प्रतीवर्षी ऑक्टोबर हा महिना “ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती’चा
महिना म्हणून जगभर साजरा केला जातो. भारतीय महिलांत सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा कर्करोग म्हणजे स्तनांचा कर्करोग आहे. या रोगाने बाधित असलेल्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. दर 25 ते 30
महिलांमध्ये एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. या महत्त्वाच्या विषयावर प्रख्यात ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉक्टर प्रांजली गाडगीळ यांनी “दै. प्रभात’शी केलेली बातचीत…डॉ. प्रांजली गाडगीळ
डॉ. गाडगीळ, तुम्ही अमेरिकेत ब्रेस्ट कॅन्सरचे शिक्षण घेतले, या विषयावर संशोधन केले आणि भारतामधे प्रॅक्टिस करायला आलात. ब्रेस्ट कॅन्सरचे स्वरूप या दोन देशात वेगळे आहे का?
भारतापेक्षा अमेरिकेतील महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे; परंतु पाश्चात्य देशांमधे 90 टक्क्यांपेक्षा जास्त महिला या आजारातून पूर्णपणे बऱ्या होतात. याचे एक कारण म्हणजे चाळिशीनंतर सर्व महिला वार्षिक मॅमोग्राफीची तपासणी न विसरता करतात. तेथील महिलांना या तपासण्या अंगवळणी पडल्या आहेत. इन्शुरन्समधून तपासण्यांचा खर्चदेखील होतो आणि म्हणूनच कर्करोगाचे निदान हे अगदी प्राथमिक अवस्थेत होतं.
भारतीय महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अमेरिकेपेक्षा कमी आहे, हे खरे आहे, पण अमेरिकेपेक्षा जास्त भारतीय महिला या आजारात दगावतात, हे भीषण वास्तव आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कर्करोगाच्या निदानात होणारा अक्षम्य विलंब. उपचार पद्धतींमधे आपण मागे नाही आहोत, पण अनेक महिला आर्थिक कारणांमुळे या आधुनिक उपचार पद्धतींपासून वंचित राहतात. त्यामुळे सामाजिक स्थळावर या आजाराविषयी जनजागृती करणं अत्यंत गरजेचं आहे.
कोणत्या वयात महिलांनी स्तनांच्या कर्करोगापासून सावधगिरी बाळगली पाहिजे?
भारतीय महिलांमध्ये हा आजार 48-52 या वयोगटात सर्वात जास्त प्रमाणात दिसतो; परंतु विशीत आणि तिशीत देखील हा आजार होऊ शकतो, हेच अनेकांना माहीत नसतं. गरोदर अवस्थेत आणि आपल्या बाळाला स्तनपान देणाऱ्या महिलांनासुद्धा हा आजार होऊ शकतो. माझ्या प्रॅक्टिसमध्ये एक तृतीयांश रुग्ण 40 पेक्षा कमी वयाच्या आहेत.
वयानुसार शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि पेशी दुरुस्तीची व्यवस्था सदोष होते. त्यामुळे उतारवयात कर्करोगाची शक्यता वाढते. अगदी 80-90 वर्षांच्या महिलांनासुद्धा स्तनांचा कर्करोग झाल्याचे मी पाहिले आहे आणि या वयातसुद्धा योग्य उपचारांना यश आलेल्या अनेक केसेसही आमच्या पाहण्यात आहेत.
एखाद्या महिलेला काही फॅमिली हिस्ट्री नसतानाही स्तनाचा कर्करोग होतो का ?
जवळच्या नातलगांना (आई, बहीण, आजी, मावशी, आत्या) स्तनाचा कर्करोग झाला असेल, तर हा आजार होण्याची शक्यता वाढते; परंतु 80 टक्के ब्रेस्ट कॅन्सर हे आनुवंशिक नसतात. एखाद्या महिलेला जेव्हा स्तनाचा कर्करोग होतो, तेव्हा बहुतेक वेळेस कर्करोग असलेली ती कुटुंबांमधील पहिलीच व्यक्ती असते. आपल्या नात्यात हा आजार कोणाला नाही, म्हणून मला असलेली गाठ कर्करोगाची नसणार अशा भ्रमात, तक्रारींकडे दुर्लक्ष करता काम नये. अंदाजे 5-10% स्तन-कर्करोगाच्या केसेस या जेनेटिक डिफेक्टमुळे होतात. अशा प्रकारच्या ब्रेस्ट कॅन्सरला अनुवंशिक म्हटलं जातं.
स्तनाच्या कर्करोगाची सामान्य काय लक्षणे असतात?
स्तनामध्ये गाठ किंवा दाटी, निप्पलमधून असामान्य स्राव, स्तनाच्या त्वचेमधे लाली किंवा खडबडीतपणा, स्तनाच्या आकारात बदल, निप्पलचा भाग आत खेचला जाणे, काखेमध्ये गाठ होणे, ही सर्व कर्करोगाची लक्षणे असू शकतात. कर्करोगाच्या गाठीमुळे सहसा वेदना होत नाहीत. प्राथमिक अवस्थेत शरीरावर इतर काही परिणाम देखील होत नाहीत. त्यामुळे “काही त्रास होत नाहीये’, म्हणून या लक्षणांकडे दुर्लक्ष होतं आणि वेळेवर निदान करण्याची संधी हरवते. कितीही क्षुल्लक वाटणारं लक्षण जाणवलं तरीही स्तनरोग तज्ज्ञ आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य त्या तपासण्या केल्याच पाहिजेत.
स्तनाचा कर्करोग होऊच नये यासाठी महिला काही करू शकतात का?
स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी अजून काही निवारक लस उपलब्ध नाही, पण हा आजार होण्याची शक्यता आपण कमी करू शकतो. दररोज किमान अर्धा तास व्यायाम करा. व्यायामामुळे या आजाराची शक्यता 20-30 टक्क्याने कमी होते. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. मेनोपॉझ नंतर हॉर्मोन्सची औषधे अजिबात घेऊ नका. वजनावर नियंत्रण ठेवा. आहारात फळं भाज्या, कडधान्यं जास्त व तेल-तूप कमी ठेवा. या सर्व गोष्टी करून देखील हा आजार 100% टाळता येईलच असे नसते, हेही लक्षात ठेवा. म्हणून प्राथमिक अवस्थेत निदान करण्याची साधनेदेखील तेवढीच महत्त्वाची आहेत.
महिलांनी नियमितपणे कोणत्या चाचण्या कराव्या?
20 व्या वर्षांपासूनच महिन्यातून एकदा स्वतःचे स्तनपरीक्षण करण्याची सवय ठेवा (सेल्फ ब्रेस्ट एक्झाम)
30 वर्षांपासून डॉक्टरांकडून वार्षिक स्तनाची तपासणी करवून घ्या (क्लिनिकल ब्रेस्ट एक्झाम)
40 वर्षांपासून अनुभवी केंद्रात जाऊन, वार्षिक मॅमोग्राफीची तपासणी करा.
मॅमोग्रॅम म्हणजे काय आणि त्यासाठी काय तयारी करावी लागते?
मॅमोग्राम हा स्तनाचा काढलेला विशेष प्रकारचा एक्स-रे असतो. ही तपासणी मॅमोग्राफी सेंटरमध्ये खास उपकरणे वापरून केली जाते. अगदी सूक्ष्म, कमी प्रमाणात रेडिएशन वापरून प्रत्येक स्तनाचे दोन एक्स-रे काढण्यात येतात. रेडिओलॉजिस्ट या चित्रांचा अभ्यास करून रिपोर्ट तयार करतात. एक्स-रे घेताना स्तनाचा भाग 5-10 सेकंद प्लेट्सच्यामध्ये धरला जातो. यामुळे स्तनावर दाब जाणवतो. अनुभवी टेक्निशियन आणि आधुनिक उपकरणे असल्यास तपासणी अगदी सोईस्करपणे आणि सहज होऊ शकते.
यासाठी कॉन्ट्रास्ट किंवा आयव्हीची गरज नसते. सकाळी अंघोळ केल्यावर डिओड्रंट पावडर किंवा क्रीम इत्यादी न लावता मॅमोग्राफीच्या तपासणीसाठी जावे. या तपासणीसाठी उपाशी राहण्याची गरज नसते. आतापर्यंत केलेल्या सर्व मॅमोग्राफी व सोनोग्राफीचे रिपोर्ट बरोबर ठेवा. नवीन तपासणीची तुलना, आधीच्या फिल्म्सशी करणे महत्त्वाचे असते. आधीचे बायोप्सी अथवा सर्जरीचे रिपोर्टदेखील बरोबर ठेवावेत.
स्तनांची काहीच तक्रार नसेल तरीही मॅमोग्राफी का करावी?
स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये सर्वात अधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग असल्याने, 40 वर्षांपुढील प्रत्येक स्त्रीने वार्षिक ही तपासणी करावी, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. नियमित तपासणी करणाऱ्या महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे निदान, गाठ हाताला लागण्याअगोदर होऊ शकते. प्राथमिक अवस्थेत उपचार झाल्यास उपचार सोईस्कर होतात आणि जीवाचा धोका टळतो. सशक्त स्त्रियांमध्ये या हेतूने केलेल्या तपासणीला “स्क्रिनिंग मॅमोग्राफी’ म्हटले जाते.
मॅमोग्राम ऍबनॉर्मल असला तर काय करायला पाहिजे?
मॅमोग्राममधे काही अनियमितता आढळली तर त्याचे योग्य निदान करण्यासाठी अधिक तपासण्या केल्या जातात. अनेक वेळा सोनोग्राफीने शंका निरसन होते, तर कधी टोमॉसिन्थेसिस, किंवा ब्रेस्ट एमआरआय या विशेष इमेज साधनांचा वापर केला जातो. कर्करोगाची किंवा त्याच्या प्राथमिक अवस्थेची थोडी जरी शक्यता असेल, तर सुईची तपासणी म्हणजे “बायोप्सी’ केली जाते.
ब्रेस्टची सोनोग्राफी कधी केली जाते ?
40 वर्षांखालील वयाच्या स्त्रियांसाठी तक्रारीच्या निदानासाठी, अगोदर स्तनाची सोनोग्राफी म्हणजे अल्ट्रासाऊंड तपासणी केली जाते. सोनोग्राफीमध्ये एक्स-रे न वापरता, ध्वनी लहरींचा वापर होतो. वय वर्ष 40 पेक्षा अधिक असल्यास, आधी मॅमोग्राफी आणि त्यानंतर आवश्यक असल्यास सोनोग्राफी केली जाते. दोन्ही तपासण्या एकमेकांना सहाय्यक असून, अनेक वेळा पूर्ण निदान करण्यासाठी दोन्ही तपासण्यांचा वापर केला जातो. मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफीच्या तपासणीनंतर काढल्या गेलेल्या निष्कर्षांत 10 ते 15 टक्के चूक होऊ शकते. म्हणूनच मॅमोग्राफी व स्तनांची तज्ज्ञांद्वारे तपासणी यांची जोड असणे महत्त्वाचे आहे.
एखाद्या महिलेला जवळच्या नातलगांमध्ये कॅन्सरची हिस्ट्री असेल (आई, बहीण, आजी, मावशी, आत्या यांना कॅन्सर असेल) तर अशा महिलेने काय करावे?
फॅमिली हिस्ट्री असलेल्या महिलांनी वर सांगितल्याप्रमाणे नियमित चाचण्या या कराव्यातच, पण जेनेटिक टेस्टिंगची देखील माहिती करून घ्यावी. ब्रेस्ट कॅन्सर हा फक्त 5-10 टक्के रुग्णांमध्ये आनुवांशिक असतो. अशी पार्श्वभूमी असल्यास “जेनेटिक टेस्टिंग’ करणे केव्हावी फायदेशीर ठरते. भारतात अनेक केंद्रांमध्ये ही चाचणी आता उपलब्ध आहे. ही टेस्ट रक्तावर, किंवा थुंकीवर देखील करता येते, पण चाचणी करण्याआधी जेनेटिक कॉऊन्सेलर किंवा या विषयात तज्ज्ञ असलेल्या ऑनकॉलॉजिस्टशी म्हणजे कर्करोग तज्ज्ञाशी चर्चा करावी. असे कॉउंसेलिंग करूनच, या क्षेत्रात प्रावीण्य असलेल्या केंद्रात ही तपासणी करवून घ्यावी.
स्तनामध्ये गाठ सापडली तर काय करायला पाहिजे?
एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे, स्वतःचे निदान स्वतः करायला जाऊ नये. 80 टक्के गाठी कर्करोगाच्या नसतात आणि त्यामुळे गडबडून जाऊ नये. स्तनरोग विषयात तज्ज्ञ आणि अनुभवी असणाऱ्या डॉक्टरांना भेटा आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या करा. गाठीची तिहेरी चाचणी झाली पाहिजे. यात डॉक्टरांनी केलेले परीक्षण, मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफी सारख्या रेडिओलॉजी च्या तपासण्या, आणि शेवटी सुईची तपासणी किंवा बियॉप्सी, असे तीन घटक असतात. योग्य चाचण्यांच्या अभावी बांधलेले अंदाज, धोकादायक ठरू शकतात. निदानाची प्रक्रिया किचकट असू शकते, त्यामुळे खात्रीपूर्वक निदान होईपर्यंत रुग्णाने आणि तिच्या कुटुंबीयांनी धीर धरला पाहिजे.
सुईची तपासणी म्हणजे बायोप्सी केल्याने गाठीचा प्रसार होत नाही का?
हा एक सामान्य गैरसमज आहे. क्लिनिकमध्ये लोकल ऍनेस्थेशिया खाली 10 मिनिटांत बिनाटाके वापरता बायोप्सी होते. सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाने बायोप्सी केली, तर योग्य जागेतून सॅम्पल घेण्याची अचूकता वाढते. “एफनॅक’ ही सुईची तपासणी सोपी आणि स्वस्त असली तरी अनेक वेळा या पद्धतीने अपूर्ण किंवा चुकीचे रिपोर्ट मिळतात. यामुळे निदान पूर्ण करण्यासाठी अनेकांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळेच आम्ही कोअर बायोप्सी या आधुनिक प्रकारच्या बायोप्सीचा वापर जास्त करतो ज्याने करून निदानासाठी शस्त्रक्रिया करणे टाळता येते.
बायोप्सीच्या रिपोर्टमध्ये कॅन्सर दिसून आला तर काय?
ब्रेस्ट कॅन्सर विषयी काही पूर्वग्रह अनेकांच्या मनात असतात. इतर रुग्णांचे ऐकीव अनुभव असतात. अनेक रुग्णांना वाटतं की लगेच दुसऱ्याच दिवशी ऑपरेशन करावं. या गडबडलेल्या अवस्थेत चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. एक लक्षात घ्या की, ब्रेस्ट कॅन्सरचे देखील अनेक प्रकार आहेत. प्रत्येक रुग्णाचा आजार वेगळा असतो आणि त्यानुसार उपचार पद्धतीदेखील वेगवेगळ्या असतात.
अशा स्थितीत स्तन कर्करोगाच्या तज्ज्ञांना भेटा. आपल्याला झालेल्या आजाराची सखोल माहिती करून घ्या. पूर्ण माहिती मिळवण्यात 2-3 आठवडे लागले तर कॅन्सरच्या स्टेजमध्ये फारसा फरक पडत नाही. कर्करोगाचे उपचार किचकट असले तरी ते दिवसेंदिवस अधिक परिणामकारक होत आहेत. सकारात्मक दृष्टिकोन आणि हुशारी ठेऊन बरे होण्याच्या दिशेने एक-एक पाऊल पुढे टाका.
कॅन्सरपेक्षा अनेकदा महिलांना उपचाराची भीती वाटते. याबाबत काय सांगाल?
ब्रेस्ट कॅन्सरच्या शस्त्रक्रियेविषयी सांगायचं झालं, तर अनेक महिला मॅसेक्टॉमी (स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया) या ऑपेरेशनला घाबरतात. मुळात अनेक महिला कोणत्याही शस्त्रक्रियेला, अगदी इंजेक्शन घेण्यालाही घाबरतात. आजच्या तारखेला बहुतेक महिलांमध्ये स्तन कढून न टाकता, लम्पेक्टॉमीची शस्त्रक्रिया केली जाते. इमेज गायडेड सर्जरीने ही शस्त्रक्रिया अधिक अचूक होते. ज्या महिलांमध्ये स्तनाचा पूर्ण भाग काढावा लागतो तिथे इम्प्लांट किंवा फ्लॅप वापरून स्तनाचा नवनिर्माण देखील कॅन्सरच्या शस्त्रक्रियेच्या वेळी आम्ही करतो. निप्पल अँड स्किन स्पेरिंग, ओंकोप्लास्टिक सर्जरी या पद्धतींमुळे स्तनांचे सौंदर्य राखून कॅन्सरची शस्त्रक्रिया केली जाते.
याशिवाय सर्वाधिक रुग्ण ज्याला घाबरतात त्या रेडीएशनच्या उपचारांमध्येही खूप विकास झाला आहे. आजचे उपचार पूर्वीपेक्षा जास्त प्रभावशाली, सोईस्कर आणि व्यक्तिकेंद्रित झाले आहेत. या क्षेत्रात खूप वेगाने संशोधन होत आहे आणि नवीन उपचारांचे विकसन होत आहे, पण या आजाराला सामोरं जाणं ही क्षुल्लक बाब नाही आहे. “काही दिवस अवघड आणि काही दिवस दिलाशाचे’ असा हा सफर असतो. “पुढचे काही महिने मी स्वतःकडे लक्ष देऊन,
स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देऊन यातून बाहेर पडणार आहे’ अशीच धारणा महिलांनी ठेवावी. म्हणजे या आत्मविश्वासाने त्या कोणत्याही असाध्य कर्करोगावर मात करू शकतील, असे मी नेहमी सांगते.
ब्रेस्ट कॅन्सरचे उपचार पूर्ण झाले असतील अशा महिलांनी काय करावे?
या महिलांनी आपल्या ऑनकॉलॉजिस्टशी नियमित संपर्क ठेवून त्यांच्या मार्गदर्शनानी नियमित चाचण्या केल्या पाहिजेत. ज्या महिला नियमित व्यायाम करतात आणि वजनावर नियंत्रण ठेवतात, त्यांच्यात ब्रेस्ट कॅन्सरचे पुनर्वसन होण्याची शक्यता कमी होते. याचबरोबर हाडांची मजबूती ठेवणे, मानसिक संतुलनाकडे लक्ष ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे.
योगा आणि मेडिटेशनचे फायदे ब्रेस्ट कॅन्सरमध्ये नक्कीच आहेत आणि पाश्चात्य देशातसुद्धा या साधनांवर खूप संशोधन होत आहे. कॅन्सर होऊन काही वर्ष होऊन गेली असतील तरी ‘आजच्या तारखेला या विषयात काय नवीन होत आहे आणि कुठल्या संशोधनाचा मला फायदा होईल का’ असा प्रश्न अधूनमधून तुमच्या ऑनकॉलॉजिस्टना जरूर विचारावा.
(डॉ. प्रांजली गाडगीळ या अमेरिकन बोर्ड सर्टिफाइड सर्जन आहेत. अमेरिकेत सर्जरीचे शिक्षण घेऊन त्यांनी स्तनरोगांमध्ये फेलोशिप केली आहे. कॅन्सर रुग्णांना मदत करणाऱ्या आय-शेअर या फौंडेशनची स्थापनाही डॉ. प्रांजली यांनी केली आहे.)
डॉ. प्रांजली गाडगीळ यांनी सांगितलेले मुख्य मुद्दे
स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी अजून काही निवारक लस उपलब्ध नाही; परंतु प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो. यामुळे महिलांनी आपल्या शारीराविषयी जागरूक राहावं, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली स्तनाच्या नियमित तपासण्या कराव्या आणि स्तनामध्ये जाणवलेल्या अनियमित लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
कुणाला होतो स्तनाचा कॅन्सर?
अधिक रुग्ण 48-52 वर्षांच्या आसपास असतात
विशी-तिशीच्या तरुण वयात देखील होऊ शकतो.
बहुतेक रुग्णांना कॅन्सरची फॅमिली हिस्ट्री नसते
गरोदर अवस्थेत आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनासुद्धा होऊ शकतो.
उतार वयात 70-80 च्या महिलांना
देखील होतो.
पुरुषांनासुद्धा स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.
कोणत्या लक्षणांची दखल घ्यावी ?
स्तनामध्ये गाठ किंवा दाटी
निप्पलमधून असामान्य स्राव
स्तनाच्या त्वचेमधे लाली किंवा खडबडीतपणा
स्तनाच्या आकारात बदल
निप्पलचा भाग आत खचणे
काखेमध्ये गाठ होणे
ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता कशी कमी कराल?
नियमित व्यायाम करा
धूम्रपान आणि मद्यपान टाळा
मेनोपॉझनंतर हार्मोन्सची औषधे टाळा
वजनावर नियंत्रण ठेवा
आहारात फळं -भाज्या जास्त, व तेल-तूप कमी ठेवा
तक्रार असल्यास काय करावे?
स्वतःचे निदान स्वतः करायला जाऊ नका
स्तनरोग विषयात तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांना भेटा
तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या करा
खात्रीपूर्वक निदान होईपर्यंत धीर धरा
बहुतेक तक्रारी कॅन्सरमुळे नसून बिनाइन असतात
अगदीच कॅन्सर असला तरी तो पूर्ण बारा होऊ शकतो हे ध्यानात ठेवा.
काही तक्रार नसेल तर काय तपासण्या कराव्या?
20 वर्षांनंतर महिन्यातून एकदा स्वतःचे स्तन परीक्षण करा
30 वर्षांनंतर डॉक्टरांकडून स्तनाची तपासणी करून घ्या
40 वर्षांनंतर अनुभवी केंद्रात जाऊन मॅमोग्राफीची वार्षिक तपासणी करा.