दरवर्षी सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढती आहे. म्हणूनच “सेल्फी किल्फी’ म्हणूनही बदनाम झाली आहे. यातही महिला अधिक प्रमाणात सेल्फी काढत असल्या तरी मृत्यू होण्यामध्ये पुरुषांचं प्रमाण त्यांच्यापेक्षा सुमारे तिप्पट असल्याचं दिसून आलं. सेल्फीच्या नादात अशा अनेक नकळत आत्महत्या घडून जात आहेत.
जीवन अमूल्य आहे, अशी वाक्यं या तरुणांनी ऐकलेले असली तरी त्यांना त्याचा नेमका अर्थ कळलेला नसतो. अतिउत्साह, जोम, जोश ही तरुणाईची लक्षणं आहेतच; परंतु त्याबरोबरच विवेक नसेल तर असे अनेक अपघात वेळोवेळी घडत राहतील. गंमत, मजा आणि अतिरेकी फाजील धाडस यातील सीमारेषा धूसर असते हे विवेकाखेरीज समजू शकत नाही. म्हणूनच ग्रामस्थांचा सल्ला धुडकावून अनेक हुशार तरुण समुद्रात धोकादायक जागी बिनदिक्कत पोहायला जातात आणि बुडतात.
असे हकनाक बळी जाणं वैयक्तिक, कौटुंबिक वा सामाजिकदृष्ट्याही परवडणारं नाही. त्यामुळे बेशिस्त वर्तनाला आळा घालणं आणि मनाला स्वैर सोडू देण्यास लगाम घालण्याची आवश्यकता आहे. सेल्फीचं वेड. हे वेड तरुणाईत एवढं भिनलं आहे की, जिवावर उदार होऊन सेल्फी घेण्याचे प्रकार वाढले आहेत. साहजिक अशा प्रयत्नात जीव गमवावा लागल्याच्याही घटना समोर येत आहेत. यातून तरुणाई काही धडा घेणार का, हा खरा प्रश्न आहे. परंतु एकूणच तरुणाईचा उन्माद आणि बेपर्वा वृत्ती लक्षात घेता सेल्फीच्या वेडाला आवर घालणं कठीण असल्याचं दिसतं.
मुख्यत्वे केवळ राजकीय अगर सामाजिक प्रतिमेलाच सेल्फीमुळे धोका निर्माण होत नसून अनेक धोक्यांच्या ठिकाणी सेल्फी काढून तथाकथित धाडसाचे फोटो अपलोड करण्याच्या वेडामुळे तरुण आपल्या जीवालाच धोका निर्माण करत आहेत. अत्यंत धोकादायक ठिकाणी सेल्फी काढून आपण किती कूल आहोत हे दाखवण्याची ती संधी आहे, असं त्यांना वाटतं आणि मग नार्सिसप्रमाणे स्वप्रेमानं पछाडलेले हे तरुण-तरुणी प्राण गमावून बसतात. नागपूरच्या तरुणांचा वेणा जलाशयातील अघटीत मृत्यू हे सत्य पुन्हा एकदा अधोरेखित करत आहे. सोशल मीडियाचा आणि त्या संदर्भातील सुविधांचा वापर अत्यंत जबाबदारीनं केला पाहिजे, याचं भान आज तरुणाईलाच नव्हे तर प्रौढांनाही उरलेलं नाही, हे पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींमधून समोर आलं.
आपण एखाद्या माध्यमासाठी आयुष्यातील किती काळ खर्च करावा याचं भान अनेकांना नसतं. त्यामुळे आभासी दुनिया हेच त्यांचं खरं जग बनतं आणि त्यातून नात्यांमधील दरी वाढणं, एकलकोंडेपणा येणं आणि नैराश्याचा आजार जडणं यासारखे विकार जडतात हे अनेक संशोधनांमधून समोर आलं आहे. तरीही निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर निसर्गसौंदर्याचा आस्वाद न घेता सेल्फीसाठी वेडावून जाणं हा गंभीर प्रकार म्हणावा लागेल.
फेसबुक, इंस्टाग्राम आणि स्नॉपचॅट यासारखी व्यासपीठं उपलब्ध झाल्यामुळे आपले विचार आणि फोटो शेअर करण्यास व्यापक व्यासपीठ उपलब्ध झालं, हे खरं. मात्र जगभरच्या लोकांशी या माध्यमाद्वारे संवाद साधण्याची, जोडलं जाण्याची किमया साध्य झाल्यावर त्यातूनच सेल्फीचं वेड फोफावलं. सेल्फीमुळे मानसिक आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. त्याबरोबर अधिकाधिक प्रेक्षणीय, धोकादायक ठिकाणांवरून सेल्फी काढून पोस्ट करण्याच्या नादातून अनेक अपघात घडत असल्याचे आणि जगभरच अनेकांचे मृत्यू होत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.