[[{“value”:”
Children Sharing Pictures : सध्या संपूर्ण जगातच सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. याचे काही दुष्परिणाम देखील पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घातली आहे. त्यातच आता भारतात देखील लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरण्यावर काही प्रतिबंध येण्याची शक्यता आहे. 18 फेब्रुवारीनंतर याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं आहे. लोकांचा अभिप्राय घेऊन यावर केंद्रसरकार निर्णय घेणार आहे.
18 वर्षांखालील लहान मुलांना आता सोशल मीडियावर अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी घेणे आवश्यक असेल. डेटा प्रोटेक्शन 2025 (Digital Personal Data Protection Rules, 2025) च्या नवीन मसुद्यामध्ये या नियमांचा उल्लेख आहे. यामुळे कंपन्यांना पालकांची मंजूरी मिळत नाही तोपर्यंत लहान मुलांच्या डेटाचा वापर अथवा स्टोर करता येणार नाही.
दरम्यान, असं असलं तरी दुसरीकडे मात्र चित्र काहीस वेगळंच असल्याचं दिसून येत. मुलं जरी सोशल मीडियावर पासून लांब जात असले तरी त्यांचे पालक मात्र, आपल्या मुलांना फेसबुक, इंस्टाग्राम, आणि इतर माध्यमांसमोर घेऊन जात आहेत. थोडक्यात बोलायचं तर, स्वतः पालकच आपल्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर असतात.
प्रत्येक मुलं आपल्या पालकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असते. त्यांचा निरागस आणि खोडकरपणा पाहून एक वेगळाच आनंद मिळतो. अशा सुंदर क्षणांची जपणूक करण्यासाठी पालक अनेकदा मुलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात, किंवा स्टेटसला ठेवतात, असे कंटेट यूजर्सना खूप आवडते.
पण लाईक्स आणि व्ह्यूजच्या नादात आपल्या मुलांची वैयक्तिक ओळख (प्रायव्हसी) कुठंय तरी जगासमोर येत आहे आणि हे कितपत सुरक्षित आहे? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ! त्यामुळे याच गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत…. या प्रकाराला ‘शेरेंटिग’ असं म्हंटलं जात म्हणजे ‘शेअर आणि पालकत्व’.
मुलांचे फोटो शेअर किंवा स्टेटसला ठेवताय?
जेव्हा मुलं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मोठी होत असतात. ते गोष्टी समजून घेण्याची आणि स्वतःशी जोडण्याची क्षमता विकसित करतात. अशा वेळी, त्यांचे फोटो किंवा रील शेअर केल्याने त्यांच्या प्राइव्हसीपासून त्यांच्या वागण्यापर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. मुलांशी संबंधित चुकीचा मजकूर पोस्ट करणे इंटरनेटच्या जगात धोकादायक ठरू शकते. त्यांच्या भविष्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
लाईक्स आणि व्ह्यूजच्या नादात होऊ शकतात गंभीर परिणाम :
– मुलांचे भविष्य : इंटरनेटवर काहीही पोस्ट केल्यानंतर, ते काढून टाकणे खूप कठीण आहे. लोक ऑनलाइन शेअर केलेल्या गोष्टींचे स्क्रीनशॉट घेतात. लहान मुलांचा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ शेअर करताना आपलं मूल मोठं झाल्यावर त्याच्यावर किती परिणाम होऊ शकतो याचा नक्कीच विचार करा. अन्यथा मुलांना लाजिरवाणी गोष्टींचा सामना करावा लागेल.
– ऑनलाइन किडनॅपिंग : तुमच्या मुलाचे ऑनलाइन किडनॅपिंग होऊ शकते, म्हणजेच फक्त मुलाचे फोटो आणि व्हिडिओ दुसऱ्या नावाने आणि ओळखीसह वापरले जाऊ शकतात. त्यामुळे हे मुलं आमचं असल्याचं देखील दावा इतर लोक करू शकतात.
– सायबर बुलिंग : तुमच्या मुलांना थेट सायबर बुलिंगचा सामना करावा लागेल. फोटो किंवा व्हिडीओ पाहून मुलांना चिडवले जाते. नकारात्मक कमेंट्स केल्या जातात. उंची आणि रंग यावर देखील भाष्य केलं जात. ज्यामुळे मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमचं मुलं मानसिक दृष्ट्या खचून जाऊ शकत.
– अश्लील कंटेट : काही लोक चुकीच्या मार्गाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंचा फायदा घेतात. या ‘पीडोफाइल’ना चाइल्ड पोर्नोग्राफीचे वेड असते. असे लोक लहान मुलांचे फोटो आणि व्हिडीओ एडिट करून आक्षेपार्ह वेबसाईट्स किंवा फोरमवर पोस्ट करतात. हा खूपच खतरनाक प्रकार आहे.
– डिजिटल फूटप्रिंट कायम राहते : एकदा फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड झाल्यावर, तो कायमचा डिजिटल फूटप्रिंटचा भाग होतो. भविष्यात मुलांच्या परवानगीशिवाय तो फोटो, व्हिडिओ कुठेही दिसू शकतात.
– मुलांचे अपहरण होऊ शकते : मुलांची व्यक्तिगत माहिती (नाव, शाळेचे नाव, लोकेशन) फोटोमधून सहज मिळू शकते त्यामुळे मुलांचे अपहरण होण्याची शक्यता असते. तसेच फोटो कोणत्याही अज्ञात व्यक्तींकडून डाऊनलोड किंवा चुकीच्या हेतूसाठी वापरले जाऊ शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगली पाहिजे.
– क्रिएटिव्ह पद्धतीचा वापर करा : सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो शेअर करताना काही इमोजींचा (स्टिकर्स) वापर करा, अनेक कलाकार मंडळी आपल्या मुलांचे फोटो शेअर करताना अश्या पद्धतीचा वापर करतात. इमोजीचा वापर करताना मुलांचा चेहरा दिसणार नाही याची काळजी नक्की घ्या.
सावधगिरी कशी बाळगावी?
गोपनीयता सेटिंग्ज वापरा : तुमच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरील गोपनीयता सेटिंग्ज ‘फक्त मित्रांसाठी’ ठेवा.
फोटो निवडून शेअर करा : प्रत्येक फोटो शेअर करण्याआधी विचार करा की तो फोटो सार्वजनिक व्हावा का.
लोकेशन टॅगिंग टाळा : फोटो शेअर करताना लोकेशन टॅगिंग बंद ठेवा.
मुलांची परवानगी घ्या : फोटो शेअर करण्याआधी मुलांची आणि घरच्यांची परवानगी घ्या.
सायबर सिक्युरिटीबद्दल जागरूकता ठेवा : सोशल मीडियाचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करा.
कायदा काय सांगतो?
भारतामध्ये आणि जगभरात लहान मुलांच्या फोटोंचे सोशल मीडियावर शेअरिंगसंदर्भात थेट कायदे नसले तरी, मुलांच्या गोपनीयतेचे आणि अधिकारांचे संरक्षण करणारे अनेक कायदे आणि नियम लागू होतात. यामध्ये मुलांच्या हक्कांसह त्यांचा गैरवापर होऊ नये याची काळजी घेतली जाते.
भारतीय कायदा :
‘पॉक्सो कायदा’ बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी कायदा आहे. पॉक्सो कायद्यानुसार, 18 वर्षांखालील सर्व मुलं “बालक” या श्रेणीत येतात, आणि त्यांचं लैंगिक शोषण गुन्हा मानला जातो. जर मुलांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि तो अश्लीलतेसाठी वापरण्यात आला, तर हा कायद्याचा भंग मानला जातो.
कायद्याचे उल्लंघन झाल्यास परिणाम :
पॉक्सो कायद्याखाली दोषी व्यक्तीला आर्थिक दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. अश्या स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये 5 ते 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आहे. बालकांच्या अश्लील सामग्रीचे उत्पादन, प्रसार, किंवा संग्रह करणाऱ्यांना 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि आर्थिक दंड होतो. तसेच, सायबर गुन्हे शाखा मुलांच्या फोटोचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करू शकते.
सोशल मीडियावरील नियम :
फेसबुक, इंस्टग्राम आणि युट्युब यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अश्लीलता, हिंसा किंवा बालशोषणाशी संबंधित सामग्री शेअर करणे निषिद्ध आहे. अशा प्रकारची सामग्री प्लॅटफॉर्मवर आढळल्यास ती लगेच हटवली जाते, आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाऊ शकते. त्यांचे सोशल मीडिया अकाउंट देखील बंद होऊ शकते.
निष्कर्ष :
सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो शेअर करणे आकर्षक वाटत असले तरी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पालकांनी आणि नातेवाईकांनी जबाबदारीने वागून मुलांच्या गोपनीयतेचे आणि सुरक्षा हक्कांचे रक्षण करावे. अन्यथा आपणच आपल्याला मुलाला एखाद्या मोठ्या संकटात अडकून ठेऊ आणि यातून बाहेर पडणे देखील कठीण होऊन बसेल. त्यामुळे सर्वात आधी स्वतः पालकांनीच जागरूक होणे गरजेचे आहे.
The post सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो शेअर करणं खरंच गरजेचं आहे का? धोके आणि काळजी…. appeared first on Dainik Prabhat.
“}]]