अगदी सोप्या शब्दांत सांगायचे झाले, तर हृदय म्हणजे शरीराचा एक मोटर पंप असतो, जो रक्ताचे अभिसरण सर्व शरीरात करत असतो. हृदय कार्यक्षीणता म्हणजे हृदयातील स्नायू शरीराच्या गरजेनुसार आवश्यक तेवढे रक्त पंप करू शकत नाहीत.
हृदय कार्यक्षीण होण्याचे अनेक प्रकार असतात. आपल्या हृदयात चार कप्पे असतात. दोन उजव्या बाजूला असतात आणि दोन डाव्या बाजूला असतात. कधी उजवीकडचे तर कधी डावीकडचे कप्पे निकामी होत असतात.
हृदयाचे स्नायू आकुंचन आणि प्रसरण पावत असतात. त्यामुळे जेव्हा स्नायू आकुंचित होण्याला अडथळा निर्माण होतो, तेव्हा त्याला सिस्टॉलिक फेल्युअर असे म्हणतो. जेव्हा स्नायू प्रसरण पावण्याला अडथळा निर्माण होतो, तेव्हा त्याला डायास्टॉलिक फेल्युअर म्हणतात.
हृदय कार्यक्षीण होण्याची कारणे
हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होणे, उच्च रक्तदाब, हृदयातील झडपेला इजा होणे, हृदयाच्या स्नायूंमध्ये असाधारण कण साचणे, फुप्फुसातील रक्तवाहिनीचे एम्बोलायझेशन (संरोध) ही हृदय कार्यक्षीण होण्याची कारणे असू शकतात.
यापैकी काही आजार बरे करता येऊ शकतात. काही प्रकारांमध्ये प्रकृती पूर्ववत होणे शक्य नसते. त्यामुळे हृदय निकामी होण्यासाठीचे नक्की कारण शोधून काढण्यासाठी चाचण्या कराव्या लागतात.
हृदय कार्यक्षीण होण्याची लक्षणे
हृदय अचानक बंद पडण्याच्या क्रियेला ऍक्युट हार्ट फेल्युअर म्हणतात. या परिस्थितीत तुम्ही काही तासांपूर्वीपर्यंत सामान्य असता आणि अचानक तुम्हाला धाप लागते, हृदयाचे ठोके धडधडतात, श्वास अडकतो, खोकला येतो. पायाला सूज येते. तुम्हाला थकवा येतो किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. हृदयविकाराचा झटका आला असेल तर छातीत दुखते.
छातीत दुखत असेल, घेरी येत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल, हृदयाचे ठोके अनियमित असतील किंवा धडधडत असतील, अचानक व खूप धाप लागत असेल आणि गुलाबी रंगाचा फेसयुक्त कफ बाहेर पडत असेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरकडे जावे. हृदय बंद पडण्याच्या सौम्य प्रकारांना क्रॉनिक म्हटले जाते. जेव्हा तुम्हाला ऍक्युट हृदय कार्यक्षीणतेची नाट्यमय लक्षणे जाणवत नाहीत, पण तरीही हृदयक्रिया क्षीण होत असते तेव्हा तुमच्या शरीरात हळुवारपणे काही बदल होत असतात. काही दिवस तुम्हाला फार बरे वाटत असेल, तर काही दिवस अशक्तपणा जाणवत असेल आणि थकवा येत असेल. तुमचे वजनही वाढेल.
वैद्यकीय भाषेत तुमच्या शरीरात पाणी साठत जाईल. आपल्या शरीरात नक्की काय बदल होतोय हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरची भेट घ्या. दुर्लक्ष करू नका.
उपचार : मी वर नमूद केल्याप्रमाणे हृदय कार्यक्षीणतेच्या बहुतेक कारणांवर उपचार करता येऊ शकतात. त्यांच्यापैकी काही बरे केले जाऊ शकतात, तर काही लक्षणे बरी करता येऊ शकत नाहीत. पण, औषधांच्या माध्यमांतून त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.
काही लक्षणे मात्र, औषधांनी नियंत्रित करता येत नाहीत. कमाल प्रमाणात औषधे घेऊनही हदय कार्यक्षीणतेची परिस्थिती बिकट होत जाते आणि तुम्हाला अनेकदा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागू शकते. हृदय कार्यक्षीणतेच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही रुग्णांना वर्षातून दोन-तीन वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागू शकते.
(heart health articles in marathi)