सुसाट बाइक चालविणे हाही एक स्टाइलचा प्रकार. स्पीडमध्ये बाइक चालवत हवा कापत जाणे हा एक आनंदाचा क्षण. किंवा गर्दीमधून बाइकस्वार छोट्या छोट्या रिकाम्या जागेतून सहज निघून जातो आणि रस्ता थोडा मोकळा दिसला की हायस्पीड…
पण सध्या पावसाच्या दिवसांत या हायस्पीडवर थोडा कंट्रोल ठेवणे गरजेचे आहे. कारण तुम्ही कितीही तगडे बाइकस्वार असाल तरी पावसाच्या दिवसात अनेक बाइकस्वारांचा निष्काळजीपणाने आणि वेगात गाडी चालवण्याने अपघात घडतात. कारण रस्त्यावर पावसाचे पाणी साचलेले असल्यामुळे खड्डे दिसत नाहीत शिवाय रस्ता खूपच निसरडा झालेला असतो. त्यामुळे बाइक रस्त्यावरून घसरण्याची शक्यता अधिक असते.
त्याचबरोबर रस्त्यावर ऑइल सांडलेले असते त्यातच पावसाच्या पाण्यामुळे रस्ता तेलसदृश असतो. यावरून बाइक सावकाश चालवावी लागते. अन्यथा बाइक घसरण्याची शक्यताच अधिक.
त्यामुळे धूम स्टाइल बाइक चालवण्यासाठी हिवाळा आणि उन्हाळा हे दोन ऋतू राखीव आहे, असे समजा आणि पावसात बाइक हळू चालवण्याची कसरत शिका. शिवाय बाइक हळू चालावल्यास तुमच्या पाठीमागे बसलेल्या जोडीदाराची सोबत तुम्हाला जास्त वेळ मिळेल. त्यातच रिमझिम पाऊस असेल तर… हा आनंदाचा क्षण तुमच्या आठवणीत कायमचा राहील…