कडक उन्हाळ्याच्या दिवसात स्विमिंगसाठी जाणे, हे खरोखरच आल्हाददायक आणि आनंद देणारे असते. शरीर आणि मन दोन्ही साठी याचा आनंद मोठा असतो. अर्थतच हा आनंद घेताना आपण थोडीशी सावधगिरीही बाळगली पाहिजे.
कारण स्विमिंगमुळे जसे काही फायदे आहेत, तसेच काही नुकसान देखील आहे. शास्त्रानुसार केवळ अर्ध्या तासाच्या स्विमिंगमुळे जवळपास 440 कॅलरी जळतात. स्वीमिंग करणे ही एक गारवा देणारी कल्पना असली तरी त्याचे काही परिणामही जाणून घेतले पाहिजेत. काही लोक या परिणामांमुळेच स्विमिंगसाठी जात नाहीत. त्वचा खराब होण्याची शक्यता किंवा कान, नाक, संबंधित आजार होण्याची शक्यता असते. पण या सर्वच तक्रारींचा विचार करून स्विमिंगला गेलात तर त्याचा मनमुराद आनंद घेता येणार नाही. म्हणूनच स्विमिंगचा आनंद घ्यायचा असल्यास काही उपाय केले पाहिजेत.
स्विमिंगमुळे त्वचेवर तीन प्रकारचा परिणाम होऊ शकतो. बहुतेक स्विमिंग पूल हे खुले असतात. ज्यामुळे सनबर्न होण्याची शक्यता असते. दुसरा परिणाम पाण्यात मिसळलेल्या डिस्क इन्फेक्टंट किंवा क्लोरिनच्या अधिक प्रमाणामुळेही होतो. तिसरा परिणाम दुषित पाण्याच्या समस्येमुळे दिसतो. म्हणूनच स्विमिंग पुलामध्ये पोहण्यासाठी जाणाऱ्या लोकांमध्ये स्किन टॅनिंग म्हणजेच त्वचा काळवंडणे, खाज सुटणे, असा समस्या बघायला मिळतात. ते होऊ नये म्हणून पाण्यात उतरण्यापूर्वी आपल्याला क्लोरिन किंवा प्रदुषित पाण्याची ऍलर्जी नाही याची खात्री करून घ्यावी. कारण ऍलर्जीमुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात, असे अनेक वेळा दिसून येते.
उन्हामध्ये अधिक काळ स्विमिंग केल्यास त्वचा जळल्यासारखी होते. फोटो एजिंग किंवा काहींना सुरुकुत्यांचीही समस्या भेडसावते. त्वचेचा रंग देखील असमान होतो. उन्हाळ्यामध्ये सनस्क्रिन लावले जाते; पण स्विमिंग पूलमध्ये उतरताना ते अवश्य लावले गेले पाहिजे. तसेच सनस्क्रिन लोशन हे वॉटर रेजिस्टंट असले पाहिजे. म्हणजे ते पाण्याने धुतले जाणार नाही.
स्विमिंग पूलमधील पाण्यामध्ये अनेक जण पोहत असतात. अशा वेळी त्यांना आजार असल्यास ते दुसऱ्याला होण्याची शक्यता असते.
खासगी तलाव असल्यास ही शक्यता कमी असते; पण सार्वजनिक तरण तलावामध्ये त्वचासंसर्गाचा धोका वाढतो. पुलाचे पाणी बदलण्याचा वेग बराच कमी असतो. अशा वेळी त्वचेला खाज सुटण्याचा धोका वाढतो. तसेच बॅक्टेरीया आणि फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका देखील निर्माण होतो. पोहणाऱ्या काही व्यक्तींना त्वचारोग असल्यास त्याचा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता असते. म्हणून स्विमिंग पूलची निवड लक्षपूर्वक पद्धतीने करावी.
तिसरी समस्या म्हणजे पाणी दुषित होऊ नये म्हणून जंतूनाशक औषधांचा वापर केला जातो. यासाठी बहुतेक ठिकाणी क्लोरिन वापरतात. सामान्यपणे पाण्याची पीएच पातळी 7.2 ते 7.8 इतकी असायला पाहिजे. मात्र स्विमिंग पूलच्या पाण्याची पीएच पातळी बरीच जास्त असते. त्यामुळे संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो.
तसेच जास्त वेळ क्लोरिनच्या पाण्यात राहिल्यास त्वचा कोरडी पडते आणि ऍलर्जी होण्याची शक्यता वाढते. पाण्यातून बाहेर पडल्यानंतर त्वचेवर रॅशेस येतात. अर्थात अशी समस्या काही दिवसांनी बरी होते. पण ती बरी झाली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्वचा कापली गेली किंवा साल निघाले असल्यास पोहण्यासाठी तलावात उतरू नये. कारण जखमेमुळे संक्रमण होण्याचा धोका वाढतो.
तलावात पोहोल्यानंतर बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. कारण स्विमिंग कॉश्चुम घट्ट असतो. त्याचा परिणाम त्वचेवर होऊ शकतो. म्हणून हा कॉश्चुम प्रत्येकवेळी वापरल्यानंतर ऍन्टीसेप्टीक लिक्विडने धुवावा आणि नंतर उन्हात चांगल्या प्रकारे सुकवावा. यामुळे कपडे जंतू रहीत होतात. पोहोल्यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा अंघोळ करावी. त्वचेला खाज सुटत असल्यास पावडरचा वापर करता येऊ शकतो.
डायव्हींग करताना कानाच्या पडद्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तसेच कान, नाक आणि घशावर देखील परिणाम होऊ शकतो. यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणून तलावात उतरण्यापूर्वी डोके आणि कान पूर्णपणे झाकून घ्यावे.
डोक्यवर कॅप घालावी आणि शक्य असल्यास इयर प्लगदेखील लावावे. पूलाचे पाणी कानात गेल्यास जीवाणूंचा संसर्ग होण्याचा धोका असतो. डाईव्ह मारताना ही शक्यता वाढते म्हणूनच मोठ्यांनीसुद्धा मुलांना सावध राहण्याच्या सूचना द्याव्यात. पोहोल्यानंतर टॉवेलने कान चांगल्या प्रकारे स्वच्छ करावा. स्विमिंग करत असताना कान दुखत असेल, ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एकूणच स्विमिंग करताना आपल्या व्यक्तिगत स्वच्छतेबाबत कायम सावधगिरी बाळगावी आणि काटेकोर रहावे.
स्विमिंग पूलमध्ये उतरताना या गोष्टी लक्षात घ्याव्यात…
स्विमिंग पूलची निवड सावधगिरीने करावी.
स्विमिंग कॉश्चूम स्वच्छ ठेवावा.
पाण्यात उतरण्यापूर्वी अंघोळ करावी.
त्वचेवर सनस्क्रिन लावावे.
पोहोल्यानंतर साबणाने आणि शम्पूने अंघोळ करावी.
स्वच्छ टॉवेलचा वापर करावा.
मॉईश्चरायझर लावावे. बचाव ः
तलावात जास्त वेळ राहू नये.
पाणी तोंडात गेल्यास त्वरीत गुळण्या कराव्यात.
ऍलर्जी आल्यास त्वरित पाण्यातून बाहेर यावे.
रउंचावरून डायव्हींग करू नये.
रचेहरा पाण्याच्या आत नेतांना काळजी घ्यावी किंवा तो पाण्यापासून दूर ठेवावा.