-मानसी चांदोरीकर
रविकाका मनोजला घेऊन स्वतःहून भेटायला आले. आल्यावर त्यांनी प्रथम मनोजची ओळख करून दिली. मनोज खूपच तणावाखाली वाटत होता. मनोजचं 4 महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. पण या 4 महिन्यातच त्याची त्याच्या बायकोबरबर भांडणं होऊ लागल्यामुळे मनोज खूप तणावाखाली होता.
मनोज आणि त्याच्या पत्नीत खूपच वाद व्हायचे. ती सतत मनोजशी कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडायची. त्यामुळे तिच्यापासून घटस्फोट घ्यावा असे मनोजला वाटू लागले होते. म्हणूनच काका, म्हणजे मनोजचे वडील त्याला घेऊन मला भेटायला आले होते. काकांचं बोलणं होईपर्यंत मनोज एकदम शांत, मान खाली घालून शांत बसून राहिला. तो काहीच बोलायला तयार नव्हता आजही त्या दोघांमध्ये भांडण झाले होते म्हणून तो ताणाखाली होता.
काकांशी बोलून झाल्यावर मी मनोजशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण मनोज फारसे काहीच बोलला नाही. विचारलेल्या प्रश्नांची त्याने जेमतेम उत्तरे दिली व तो शांत बसला. त्याचा विश्वास संपादन करण्याच्या दृष्टीने या सत्राच्या शेवटी मी प्रयत्न केला, पण तो काही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्याने पुढील भेटीत बोलायची तयारी दाखवली. त्यामुळे हे सत्र येथेच थांबवून मी पुढील सत्र निश्चित केले.
ठरल्याप्रमाणे पुढील सत्रास मनोज एकटाच भेटीसाठी आला. या सत्रात तो बराच शांत होता. आणि त्याने बोलायचीही तयारी दाखवली. मनोज एका आय.टी. कंपनीत काम करत होता. मॅडम मी एका खासगी कंपनीत काम करतो. मला बराच चांगला पगार आहे. पण त्यामुळे मला कंपनीत जास्त वेळ देणं मला भाग आहे. या गोष्टीची कल्पना मी तिला लग्नाआधीच दिली होती.
तेव्हा तिने मला चांगला प्रतिसाद दिला. मी समजू शकते. मला काही हरकत नाही. असं तिने सांगितलं. म्हणून तर आम्ही पुढचा विचार केला व लग्न केलं. पण आता मात्र ती या मुद्यावरून माझ्याशी सतत भांडते. माझ्यावर संशय घेते. तिला असं वाटतं की मी बाहेर कोणालातरी भेटतो. माझे बाहेर कोणाशी तरी प्रेमसंबंध आहेत, म्हणून मी उशिरा येतो आणि तिला वेळ देत नाही. मी तिला खूप पद्धतीने समजावले.
आईबाबांनीही तिला खूप समजावलं; पण तिचा माझ्यावर अजिबात विश्वास नाही. ती आईबाबांशीही भांडते. ते मला अजिबात आवडत नाही. तिला शॉपिंग करायलाही खूप आवडते. त्यासाठी ती सतत पैसे मागत राहते. सतत शॉपिंग करणं हा तिचा छंद आहे. त्याबद्दलही आम्ही काही बोललो की, तिला लगेच राग येतो. आणि एकदा चिडली की, 2-3 दिवस घरातल्या कोणाशी बोलत नाही. घरात काही काम करत नाही.
सगळा ताण आईवर येतो. तिच्या माहेरी ती एकटीच असल्याने खूप लाडात वाढलीये. तिथे तिचे सगळे लाड पुरवले जातात. आणि इथे देखील तिला तेच अपेक्षित आहे. आता तुम्हीच सांगा हे कसं शक्य आहे? मला सगळ्याचा कंटाळा आलाय. माझा सगळा पगार हिच्या खरेदीतच खर्च होऊन जातो. मनोजशी अजून थोडं बोलल्यावर हे सत्र थांबवून पुढच्या सत्रात तिला घेऊन येण्यास सांगितले. पहिल्या सत्रात ती मनोजबरोबर आली. पण या सत्रात ती मनोजशी खूप भांडली. त्यामुळे हे सत्र थांबवून पुढील सत्रात तिला एकटीला बोलावले.
एकटं येण्याची तिची इच्छा नव्हती, पण मनोजच्या आग्रहामुळे ती नाइलाजाने भेटायला आली. या सत्रात प्रथम विश्वास संपादनाच्या दृष्टीने तिच्याशी संवाद साधला व नंतर मूळ मुद्द्य्ावर चर्चा केली. या चर्चेत तिचा स्वभाव हट्टी असल्याचे, आणि तापट असल्याचेदेखील लक्षात आले. याच कारणांमुळे मनोजची व तिची भांडणे होत होती हे लक्षात आले. नंतर पुढील सत्रांमध्ये मानसशास्त्रीय उपचार पद्धतीमधील वेगवेगळी तंत्रे वापरून मी तिला हळूहळू तिच्या या स्वभावाची जाणीव करून दिली.
अर्थातच या सगळ्याला सुरुवातीला तिचा विरोधच होता. आपल्या स्वभावातील हे दोष मान्य करणे तिला अवघड जात होते. परंतु संवादादरम्यानच्या उपचारपद्धतीमुळे तिच्या ते लक्षात आले व तिने बदल करण्याची तयारी दाखवली. अर्थात यासाठी तिला बराच वेळ लागला. पण तिने नेटाने प्रयत्न करून हा स्वभाव बदलला. त्यामुळे मनोज, घरचे व तिची भांडणे, वाद कमी झाले, त्यांचा संसार सुखाने सुरू झाला.
(केसमधील नावे बदलली आहेत.)