उत्तरेत, विशेषत: दिल्ली, राजस्थान, कानपूर या ठिकाणी पंजाबी डिशमध्ये आवर्जून “करेला’ भाजी लोक आवडीने खाताना दिसायचे. गेल्या पंचवीस वर्षांत रोगांचा राजा मधुमेहाचा प्रचार, प्रसार जसा वाढतोय तसतसा कार्ल्याच्या भाजीचा महिमा, मागणी वापर वाढत चालला आहे.
कारले फळ, पाने, फळाची पावडर, रस अशा विविध स्वरूपांत वापरले जाते. कारले खूप कडू आहे, पण जास्त खाऊन-पिऊन उत्पन्न झालेल्या रोगांवर कारल्यासारखी रोज खाऊ शकू, अशी भाजी नाही. कडू रसाचे पदार्थ स्वत:ची चव खराब असली तरी अरुची, कृमी, विषविकार, खूप तहान लागणे इत्यादी कफ विकारांत उत्तम काम देतात.
कारले बहुमूत्रप्रवृत्ती, थकवा, ग्लानी, कृमी, जंत, मोठे जंत, कृमींमध्ये सर्दी, खोकला, खाज, त्वचा रोग, पित्ताची जळजळ, मंदपणा, तोंडाला पाणी सुटणे, तोंडात सतत गोड चव राहणे, डोळे जड होणे, जीभ पांढरी होणे, जखमा चिघळणे, जखमातून पूं वाहणे, यकृत-प्लिहा वृद्धी, विषमज्वर, पांडू, अजीर्ण, शेथ, पित्तप्रकोप, आमवात इत्यादी विविध तीनही दोषांच्या तक्रारीत काम करते. मधुमेह, मधुमेही जखमा, स्थौल्य व स्तनांचे विकार यावरती कार्ले विशेष प्रभावी कार्य करते. औषध म्हणून कारल्याची निवड मात्र चांगली असावी. सरळ आकाराची, फार जूनी नाही अशी कार्ली उपयोगी आहेत. लहान बालकांच्या मधुमेहात शक्यतो कारले हे फळ वापरू नये.
कारल्याच्या पानांचा रस विषमज्वर व यकृत प्लिहावृद्धीमध्ये परिणामकारक उपशम देतो. विषमज्वर किंवा टाइफॉईड हा खराब पाणी व त्यातील जंतुंमुळे उद्भवणारा विकार आहे. अन्नवह महास्रोतसांत हे जंतू पुन:पुन्हा ज्वर उत्पन्न करतात. ताप नॉर्मलला येऊ देत नाहीत. त्याकरिता कारल्याच्या पानांचा रस प्यावा. यकृत प्लिहा वाढलेली असताना अग्नीचे बल कमी पडते. रक्तातील श्वेत कण वाढतात. अशा वेळी कारल्याच्या पानांचा रस यकृत व प्लिहाच्या उत्तेजनाचे काम करतो. त्यामुळे नवीन जोमाने रक्त बनू लागते.
मधुमेहात तळपायाची आग होते. त्याकरिता कारले पानाचा रस प्यावा. रातांधळे विकारात डोळ्यावर बाहेरून कारले पानांचा रस व मिरपूड असा लेप लावावा.
मधुमेहाकरिता कारले रस, पावडर, भाजी यांचा सर्रास प्रचार चालू आहे. इथे थोड्या तारतम्याची गरज आहे. ताज्या कारल्याचा रस फार प्रभावी आहे. तरुण, बलवान, भरपूर रक्तशर्करा वाढलेल्या मधुमेही रुग्णाला पहिले चार-आठ दिवस कारल्याचा पाव अर्धा कप रसाने बरे वाटते. त्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी रक्तशर्करा तपासावी. ती खूप कमी असेल तर मग कारले रसाचे प्रमाण कमी करावे. त्याऐवजी अधूनमधून कारले भाजी, कारले चूर्ण असा वापर करावा. कारल्याचा रस घेऊन ज्यांना गरगरू लागते त्यांनी रस घेणे लगेच थांबवावे. अर्धा चमचा साखर किंवा खडीसाखरेचा खडा खावा.
वृद्ध रुग्णांनी, साठ वर्षांच्या वरच्या मधुमेहींनी कार्ल्याच्या फळाचे सावलीत वाळवून केलेल्या चुर्णाचा वापर करावा. त्याचे प्रमाण कमी जास्त करता येते. लघवीला वास येणे जोपर्यंत आहे, लघवी गढूळ आहे तोपर्यंत कारले चूर्ण नियमित घ्यावे. लघवीचा वर्ण निवळला की प्रमाण कमी करावे.
रक्तातील साखरेचे नियंत्रण झाल्यावर कारल्याचे लोणचे, कमी गूळ घालून पंचामृत कारल्याचा कडूपणा कमी करून तयार केलेली भाजी असा वापर चालू ठेवावा. पित्तविकार, सांधेदुखी, मधुमेहात वजन घटणे या तक्रारी असणारांनी कारले खाऊ नये, पंजाबी ढंगाची भरपूर तेल, डालडा असलेली कारल्याची भाजी काहीच गुण देणार नाही.