गुडीपाडव्याच्या दिवशी गुडीला बांधायला आणि त्या दिवशी कडुनिंबाची धने, जिरे, हिंग इ. घालून केलेली चटणी कडू लागते म्हणून वाकडे तोंड करून खायची असते, ही आठवण कडुनिंब म्हटलं की, प्रथम येते.
कडुनिंबाचे वानसशास्त्रीय नाव आहे “ऍझाडिरक्टा इंडिका’ हा वृक्ष किनारपट्टीचा भाग सोडला तर महाराष्ट्रातच काय, पण जवळजवळ भारतभर सर्वत्र आढळतो. बहुतेक वेळा त्याची वाढ नैसर्गिकरित्याच होते.
कडुनिंबाची झाडे सर्वत्र आढळतात. साधारण 75 इंचांपेक्षा जास्त पाऊस असतो तेथे ही झाडे आढळत नाहीत. कडुनिंब नावाप्रमाणेच याचा रस कडू चवीचा असतो. कडू चवीमुळे कफनाशाचे काम करतो. वसंत ऋतुत कफदोष वाढलेला असतो म्हणून पाडव्याला कडुनिंब खायला सांगितला आहे. एकच दिवस कडू रस खायचा नाही तर वसंत ऋतुमध्ये कडूरस अल्प प्रमाणात खाल्ला असता कफाचे विकार होणार नाहीत, ही यामागची कल्पना आहे.
तोंड हे कफाचे स्थान आहे. तेथील जादा कफ कमी करण्यासाठी दात व हिरड्या घासण्यासाठी कडू, तूरट रसाचे दंत मंजन वापरावे, असे आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे. काही जमातींमध्ये कडूनिंबाच्या कांड्यांनी काही जमातींमध्ये कडुनिंबाच्या कांड्यांनी दंत धावन करतात, ही गोष्ट आरोग्यदायक आहे.
कडुनिंबाच्या बियांमध्ये तेल असते. हे तेल साबण तयार करण्यासाठी वापरतात. नीम साबण त्वचा विकारांत उत्तम आहे. कडुनिबांची पाने उकळवलेल्या पाण्याने स्नान केल्यास त्वचा विकार बरे होतात. बाजारात मिळणारे “परिभद्र तेल’ कडुनिंबापासूनच करतात. कडुनिंबाचेच परिभद्रफ असेही नाव आहे.
हे तेल जखमा बऱ्या होण्यासाठी उपयोगी आहे. त्वचा विकारांत उपयोगी आहे. तसेच त्वचेला कंड (खाज) येत असेल तर उपयोगी आहे. त्वचा खाजविल्यामुळे सूज येते, ती या तेलाने कमी होते. त्याने विचर्चिका (एक्झिमा) बरा होतो. यात प्रथम कडुनिंबाची पाने वाटून त्याची चकती एक्झिमाचे जागी 1 तास ठेवावी. नंतर “परिभद्र तेल’ लावावे. त्यावर उपचार नेटाने करावे लागतात.
कडुनिंबाचे काढ्याने ताप बरा होतो. मुदतीचा ताप याच्या काढ्याने बरा होतो. तापावर देण्याच्या बऱ्याच काढ्यांत कडुनिंब हे घटकद्रव्य आहे. विषमज्वर येऊन गेल्यावर येणारा थकवा कमी करण्यासाठी गुळवेल व कडुनिंबाच्या सालीचा काढा दिवसातून तीन वेळा दोन आठवडे द्यावा.
कडुनिंब रक्तशुद्धीचे काम करतो. त्वचा विकारांत कडुनिंबाचा उपयोग पोटात व ब्राह्योपचारासाठी करतात. मलेरियामध्ये कडुनिंब सालीचा काढा उपयोगी आहे. आम्लपित्तामध्ये कडुनिंब उपयोगी आहे.
काही लोक बाळंतपणानंतर कडुनिंबाचा रस प्यायला देतात. यामुळे गर्भाशयाची उत्तम शुद्धी होते. म्हणून यास “बाळंतनिंब’ असेही म्हणतात.
अंगावर पांढरे जाते त्यावर कडुनिंब साल व बाभूळ सालीचा काढा उपयोगी आहे. अंगाचा दाह होत असल्यास कडुनिंब वाटून लावतात. यकृत विकारात याचा चांगला उपयोग होतो. यकृत विकारावर उपयोगी औषध आरोग्यवर्धिनी. हे औषध कडुनिंब रसामध्ये घोटतात.
कडुनिंब मेदोरोगात उपयोगी आहे. म्हणून स्थूल लोकांना आणि प्रमेही (डायबेटीस) असलेल्या लोकांना कडुनिंब रस प्यायला देतात. तसेच त्यांनी आरोग्यवर्धिनी 2/2 गोळ्या सकाळी- सायंकाळी पाण्याबरोबर खाव्यात.
कावीळमध्ये कडुनिंब पानांचा रस 1 चमचा + मध 1 चमचा मिसळून प्यावे व वर पाणी प्यावे. कधी कधी याने उलटी होते; पण त्याने बरे वाटते. कडुनिंब फुले 2 चमचे ग्लासमध्ये घालावीत. त्यावर 1 कप कोमट पाणी ओतावे व झाकून ठेवावे. 1 तासाने गाळून प्यावे. याने तापानंतर अशक्तपणा येतो तो बरा होतो. कडुनिंब पाने जाळून केलेला धूर डास, पिसवा, कृमी, कीटक यांचा नाश करणारा आहे.
कासवछाप अरगबत्तीमध्ये कडुनिंब आहे. झाडावर कीड पडते त्यावर कडुनिंबाचा रस किंवा कडुनिंबाचा काढा करून फवारल्यास कीड मरते. रासायनिक कीटकनाशकांपेक्षा कडुनिंबाचा उपयोग चांगला. पेरूमध्ये कीडे होऊ नयेत म्हणून कडुनिंबाच्या पानात ठेवतात.
धान्याला कीड लागू नये म्हणून तांदळात, गव्हात कडुनिंब पाने मिसळून धान्य भरून ठेवतात. पुस्तकात कडुनिंबाची पाने ठेवल्याने पुस्तकांना कीड लागत नाही. बागांमध्ये, घरातील परसबागेत कडुनिंबाची झाडे लावावीत.
झाडाला आलेला डिंक शक्तिवर्धक म्हणून खाण्यास उपयोगी आहे. अशा या बहुपयोगी कडुनिंब कल्पवृक्षाची माहिती आपण घ्यायलाच हवी.
====================