जगभरात अनेक प्रकारची फळे आढळतात, ज्यांच्या किमती वेगवेगळ्या असतात. उन्हाळ्यात काही फळांची मागणी वाढते. भारतासह जगभरात अनेक प्रकारची फळे आणि भाज्या आढळतात. भारतात फळांची किंमत साधारणतः 400 ते 500 रुपये प्रति किलो असते. आंबा, लिची, खरबूज आणि टरबूज (कलिंगड) या फळांना उन्हाळ्यात जास्त मागणी असते. भारतात मिळणाऱ्या कलिंगडाची कमाल किंमत १०० रुपये आहे. मात्र असे एक कलिंगड आहे ज्याची किंमत लाखोंमध्ये आहे. सामान्य माणूस हे कलिंगड विकत घेण्याचा विचारही करू शकत नाही.
उन्हाळ्यात कलिंगड खायला सर्वानाच आवडते. उन्हाळ्यात मागणीनुसार कलिंगडाच्या किमती चढ-उतार होतात आणि वाढतात. पण आम्ही तुम्हाला ज्या कलिंगडाबद्दल सांगणार आहोत त्याचा लिलाव केला जातो आणि प्रत्येकजण ते खरेदी करू शकत नाही. चला जाणून घेऊया या अनोख्या आणि दुर्मिळ कलिंगड्याविषयी…
जपानमध्ये आढळणारे हे दुर्मिळ कलिंगड जगातील सर्वात महागडे कलिंगड असल्याचे म्हटले जाते. डेन्सुक प्रजातीच्या या कलिंगडला लोक ‘काळा कलिंगड’ (ब्लॅक वॉटरमेलन) असेही म्हणतात. हे फक्त जपानच्या होक्काइडो बेटाच्या उत्तरेकडील भागात आढळते. या दुर्मिळ प्रजातीच्या कलिंगड्याचे उत्पादन खूपच कमी आहे.
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे डेन्सुक प्रजातीच्या कलिंगड्याचे वर्षभरात केवळ 100 नगच तयार होतात. त्यामुळे ही फळे बाजारात सरसकट येणे कठीण असते.
डेन्सुक प्रजातीचे हे कलिंगड इतके खास आहेत की त्यांचा दरवर्षी लिलाव केला जातो आणि ते दुकानात विकले जात नाहीत. या कलिंगड्यासाठी मोठ्या बोली लावल्या जात असून त्यांची किंमत लाखोंच्या घरात आहे.
2019 मध्ये या प्रजातीच्या कलिंगड्याचा लिलाव करण्यात आला, ज्याची किंमत 4.5 लाख रुपये होती. मात्र या आगळ्यावेगळ्या कलिंगडालादेखील करोनाचा फटका बसला आहे, ज्यामुळे त्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली आल्या आहेत.
करोना महामारीच्या काळात दोन वर्षांत या विशिष्ट कलिंगडाच्या किमतीत घट झाली असली तरी, हे काळे कलिंगड जगातील सर्वात महाग आणि दुर्मिळ फळ आहे. त्याच्या वैशिष्ट्यामुळे ते अत्यंत दुर्मिळ आहे.
हे खास कलिंगड बाहेरून चकचकीत आणि काळे दिसते आणि आतील लाल भाग कुरकुरीत असतो. इतर कलिंगड्यांपेक्षा ते चवीला अधिक गोड असते,शिवाय त्यात बियाही फार कमी असतात. हे फळ खाणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार ते अन्य कोणत्याही फळांपेक्षा अधिक स्वादिष्ट आणि गोड आहे.
असे म्हटले जाते की या दुर्मिळ प्रजातीचे प्रत्येक कलिंगड महाग विकले जात नाही. पहिल्या पिकाचे कलिंगड फक्त महाग आहेत. यानंतर तेथे आलेले कलिंगड अगदी 19 हजार रुपयांपर्यंत विकले जाते. परंतु असे असूनही, ते सामान्य कलिंगडांपेक्षा कितीतरी पटीने महाग आहे.