मानसिक आजाराचे अनेक प्रकार असतात. एखादा मोठा धक्का सहन न झाल्याने अनेकदा रुग्ण मानसिक दडपणाखाली जातो. यावर वेळीच उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच त्यांची वागणूक असल्याने अनेकदा कुटुंबात एकत्र राहणारी व्यक्ती मानसिक रोगी असल्याचे पटकन कळून येत नाही. पण तसेच काही घडल्यास या व्यक्ती समोर येतात.
त्याचप्रमाणे, स्किझोफ्रेनियाची लक्षणे असणारे लोक अत्यंत संशयी प्रवृत्तीचे असतात. त्या कोणत्याही व्यक्तींवर सहजा विश्वास ठेवू शकत नाही. ही मंडळी माझे चांगले झालेले पाहू शकत नाहीत. आपलं वाईट व्हावे यासाठी त्या काहीही करू शकतात. प्रसंगी आपला घातही करतील, अशी भीती सतत त्यांच्या मनात घर करून राहिलेली असते. स्वत:ला वाचवण्यासाठी ते हिंसक बनतात.
या आजाराचे रुग्ण लवकर आढळून आल्यावर त्यावर उपचार करणे सोपे जाते. सर्वसाधारणपणे मनोविकारतज्ज्ञांकडे रुग्ण पोहोचतात तेव्हा त्यांचा आजार खूप वाढलेला असतो. काही रुग्णांमध्ये हा आजार भूकंपासारखा अचानक येऊन ठेपतो. पण काही रुग्णांना हा आजार हळूहळू होतो. नातेवाईकांना व मित्र-मैत्रिणींना काही तरी बिनसले आहे हे कळते, पण नेमके काय ते कळत नाही. हे बदल पुढे येणाऱ्या मानसिक आजारांची लक्षणे असतील याचा त्यांना अंदाज नसतो. ही मंडळी कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून चिडचिड करणे, देवळात कधीही जाणे, उपवास करणे, अचानक खूप पूजा करणे असे काहीतरी विचित्रच वागतात, असे मानसोपचार तज्ज्ञांकडून सांगण्यात येतेय.
जसे, डेंग्यू, स्वाइन फ्लू, ब्लर्ड फ्लू, एबोला यांसारखे भन्नाट नाव असलेले जीवघेणे आजार जगभरात पाय रोवू लागले आहेत. या आजाराबाबत जनतेला कल्पनाच नाही. पण समाजात मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या जागरूकतेमुळे या आजाराची व्याप्ती व त्यावर करावयाची प्रतिबंधात्मक उपाययोजना याची माहिती लोकांना मिळाली. त्याचप्रमाणे स्किझोफ्रेनिया या आजारासंदर्भात लोक अज्ञानी आहेत. त्यामुळे या आजारासंदर्भातही लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली पाहिजे. जेणेकरून आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात किंवा शेजारी अशा व्यक्ती नजरेस पडल्यावर त्यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांना या आजारातून सुखरूप बाहेर काढता येऊ शकते.
स्किझोफ्रेनिया आजार म्हणजे काय?
स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार असून तो मेंदूचा विकारही आहे. मेंदूतील डोपामिन या रसायनाची मात्रा कमी झाल्याने हा विकार होतो. सिटोटोनिन या रसायनाची मात्राही या विकारात बदलते. माणसाचे विचार, भावना व वागणूक यांच्या सुसंगतीवर अवलंबून असते. पण स्किझोफ्रेनियात या तीन मुख्य गोष्टींमध्ये दोष निर्माण होतो. त्याच्या वास्तवाशी संबंध तुटतो व ते स्वत: आपल्याभोवती कुंपण घालतात. जेणेकरून या कुंपण्याच्या आत-बाहेरील कोणतीही व्यक्ती येऊ नये असे त्यांची धारणा असते. अशाप्रकारे अन्य व्यक्तींच्या तुलनेत या व्यक्ती अत्यंत विचित्र वागतात. आपण विचारतो एक ते उत्तर देतात दुसरेच, अशी अवस्था असते. त्यांच्या वागण्या-बोलण्यातले तारतम्य व समतोलपणा बिघडलेला असतो. आपण या जगात वावरताना आपले वेगळे अस्तित्व सामावून सामाजिक भान ठेवतो ते नेमके या व्यक्तींना जमत नाही.
लक्षणे
वागण्यात दिसणारे बदल : स्वत:शीच हसणे व बोलणे, उगाचच हातवारे करणे, भटकत राहणे, आरोग्याबाबत बेफिकीर राहणे, अस्वच्छ राहणे, आक्रमक होणे.
भावनिक बदल : परिस्थितीशी जुळवून न घेणे, चेहऱ्यावर वेडेपणाचा भाव, भावनांचा अनुभव स्वत:लाच जाणवत नाही, संशयीवृत्ती.
विचारांमधील बदल : विचारात सुसूत्रता नसणे, दोन वाक्यात वा कल्पनेत कुठलाच तर्कशुद्ध संबंध नसणे, बोलण्याचा अर्थ न समजणे.
भारतात अशा आजाराचे प्रमाण 2-3 टक्के असू शकते, असे काही संशोधनात दिसले आहे. हा आजार पटकन ओळखता येत नाही. कारण, याची लक्षणे स्किझोफ्रेनिआ व मूड डिसआर्डर या दोघांचीही असतात. पण, ती वेगवेगळ्या कालावधीत व्यक्त होतात. ते वेळीच लक्षात आले, तर औषधात बदल करता येतो.
स्किझो-ऑब्सेसिव्ह आजारात ओसीडी, सायकोसिस ह्या दोन्हीही आजारांची लक्षणे असतात. यातील ही दोन्ही प्रकारची लक्षणे एकत्र असू शकतात किंवा औसीडीची लक्षणे जास्त व सायकोसिसची लक्षणे कमी किंवा अगदी ह्या उलटही असू शकतात. ही लक्षणे एकमेकांशी निगडित असू शकतात किंवा त्यांचा एकमेकांशी काहीच संबंधही नसतो. या दोन आजारांचा समावेश असल्याने हे उपचार करण्यास जरा क्लिष्ट आहेत. तसेच उपचारादरम्यान औषधात सतत बदल करावा लागतो. काही लक्षणे ही कुटुंबीयाबद्दल असतील तर बरंच फॅमिली कौन्सिलिंग करायला लागते. स्किझोफ्रेनिआ आजारावर मात करण्यासाठी फक्त औषधेच नाही, तर डॉक्टर, पेशंट व कुटुंब हे तिन्हीही त्रिकूट छान जुळले, तर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम दिसतो.
स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार असला तरी तो मेंदूचाच एक विकार आहे. या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्ती एकलकोंड्या असतात. समाजातील वास्तविक घटनांशी असलेली नाळ तुटलेली असते. अशा स्थितीत हे लोक भ्रामक व आभासी जगात जगू लागतात. एका क्षणाला त्यांचा स्वत:च्या मनावरचा ताबा सुटतो. हा आजार वेळीच लक्षात आल्यावर उपचार झाल्यास यातून बाहेर पडता येते. मात्र, बहुतांश वेळा आपल्या सहवासात रममाण होणारी व्यक्ती मानसिक रोगी असल्याचे पटकन कळून येत नाही. तसंच काही घडल्यास या व्यक्ती आपसुकच समाजासमोर येतात.