा बालअश्वगंधी कुझम्फू यासारखे आयुर्वेदिक तेल दररोज आंघोळीपूर्वी 15 मिनिटे लावावं
लवकर आणि नेहमी कोमट पाण्याने अंघोळ करावी.