Saturday, August 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

स्मार्ट लेखक बना… या लेखनसूचनांचा अवलंब करा…

by प्रभात वृत्तसेवा
August 22, 2021
in लाईफस्टाईल
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

– श्रीनिवास वारुंजीकर

कोणत्याही वृत्तपत्रासाठी अथवा नियतकालिकासाठी लेखन करताना नेहमी शब्दसंख्या आणि अचूक लेखनासह कालमर्यादेचे भान ठेवावे लागते. शिवाय लेखन करताना अनेक गोष्टींचे व्यवधान असावे लागते. त्यापैकी काही महत्त्वाच्या गोष्टींचा येथे वेध घेत आहे. बहुधा त्याचा आपणा सर्वांना उपयोग होईल, अशी आशा आहे. आपण लिहिलेला लेख उपसंपादकांकडून कापला जाऊ नये असे वाटत असेल, तर लेखातील मुद्दे परत-परत नमूद करणे टाळावे.

1. मोबाईलवर लेख देवनागरी अर्थात मराठीमध्ये टाईप करायचे असल्यास गुगल इंडीक कीबोर्डद्वारे व्हॉईस टायपिंगचे टूल आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल आणि ऍक्‍टिव्हेट करुन घ्यावा. प्रत्येकाच्या मोबाईलनुसार हे सेटींग आपले आपण करुन घ्यावे. अगदीच न जमल्यास युट्युब व्हिडीओचा आधार घ्यावा. व्हॉईस टायपिंग करताना उच्चारत असलेला प्रत्येक शब्द स्पष्ट आणि सावकाश उच्चारल्यास 99 टक्के बरोबर टायपिंग होत असते.

2. लेखाच्या सुरुवातीला लेखाचे नाव, लेख कोणासाठी आहे त्याचा तपशील, लेखमाला असेल तर त्यातील लेख क्रमांक, लेखकाचे नाव, फोन नंबर (शक्‍यतो व्हॉट्‌सऍप) आणि लेखाचे शीर्षक अवश्‍य नमूद करावे. लेखाच्या सुरुवातीला दोन ओळींचा विषय परिचय आणि शेवटी लेखकाचा एका ओळीतला संक्षिप्त परिचय द्यावा.

3. लेखासमवेत काही छायाचित्रे असतील तर ती स्वतंत्ररित्या पाठवावीत (ई-मेल अटॅचद्वारे). लेखामध्येच ऍड करु नयेत.

4. लेखामध्ये परिच्छेद करताना दोन परिच्छेदांमध्ये जागा कधीही सोडू नये. अशी जागा सोडल्यास काही मजकूर राहिला असल्याची शंका येत असते.

5. प्रत्येक वाक्‍य संपल्यानंतर येणारे विरामचिन्ह (स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारचिन्ह अथवा प्रश्‍नचिन्ह) हे शेवटचा शब्द संपताच द्यावे.  शेवटचा शब्द आणि विरामचिन्ह यामध्ये स्पेस देऊ नये.

6. लेखामध्ये विनाकारण इंग्लिश शब्दांचा भडीमार करु नये. अगदीच टाळता येणार नाहीत, असे शब्द असतील तर ते शब्दही शक्‍यतो देवनागरी लिपीतच लिहावेत.
तरिही इंग्लिश शब्द द्यावाच लागत असेल, तर इंग्लिश स्पेलींग बरोबर असेल, असे पहावे. तसेच त्या इंग्लिश शब्दाचा उच्चार कंसात मराठीत लिहावा. हे अशासाठी की, युनिकोडमधील मजकूर श्रीलिपी अथवा इतर सॉफ्टवेअरमध्ये कन्व्हर्ट करताना इंग्लिश शब्द गायब होतात. त्यामुळे असा मजकूर पानावर घेताना इंग्लिश शब्दांच्या जागी रिकाम्या जागा दिसतात.

7. हीच गोष्ट अंकांबाबत आहे. लेख लिहिताना हे अंक शक्‍यतो इंग्लिशमध्येच असल्यास ते कन्व्हर्ट होताना आहे तसेच राहतात. अन्यथा मराठी अंक हे कन्व्हर्ट केल्यानंतर गायब होतात.

8. अंक लिहिताना एक ते नऊ अंक अक्षरी तर त्यापुढचे सर्व अंक आकड्यांमध्ये लिहावेत. शीर्षकाची, वाक्‍याची सुरुवात अगर शेवट अंकाने करु नये.

9. कोणत्याही व्यक्तीचे नाव लेखात आले असेल, तर त्याचे पद/परिचय असल्याशिवाय ते नाव वापरु नये. व्यक्तीचे नाव देताना संबंधित नाव अचूक आणि बरोबर आहे ना, याची किमान तीन वेळा खात्री करावी. (उदा. अपघाताविषयी बोलताना कृष्णा हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. जोशी म्हणाले की…)

10. सहसा नावे लिहिताना “सिंह’ आणि “सिंग’ असा गोंधळ होत असतो. असे नाव लेखनात आल्यास, संबंधित व्यक्ती पगडीशारी शिख असल्यास ते नाव “सिंग’ असे लिहावे. (डॉ. मनमोहन सिंग, मिल्खा सिंग) जर अशी व्यक्ती पगडीधारी शिख नसेल तर त्या नावात “सिंह’ असे लिहावे. (महेंद्रसिंह धोनी, मुलायमसिंह यादव).

11. जर एखाद्या नावात शहा असेल तर “शहा’ आणि “शाह’ मध्ये गोंधळून जाऊ नये. अशी व्यक्ती गुजराती असेल तर “शहा’ (अमित शहा, जयंत शहा) आणि ती व्यक्ती मुस्लिम असेल तर “शाह’ (नादीर शाह, नासिरुद्दीन शाह) लिहावे.

12. विदेशी व्यक्ती, खेळाडू, राजकीय नेते यांची नावे लिहिताना ती प्रचलीत नावांशी साधर्म्य असणारी असावीत. (करनाम मल्लेश्‍वरी नव्हे तर कर्णम मल्लेश्‍वरी याप्रमाणे)

13. कालवाचक उल्लेख आपल्याला करायचे असल्यास, काल (दि. 19 रोजी) उद्या (दि. 21 रोजी) असे उल्लेख असावेत. “परवा’ “तेरवा’ असे शब्द कधीही वापरु नयेत. त्याऐवजी “चालू आठवड्यात/महिन्यात/वर्षी’ किंवा “पुढील आठवड्यात/महिन्यात/वर्षी’ असे उल्लेख करावेत.

14. एखाद्या व्यक्तीचा कार्यकाल संपला असेल, निधन झाले असेल तर त्याच्या पदाचा उल्लेख करताना “माजी’ हा शब्द न वापरता “तत्कालीन’ असा शब्द वापरावा. (“तत्कालीन उर्जा मंत्री रावसाहेब शिंदे असे म्हणाले होते की…’)

15. “कै.विजयराव देशमुख यांची मुलाखत मी घेतली होती…’ असे शब्दप्रयोग सर्वथा चूक आहेत. सदर व्यक्ती कै. अर्थात कैलासवासी असताना तुम्ही मुलाखत कशी घेतली? तर “दिवंगत विजयराव देशमुख यांची मुलाखत मी घेतली होती’, असा उल्लेख येणे योग्य राहील.

16. वेलांटी आणि उकाराबाबत अनेकदा हृस्व आणि दीर्घ असा गोंधळ होत असतो. त्यासाठी इयत्ता चौथीचे व्याकरणाचे पुस्तक अवश्‍य अभ्यासावे.

17. लेखामध्ये ऐतीहासिक वाक्‍ये, कवितेच्या ओळी किंवा अन्य संदर्भ द्यायचे असतील, तर मूळ संदर्भात अजिबात मोडतोड न करता द्यावेत. त्रिकालाबाधित सत्य असणारी विधाने आपल्या सोयीनुसार बदलू नयेत.

18. कोणताही परकीय भाषेतील संदर्भ, वाक्‍य द्यायचे असेल, तर त्याचा यथायोग्य अनुवाद कंसात देणे आवश्‍यक असते.

19. लेखामध्ये आकडेवारी, चौकटी किंवा आलेख असतील तर त्यामध्ये आकड्यांचे एकक (युनिट) हे अचूक असणे आवश्‍यक असते. म्हणजे चौरस फूटात संदर्भ असतील तर दुसरे संदर्भ चौरस मीटरमध्ये देऊ नयेत. किलोमीटर्सचा उल्लेख असेल तर मैलाचा उल्लेख टाळावा.

20. एखादे लघुरुप वापरण्याचा प्रसंग येत असेल तर त्यासाठी प्रत्येक अक्षरानंतर पूर्णविराम देण्याची गरज नाही. उदाहरणार्थ एम. बी. ए. हा शब्द सरळ एमबीए असा लिहावा.

21. एखाद्या शब्दसमूहाचा लेखात वारंवार उपयोग करावा लागणार असेल, तर प्रथम उल्लेखावेळी तो संपूर्ण शब्दसमूह लिहून तिथेच कंसात त्याचे लघुरूप लिहावे आणि हे लघुरूप पुढे लेखात वापरत रहावे. (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अर्थात “साफुपुवी’ किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यासाठी BAMU “बामु’ असेही लिहिले जाते.)

22. विज्ञान, तंत्रज्ञान अथवा आरोग्यविषयक इंग्लिश शब्द वापरताना त्याचा पर्यायी मराठी शब्द वापरण्याचा/शोधण्याचा प्रयत्न करु नये. ते शब्द आहेत तसेच वापरावेत. शॉक ऍब्सॉर्बर, ऍक्‍सिलरेटर, क्रिटीकल केअर अशा शब्दांना सार्थ पर्यायी मराठी शब्द अचूक न लिहिल्यास अर्थाचे आकलन वाचकाला होणार नाही. त्यामुळे ते शब्द आहेत तसेच वापरावेत.

23. कितीही अवघड अथवा किचकट विषयावरील लेखनाचा प्रसंग आला तरी लेखन हे साधे, सोपे, सहज समजण्यासारखे असावे. अशा लेखनात छोटी-छोटी वाक्‍ये अधिक प्रमाणात वापरावीत.

24. आपण आपल्या लेखामध्ये काही बाह्यसंदर्भ घेतले असतील, तर त्याचा उल्लेख लेखाच्या शेवटी अवश्‍य करावा. त्यामुळे लेखनाची आणि लेखकाची विश्‍वासार्हता वाढण्यास मदत होते.

25. लेखासमवेत व्यक्तीचा अथवा ग्रुप फोटो असेल तर त्यामध्ये सर्वांची नावे अचूक असणे गरजेचे असते. ग्रुप फोटोमधील नावे देताना डावीकडून अनुक्रमे अशा प्रकारे नावे लिहावीत. तसेच फोटो कुठला, केव्हाचा आहे, तेही नमूद करावे. फोटोखाली नावे देताना फक्त व्यक्तींची नावे द्यावीत, त्यांचे पद अथवा परिचय देण्याची गरज नसते. अन्यथा फोटो वर्णन लांबलचक होण्याची शक्‍यता असते.

26. आपले लेखन शब्दबंबाळ होऊ नये असे वाटत असेल तर खालील वाक्‍यसमूह टाळावेत…
– मला असे म्हणायचे आहे की…
– माझ्या मते…
– मी आपणाला सांगू इच्छितो की…
– याचा विचार करावयाचा झाल्यास…
– तर मी असे सांगेन की…
(अशी विनाकारण लांबण लावणारी वाक्‍ये टाळावीत)

27. पत्रकारितेची भाषा – वृत्तपत्रात लिहिली जाणारी भाषा ग्रांथिक भाषेपेक्षा आणि बोली भाषेपेक्षा भिन्न असते. सर्वांना समजेल अशी भाषा वृत्तपत्रांना योजावी लागते, ती व्यक्तीची भाषा नसून वृत्तपत्र या संस्थेची भाषा आहे, तिच्यात शैलीच्या व्यक्तिगत वैशिष्ट्‌यांना वाव नसतो. शिवाय आपल्या वृत्तपत्राची भाषा इतर वृत्तपत्रांच्या भाषेपेक्षा वेगळी आणि वैशिष्टयपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक वृत्तपत्र करीत असते. वृत्तपत्रीय भाषेला आणखीन काही पथ्ये सांभाळावी लागतात, ती म्हणजे अल्पाक्षरत्व. शक्‍यतो लांब, अपरिचित शब्द टाळावे लागतात. त्यासाठी कधी कधी शास्त्रीय काटेकोरपणाकडे अधिक लक्ष द्यावे लागते. व्यक्तिगत शैली टाळण्यासाठी वृत्तपत्रांच्या भाषेत कर्मणी वाक्‍यांचा उपयोग अधिक केला जातो. यांमुळे काही वेळा वृत्तपत्राची भाषा यांत्रिक व कृत्रिम होण्याचा धोका असतो. ही भाषा मुख्यतः बातम्यांमध्ये वापरली जाते. त्यात माहितीचे स्रोत अन्य आहेत हे दर्शविण्यासाठी “असे समजते’, “असे सांगण्यात आले’, “अशी बोलवा आहे’, अशा प्रकारची वाक्‍ये वापरली जातात. परंतु संपादकीये, वृत्तलेख किंवा अन्वयार्थ लावणारे लेख यांमध्ये वृत्तपत्रे वेगळी भाषा वापरु शकतात. विशेषतः मानवी आस्थाविषयक वृत्तकथनात (ह्यूमन इंटरेस्ट स्टोरी) नाट्यमय, लालित्यपूर्ण भाषा वापरण्यास वाव असतो. भाषा मुख्यार्थावर भर देते आणि व्यक्त होणाऱ्यां आशयाचे वाचकाच्या मनात विश्‍लेषण व्हावे, असा तिचा उद्देश असतो.

28. कोणत्याही लेखाचे काही ऍट्रिब्युट्‌स अर्थात टाळता न येणारे घटक असतात. संबंधित प्रकाशनाकडे आपला लेख पाठवताना खालील ऍट्रिब्युट्‌स दोन वेळा तपासून पहावेत आणि मगच लेख पाठवावा.
– लेखाचे शीर्षक सार्थ आणि अचूक आहे का?
– लेखकाचे नाव, फोन नंबर, ई-मेल आयडी दिला आहे का?
– विषय परिचय दिला आहे का?
– एका ओळीतला लेखक परिचय

  • लेखाच्या शेवटी शब्दसंख्या नमूद केली आहे का?
  • लेखासमवेत छायाचित्रे दिली आहेत का?
  • लेखामध्ये अतिरिक्त माहितीच्या चौकटी आहेत का?
  • लेखासमवेत काही ग्राफिक, आलेख, नकाशे असतील तर त्याचे वर्णन दिले आहे का?
  • लेखातील सर्व संदर्भ अचूक, वास्तवाला धरुन आणि खरे आहेत ना? ऐकीव माहिती, अनधिकृत अथवा अर्धवट संदर्भ असतील तर ते काढून टाकावेत.

– श्रीनिवास वारुंजीकर

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar