
हार्ट अटॅक ओळखा
October 27th, 9:32amOctober 27th, 9:35am
प्रभात वृत्तसेवाlatest-news
छातीत दुखणे, सौम्य वेदना किंवा ठरावीक प्रकारचं दुखणं, व्यायामाचे प्रकार केल्यानंतर दुखणं येणं, उदा. चालणं, जिने चढणं, सायकल, आंघोळ, जेवण. उलटी किंवा मळमळ ब-याचवेळा आपण पित्ताचा त्रास म्हणतो, पण तो हृदयापासून असू शकतो. ऍसिडीटी म्हणून दुखण्याकडे किंवा मळमळीकडे दुर्लक्ष करू शकतो.
काही कारण नसताना अचानक काही सेकंदासाठी चक्कर येणे, छाती जड वाटणे छातीवर दाब येणे, छाती आवळल्यासारखी वाटणे, वेदना जबडयावर किंवा मानेवर आणि डाव्या हातावर जाणे, दम लागणे श्वास घेण्यासाठी जास्त प्रयत्न करावा लागणे, घाम येणे काहीही श्रमाचे काम न करता, अचानक घाम येणे, कोरडा खोकला दुस-या कोणत्याही कारणाशिवाय खोकला येत राहणे, अस्वस्थता- चेहरा फिका पडणे, कसंतरी वाटणे, खूप भीती वाटणे. ही सामान्य लक्षणे आहेत.
हार्ट अटॅक आल्यास काय करावे?
शांतपणे पडून राहावे व मदतीसाठी तातडीने कुणाला तरी बोलवावे. हालचाल करू नये, स्वत: चालत जाण्याचा प्रयत्न करू नये. जिने चढणे आणि उतरणे करू नये. स्वत: गाडी चालवू नये. ऍस्पिरीन किंवा सॉरब्रिटेट या दोन्ही गोळ्या जवळ असतील तर त्या घेणे. सॉरब्रिटेट जिभेखाली ठेवणे. ऍम्ब्युलन्सला ताबडतोब बोलवणे.
आजकाल सर्व ऍम्ब्युलन्समध्ये हृदयविकाराची तातडीने सेवा उपलब्ध असते. त्याबरोबर डॉक्टरही असतात. जवळच्या आधुनिक अद्ययावत सेवा उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर जाणे जरूरीचे आहे. यानंतरची पूर्ण उपचारपद्धती अद्ययावत सोयी असलेल्या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली होईल, अशा हॉस्पिटलमध्येच जावे.पेशंट बेशुद्ध किंवा अत्यवस्थ झाल्यास, सीपीआर (कार्डिओपल्मनरी रेसिस्टिटेशन) यामध्ये ज्यांनी ट्रेनिंग घेतले आहे.
त्यांनी पेशंटला कृत्रिम श्वासोच्छ्वास व बाहेरून हृदयाला कृत्रिम (कार्डिऍक मसाज) दाब देणे हे यावेळी गरजेचे असते. पुढील वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत हे उपाय करणे गरजेचे असते. त्यामुळे पेशंटला जीवदान मिळू शकते. अन्यथा याबाबत प्रथमोपचाराची माहिती नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागल्याची उदाहरणे आजकाल पाहायला मिळत आहेत.
हार्ट अटॅकचे निदान
छातीतील वेदना : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सुरू झालेली वेदना छातीच्या मध्यात स्टर्नम हाडाखाली जाणवते. या वेदना तीव्र असतात. पूर्ण छातीत आवळल्यासारखे वाटते. दाटून येणे, छातीवर दगड ठेवला आहे असे वाटणे. ही अवस्था जास्त वेळ असते. सोबतच घाम येणे, थकवा येणे, उलटया होणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.
हृदयविद्युत आलेख (ई.सी.जी.)
हृदयविकाराचा झटका आला की, ई.सी.जी.मध्ये वेगवेगळ्या लहरींमध्ये काही ठरावीक बदल आढळतात. त्यातल्या त्यात एसटी सेगमेंट उंचावणे आणि टी वेव्हज खालावणे हे हार्ट अटॅकचे निदान करण्यास पुरेसे आहेत.
रक्तातील घटकांचे चढ-उतार
रक्तातील विशिष्ट इन्झाईमची तपासणी, रुग्णाला हार्ट अटॅक आला आहे का, तो किती तीव्र आहे या सर्व गोष्टींचे निदान करते. सिरिअल इन्झाईम तपासणीद्वारे हार्ट अटॅक हा औषधोपचाराला कसा प्रतिसाद देतो आहे, याचेपण मूल्यमापन होऊ शकते. कार्डिऍक ट्रोपोनिन्स याची रक्तातील वाढलेली पातळी हार्ट अटॅकचे निदान करते.
इकोकार्डिओग्राफी (हार्टची सोनोग्राफी)
कधी कधी ईसीजी नॉर्मल असतानापण हृदयाच्या कप्प्यांमधील भिंतीच्या हालचालींवरून हृदयविकाराच्या झटक्याचे निदान करता येते. हार्ट अटॅकने झालेली हृदयाची हानी, स्नायूंचे झालेले नुकसान, इकोमध्ये कळते. औषधोपचाराला हृदय कसे प्रतिसाद देते आहे, याचीसुद्धा कल्पना इकोद्वारे येते. हार्ट अटॅकमुळे काही गुंतागुंत झाली आहे का, हृदयाच्या भिंतीला छिद्र पडले आहे का, झडपांना इजा झाली आहे का, या सर्व गोष्टींचे उत्तर इकोद्वारे मिळते.
ऍन्जिओग्राफी
सर्वात महत्त्वाची तपासणी म्हणजे ऍन्जिओग्राफी. या तपासणीमध्ये कोणती रक्तवाहिनी बंद झाली आहे हे निश्चितपणे कळते. पुढे काय करायचे, किती स्टेंटस लागणार वगैरेंबाबत निर्णय घेता येतात. हार्ट अटॅकचे निदान निश्चित झाले की, काय उपाययोजना करायची, जेणेकरून हृदयाचा रक्तपुरवठा पूर्ववत होईल, हे ठरवले जाते. यात दोन प्रकारच्या ऍन्जिओप्लास्टी तंत्राचा वापर केला जातो.
प्रायमरी ऍन्जिओप्लास्टी
हृदयविकाराचा झटका आल्यावर रक्त पातळ करण्याचे इंजेक्शन न देता रुग्णाला थेट कॅथलॅबमध्ये घेऊन जाऊन जी रक्तवाहिनी बंद आहे, तिला उघडून स्टेंट टाकून तो अडथळा दूर केला जातो.