लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये मधुमेह सर्रास आढळून येणारा आजार झाला आहे. लहान वयात मधुमेह झाल्यास तो टाइप वन किंवा तरुणांना होणारा मधुमेह म्हणून ओळखला जातो. या प्रकारामध्ये शरीर इन्सुलिन बनवण्याचे थांबवते आणि मुलाला त्याचे/तिचे संपूर्ण आयुष्य बाहेरच्या इन्शुलिनवर अवलंबून राहावे लागते.
मात्र, गेल्या दोन दशकांत 10 ते 14 वर्ष वयोगटाच्या लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये टाइप टू प्रकारच्या मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे, विशेषतः ज्या मुलांच्या घरात टाइप टू प्रकारच्या मधुमेहाची आनुवंशिकता आहे, त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त आहे.
टाइप टू मधुमेहामध्ये जरी शरीरात इन्शुलिन तयार होत असले तरी शारीरिक हालचाल नसणे किंवा अयोग्य आहार अशा इतर काही कारणांमुळे इन्शुलिनला प्रतिकार होतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये ग्लुकोज साचायला लागते. कालांतराने हे साचलेले ग्लुकोज धोकादायक पातळीवर पोहोचते आणि म्हणूनच मुलाला उर्वरित आयुष्य बाहेरच्या इन्शुलिनवर अवलंबून राहावे लागते.
मधुमेहाला कारणीभूत धोकादायक घटक :
मुलांमध्ये अतिरिक्त जाडी हे टाइप टू प्रकारचा मधुमेह होण्यासाठी कारणीभूत ठरणारे प्रमुख कारण आहे. मुलांमध्ये जाड पेशींचे प्रमाण जास्त तितका इन्शुलिनला जास्त प्रतिकार होतो. मात्र, टाइप टू मधुमेह होण्यामागे जाडी हे एकमेव कारण नाही.
मधुमेहाची आनुवंशिकता :
पालक किंवा भावंडांमध्ये टाइप टू प्रकारच्या मधुमेहाची आनुवंशिकता असेल, तर तो होण्याची शक्यता जास्त असते. मात्र, अशावेळेसही हा आजार जीवनशैलीशी निगडित आहे की जनुकीय हे सांगणे अवघड असते.
इन्शुलिन विरोधाशी संबंधित अडचणी :
बहुतांश लहान मुलांमध्ये टाइप टू मधुमेहाचे निदान होते तेव्हा ती तारुण्याच्या उंबरठ्यावर, विकासाच्या टप्प्यावर असतात, जिथे प्रतिकार वाढलेला असतो. या कारणांमध्ये स्थूलत्व हे कारण मधुमेहासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरते. मूल जाड असल्यास त्याला मधुमेह होण्याची शक्यता दुप्पट होते. मुलांमध्ये स्थूलत्व येण्यामागे जीवनशैली आणि खाण्याच्या शैली कारणीभूत असतात.
मुले शारीरिक खेळ खेळत नाहीत :
आजची मुले शारीरिक खेळ खेळत नाहीत आणि त्यांचा बहुतेक वेळ लॅपटॉप, टॅब्लेट व स्मार्टफोनमध्ये घालवतात. शरीराला चपळ आणि सक्रिय ठेवणारे मैदानी खेळ ते खेळत नाहीत. मूल जितके निष्क्रिय असेल, तितके त्याला/तिला टाइप टू मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. शारीरिक हालचालींमुळे मुलांचे वजन नियंत्रणाखाली राहते, शरीरातील ग्लुकोज
ऊर्जेच्या रूपात खर्च होते आणि शरीरातील पेशी इन्शुलिनला जास्त चांगल्याप्रकारे प्रतिसाद देतात.
तसेच फास्ट फूड आपल्या जीवनशैलीचा एक भाग झाल्यामुळे ही मुले पौष्टिक आहार घेत नाहीत तसेच त्यांच्या खाण्याच्या सवयी अनारोग्यकारक असतात. पालकही कामात व्यग्र असल्यामुळे मुलांना घरी शिजवलेले पौष्टिक अन्न देण्याऐवजी बाहेरचे रेडी टू इट अन्न देतात. अशाप्रकारची जीवनशैली भारतात झपाट्याने विकसित होत असून त्यामुळे जीवनशैलीविषयक आजारांचे प्रमाण मुलांमध्येही वाढत आहे.
लक्षणे:
टाइप टू मधुमेहामुळे आरोग्यात गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते, म्हणूनच त्याची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. मधुमेहजन्य परिस्थितीतही टाइप वन किंवा टाइप टू मधुमेहाप्रमाणेच हृदयरोग होण्याची शक्यता वाढत असते. उच्च रक्तशर्करेमुळे होणाऱ्या टाइप टू मधुमेहाची लक्षणे पुढीलप्रमाणे-
तहान वाढणे
भूक वाढणे (विशेषतः खाल्ल्यानंतर)
तोंड कोरडे पडणे
सतत लघवीला होणे
अचानक वजन वाढणे
थकवा
धूसर दिसणे
डोकेदुखी
शुद्ध हरपणे (दुर्मीळ)
मधुमेहाची लक्षणे चटकन दिसून येत नाहीत :
मधुमेहामध्ये गुंतागुंत होणे टाळण्यासाठी वेळीच मधुमेहाचे निदान करून घेणे आणि वेळेवर उपचार सुरू करणे आवश्यक आहे. बहुंताश वेळेस आरोग्यात गुंतागुंत झाल्याशिवायटाइप टू मधुमेहाचे निदान होत नाही. बऱ्याचदा मधुमेहाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत किंवा वर दिलेली टाइप टू मधुमेहाची लक्षणे अतिशय सावकाशीने दिसायला लागतात.
प्रतिबंध :
मधुमेह बरा होत नसल्यामुळे त्याला प्रतिबंध करणे मुलांच्या दृष्टीने गरजेचे आहे. तो नंतरच्या टप्प्यावर नियंत्रित करता येतो. लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये अतिरिक्त जाडीमुळे होणारा मधुमेह त्यांना आरोग्यपूर्ण वातावरणात वाढवून तसेच खाण्याच्या चांगल्या सवयी लावून टाळता येईल.
लहान मुले पालकांचे अनुकरण करत असल्यामुळे पालकांनी त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांच्यासाठी काय वाईट व काय चांगले याची जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे. मुलांमधील मधुमेहाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांना पुढील प्रयत्न करता येतील. मुलांना दररोज किमान 20 मिनिटे शारीरिक व्यायाम किंवा हालचाल करण्यास सांगावे. आरोग्यपूर्ण आणि रूचकर पदार्थ बनवावेत.
मुलांना किराणा खरेदीसाठी घेऊन जावे. पदार्थांवरील लेबल्स वाचवण्यास आणि आरोग्यदायी पदार्थ शोधण्यास शिकवावे.
फॅट्स, साखर आणि मीठाचे अती प्रमाण असलेल्या पदार्थांचे मर्यादित सेवन करावे. कॉम्प्युटर, टॅब्लेट्स, स्मार्ट फोन्स आणि टीव्ही पाहण्याचा मुलांचा वेळ दररोज दोन तासांपर्यंत आणावा. तुमच्या मुलांचे वजन योग्य आहे की नाही तसेच त्यांना टाइप टू मधुमेह होण्याची शक्यता आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्यावे.
बालकांचे आयुष्य इन्सुलिनच्या इंजेक्शनवर अवलंबून?
भारतात 19 हजार बालके टाइप टू मधुमेहाने त्रस्त आहेत. हा एक ऑटोइम्युन आजार आहे, ज्यात आजारी व्यक्तीच्या शरीरातील प्रतिकारक क्षमता त्याच्या पॅनक्रियामध्ये इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींना नष्ट करून टाकते. यामुळे बालकांचे आयुष्य इन्सुलिनच्या इंजेक्शनवर अवलंबून राहते. टाइप टू मधुमेहाने त्रस्त बालकांच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिनचे इंजेक्शन घेणे खूप आवश्यक असते.
इन्सुलिनच्या कमतरतेमुळे हायपर ग्लायसिमिया होतो आणि त्यावर उपचार केले नाही तर किटोसिस आणि किटोएसिडोसिस होतो. टाइप टू मधुमेहाने त्रस्त बालकांना वाचविण्यासाठी व त्यांच्या शरीरातील मेटाबोलिक प्रक्रिया सामान्य पद्धतीने व्हाव्या यासाठी दररोज अनेक वेळा इन्सुलिन द्यावे लागते.
आता इन्सुलिन पम्प उपकरण आणि ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम उपलब्ध झाल्यामुळे बालकांमधील टाइप टू डायबिटीसचे नियंत्रण पूर्वीपेक्षा अधिक सोपे व कमी त्रासदायक झाले आहे आणि यामुळे डायबिटीजने त्रस्त बालकांच्या जगण्याचा दर्जाही वाढतो. इन्सुलिन पंप आल्यामुळे जगण्याचा दर्जा व सोय तर वाढली आहेच, पण यामुळे रुग्णाला सातत्याने इंजेक्शन घेऊन फिरण्याची गरजही उरलेली नाही.
हे पोर्टेबल उपकरण असल्याने बालकांच्या जीवनचर्येवर त्याचा काही फरक पडत नाही. इन्सुलिन पंप उपकरण मुलांमधील शारीरिक सक्रियता व त्यांच्या गरजेनुसार योग्यवेळी इन्सुलिनचा डोस शरीरात जातो आणि कोणत्याही वेळी, कुठल्याही परिस्थितीत याद्वारे इन्सुलिन देणे सोपे आहे. इन्सुलिन पंप उपकरणामुळे टाइप टू मधुमेहाने त्रस्त रुग्णांच्या आयुष्याचा दर्जा मोठ्या प्रमाणात सुधारतो.
– कांचन नायकवडी