हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंबाबत प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञांनी इशारा दिला आहे. 2030 पर्यंत हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर असेल, असा इशारा हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सीएन मंजुनाथ यांनी दिला आहे. त्याचवेळी ते असेही म्हणाले की, तरुण आणि मध्यमवयीन लोकांमध्ये हृदयाशी संबंधित समस्या वाढत आहेत, हे अतिशय चिंताजनक आहे.
डॉ सीएन मंजुनाथ हे जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हस्कुलर सायन्सेस अँड रिसर्चचे संचालक आहेत. ‘हेल्दी मेडिकॉन 2022’ या विषयावर एचएएलच्या डॉक्टर्सच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, या धोक्याचा सामना करण्यासाठी तणावापासून दूर राहणे, निरोगी जीवनशैलीच्या सवयी विकसित करणे आणि सर्वसमावेशक एकात्मिक दृष्टीकोन विकसित करणे आवश्यक आहे.
हृदयविकाराचा झटका कधी येऊ शकतो?
जेव्हा शरीरातील रक्तवाहिनीत रक्त प्रवाह सुरळीत होत नाही आणि रक्त गोठण्यास सुरुवात होते. त्यामुळे हृदयापर्यंत रक्त पोहोचत नाही आणि त्याच वेळी हृदयाला ऑक्सिजन मिळणेही बंद होते. या स्थितीत हृदयविकाराचा झटका येतो. हृदयविकाराचा झटका एखाद्या व्यक्तीसाठी घातक ठरू शकतो. मात्र तातडीने उपचार केल्यास रुग्णाला वाचवता येते.
वायू प्रदूषण हे देखील एक कारण –
वायू प्रदूषण ही भारतातील एक अतिशय गंभीर समस्या आहे. देशातील अनेक शहरांतील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात म्हटले आहे की, वायुप्रदूषणाच्या संपर्कात आल्यानंतर एका तासाच्या आत व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. या अहवालात असेही म्हटले आहे की, हवेतील प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे रस्त्यावर धावणारी वाहने, विद्युत उपकरणे आणि बांधकाम स्थळांवरून उठणारी धूळ. संशोधनानुसार, वायू प्रदूषणामुळे जगभरात 42 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.