मेकअप करायला प्रत्येक मुलीला आवडतं. पण मेकअप करणं ही एक कला आहे आणि आवश्यक नाही की प्रत्येक जण या कलेत पारंगत असेलच. मेकअप हे खूप मोठं क्षेत्र आहे. मेकअप करण्यापासून ते मेकअपमधील बारकावे आणि मेकअप करताना होणाऱ्या चुकाही ह्यात सामील आहेत.काही जणी घरून निघताना अगदी पूर्ण मेकअप करूनच बाहेर पडतात तर काही मुली काजळ आणि लिपस्टीक लावून रेडी होतात. प्रत्येकीची मेकअप करण्याची आवड आणि परिभाषा वेगळी आहे. काहींना मेकअप करायला आवडत तर असतं पण मेकअप करता येत नाही. कारण त्यांना मेकअप टीप्सची माहिती नसते.
स्वतःचा मेकअप करत असताना काही गोष्टींची काळजी आणि माहिती असणं फार महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण स्वतःचा मेकअप स्वतः करतो तेव्हा प्रामुख्याने आपण रोजच्या दैनंदिनसाठी करत असतो. आपल्या कामाच्या ठिकाणी जाताना अथवा एखाद्या छोटेखानी कार्यक्रमाला जाताना. प्रत्येक वेळेस मेकअपमधील सगळीच सौंदर्य प्रसाधने वापरून मेकअप करावा लागतो हा समज चुकीचा आहे. म्हणून तर मेकअपमध्ये अनेक प्रकार आहेत. प्रामुख्याने मेकअपमध्ये आजकाल प्रचलित असणारे एचडी, थ्रीडी , लॉंग लास्टिंग, एअर ब्रश, वॉटरप्रूफ मेकअप हे सध्या बाजारपेठेमध्ये खूप प्रचलित आहेत, यासोबत ब्रायडल पार्टीवेअर असे अनेक मेकअप आपण ऐकून आहोत. पण प्रामुख्याने मेकअप हे माणसाच्या रोजच्या गरजेप्रमाणे अथवा दैनंदिन कामकाजाप्रमाणे करणे हे गरजेचे ठरते आणि यासाठी सेल्फ मेकअप हा उपयोगी ठरतो.
सगळ्यात आधी पाहूया मेकअपसाठी वापरण्यात येणारे मेकअप प्रोडक्ट्सबद्दल. हे सर्व मेकअप प्रोडक्ट्स तुम्हाला बाजारात किंवा ऑनलाइन अगदी सहज मिळतील. मेकअप करण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते योग्य मेकअप प्रोडक्ट्स निवडणं. फक्त टीव्हीवरील जाहिराती पाहून किंवा सेल्समनचं ऐकून अथवा प्रचलित असणार कोणतंही प्रोडक्ट घेऊ नका. आपल्याला आपल्या त्वचेच्या गरजेप्रमाणे आणि आपल्या मेकअप च्या गरजेप्रमाणे प्रॉडक्ट निवडता आले पाहिजे. चांगला मेकअप करण्यासाठी तुमच्याकडे काही चांगले मेकअप प्रोडक्ट्स असणं महत्वाचं आहे.
तुम्हाला अशाच मेकअप प्रोडक्ट्सबद्दल त्यातले ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजेच कार्यक्षम असे घटक जे त्वचेला हानी पोहोचवत नाहीत असे काही घटकही आम्ही ओळख करून देणार आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनातल्या मेकअप मध्ये जे काही मेकअप प्रॉडक्ट वापरतो त्यामध्ये काय घटक असतात याची आपल्याला माहिती असली पाहिजे. जसा आपण एखादा पदार्थ तयार करताना तू तयार होण्यासाठी त्यामध्ये अनेक काही छान गोष्टींचा समावेश करतो आणि मग तो तयार झालेला अन्नपदार्थ आपण डेकोरेशन करून प्लेटमध्ये सर्व करतो तसेच काहीसे आपल्या चेहऱ्यावरील मेकअपचे असते. तो करताना खूप विचार करून त्यातील घटकांचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे हे जाणून घेऊन करावा.
दैनंदिन जीवनातील सेल्फ मेकअप करताना सर्वात महत्त्वाचा प्रॉडक्ट येतो तो फाउंडेशन, बाजारामध्ये अनेक प्रकारचे फाउंडेशन उपलब्ध असतात, यामध्ये लिक्विड फाउंडेशन, ऑइल फाउंडेशन, क्रीम फाउंडेशन असे अनेक प्रकारचे फाउंडेशन आपण पाहत असतो तेही अनेक प्रकारच्या कंपन्यांचे. सेल्फ मेकअप मध्ये फाउंडेशन चा वापर सर्रास केला जातो जे आपण फेसवर सगळ्यात आधी लावण्यात येत. म्हणजेच फाउंडेशन हा तुमच्या मेकअपचा बेस असतो.
भारतीय स्कीनटोन साधारणत नॉर्मल, ड्राय, ऑयली, मिक्स, डार्क आणि लाइट आणि काहीशा पिगमेंटेड अशा असतात. फाउंडेशनची शेड ही स्कीनटोन्स लक्षात घेऊन बनवल्या जातात. त्यामुळे सर्वात आधी फाउंडेशनची शेड निवडताना तुमच्या चेहऱ्याशी कोणती शेड ब्लेंड होईल ते पाहून घ्या. योग्य टोनचं फाउंडेशन खरेदी करताना सर्वात आधी आपल्या अंगठ्यावर किंवा हातावर थोडं फाउंडेशन लावून बघा. हे फाउंडेशन कधी पाण्यासोबत तर कधी तेलासोबत लावून बघा. ठराविक कालावधीत तिथे लावून ठेवा एक तासाभरानंतर त्या रंगात काय फरक पडतो याचा अभ्यास करून मगच फाउंडेशन निवडा. फाउंडेशनचे वेगवेगळे प्रकार असतात, क्रीम फाउंडेशन, लिक्वीड फौंडेशने, ऑईल फाउंडेशन, केक फाऊंडेशन. यामध्ये मिनरल ऑईल, वॅक्स पिगमेंट, ऑईल, वॉटर,क्ले, जेल, कर्णोबा वॅक्स, कलर पिगमेंट हे मुख्य घटक असतात.
कन्सिलर हा दुसरा महत्त्वाचा घटक. कन्सिलर म्हणजे तसे पाहता दैनंदिन कामकाजाच्या दृष्टीने जो मेकअप आपण करतो. त्यामध्ये कन्सिलरचा वापर फार कमी असतो, पण तरीही कधी कधी अनेकांची त्वचा ही पिगमेंटेड असू शकते अथवा काही डाग असू शकतात. यासाठी त्यांना ते लपवण्यासाठी हा कन्सिलर मदतनीस ठरतो. डोळ्याखालील काळी वर्तुळे लपवण्यासाठी कन्सिलरची फार मोठी मदत होते. कन्सिलर वापरला तरी ठराविक कालावधीसाठीच हे लपवता येते. कन्सिलरमध्येही तीन ते चार रंग सौंदर्य प्रसाधनांमधे आपल्याला बाजारात आढळतात यामध्ये केशरी,निळा, मातकट ब्राऊन, हलका हिरवा, गुलाबी हे रंग उपलब्ध आहेत, कन्सिलरचा वापर चेहऱ्यावरील डाग, व्रण आणि बरेच वेळा लाल चट्टे लपवण्यासाठी केला जातो. कंसीलरच्या वापराने चेहऱ्यावरील पिंपल्ससुध्दा दिसत नाहीत. जर तुमच्या चेहऱ्याचा रंग अधिक गोरा असेल तर कंसीलर वापरताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की ते तुमच्या स्कीनटोनशी मॅच होणारं असलं पाहिजे.बाजारपेठेत खरेदी करीत असताना कन्सिलरमध्ये मुख्यतः कर्नोबा वॅक्स, पिगमेंट स्टिक, मिनरल ऑईल, मिनरल वॅक्स हे घटक असतात . हे घटक उपलब्ध असले पाहिजे याची आपण दखल घ्यावी.
याच सोबत सेल्फ मेकअपमध्ये काजल पेन्सिल, आय लाइनर, पावडर, मस्कारा, लिपस्टिक यांचा वापर सर्रास होत असतो. या गोष्टींमधील ही महत्त्वाचे घटक आपण जाणून घेणे गरजेचे असते. कारण हे सगळे प्रॉडक्ट आपण अगदी लहान मुलांपासून स्वतःपर्यंत वापरत असतो. जिथे जिथे रंग येतो तिथे तिथे थोड्याफार प्रमाणात रसायन हे उपलब्ध असते. म्हणजेच प्रत्येक मेकअप प्रॉडक्ट हा थोड्याफार प्रमाणात रासायनिक तत्वांनी बनलेला असतो त्याची जर का नीट माहिती न घेता आपण वापरले तर आपणच आपले भविष्य धोक्यात आणत असतो.
The post सौंदर्यांची उपासना : दैनंदिन जीवनातील मेकअप appeared first on Dainik Prabhat.