[[{“value”:”
Aam Panna Powder Recipe: उन्हाळा आला की घराघरांत कच्च्या कैरीचं पन्हं बनायला सुरुवात होते. आंबट-गोड चवीचं हे पारंपरिक पेय केवळ चविष्टच नाही, तर शरीराला थंडावा देण्यासाठी आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठीही फायदेशीर मानलं जातं. मात्र कच्च्या कैरीचा हंगाम संपला की पन्ह्याची मजा घेणं अवघड होतं. अशावेळी बाजारातील रेडिमेड पावडर वापरली जाते, पण त्यात प्रिझर्वेटिव्ह आणि कृत्रिम रंग असण्याची शक्यता असते. त्यामुळे घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने आम पन्ह्याचं प्रीमिक्स पावडर तयार करणं हा उत्तम पर्याय ठरू शकतो. (Aam Panna Powder Recipe)
हे पावडर एकदा तयार करून ठेवलं की वर्षभर झटपट आम पन्हं बनवता येतं. पाहुणे आले किंवा अचानक काही थंड प्यायची इच्छा झाली, तर फक्त पाण्यात हे मिश्रण घालून काही मिनिटांत स्वादिष्ट पन्हं तयार करता येतं.
हे प्रीमिक्स तयार करण्यासाठी मुख्यतः कच्च्या कैऱ्या लागतात. याशिवाय भाजलेलं जिरं पावडर, काळं मीठ, साधं मीठ, पुदिन्याची पानं, साखर पावडर आणि चाट मसाला लागतो. हे सर्व पदार्थ सहज उपलब्ध होतात. (Aam Panna Powder Recipe)
सर्वप्रथम कच्च्या कैऱ्या स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा धुवून घ्याव्यात. त्यानंतर त्या अगदी पातळ चकत्या करून कापाव्यात. यासाठी चिप्स कटर किंवा सुरीचा वापर करू शकता. कापलेल्या कैऱ्यांमध्ये थोडं साधं मीठ मिसळावं आणि त्या सावलीत वाऱ्याच्या जागी सुकवायला ठेवाव्यात. कैऱ्यांवर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यावी. त्यावर पातळ कापड झाकून ठेवावं.
त्याचवेळी पुदिन्याची पानं स्वच्छ धुऊन त्यांचे देठ वेगळे करून पूर्णपणे सुकवून घ्यावेत. कैरीचे तुकडे पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत सुकवणं महत्त्वाचं आहे. एखादा तुकडा मोडून पाहिला असता तो सहज तुटला, तर समजावं की कैरी व्यवस्थित सुकली आहे. (Aam Panna Powder Recipe)
यानंतर सुकवलेले कैरीचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून पावडर तयार करावी. त्यात भाजलेल्या जिऱ्याचं पावडर, काळं मीठ, चाट मसाला, साखर आणि चवीनुसार साधं मीठ मिसळावं. सुकवलेल्या पुदिन्याची पानंही मिक्सरमध्ये फिरवून या मिश्रणात घालावीत. थोडी पानं हाताने चुरून घातल्यास सुगंध अधिक छान येतो.
हे तयार मिश्रण एका एअरटाइट डब्यात भरून ठेवावं. त्यामुळे ते अनेक महिने टिकू शकतं. पन्हं बनवण्यासाठी फक्त एका ग्लासमध्ये थंड पाणी घ्यावं, त्यात थोडा बर्फ आणि हे प्रीमिक्स पावडर घालून चांगलं ढवळावं. काही क्षणांत घरगुती, नैसर्गिक आणि चविष्ट आम पन्हं तयार होतं.
बाजारातील कृत्रिम पावडरऐवजी घरच्या घरी बनवलेलं हे प्रीमिक्स आरोग्यासाठीही अधिक सुरक्षित ठरतं. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करून पाहा.
“}]]
