सासवड,(प्रतिनिधी) – स्वच्छ सर्वेक्षण 2023-24 अभियानात सासवड नगरपरिषदेने कचरामुक्त शहरासाठी थ्री स्टार मानांकन आणि वॉटर प्लस उच्चतम मानांकनात देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी शुक्रवारी (दि. 9) दिवसभर सासवडकर नागरीकांच्या वतीने जल्लोष स्वच्छतेचा, जल्लोष जनतेचा आनंदोत्सव पार पडणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
जल्लोष स्वच्छतेचा, जल्लोष जनतेचा कार्यक्रमाबाबत गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांशी आमदार संजय जगताप यांनी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमांमध्ये सकाळी 9 ते 11 पर्यंत आरोग्य रथाची संपूर्ण गावातून मिरवणूक व प्रभात फेरी होणार असून यामध्ये ठिकाणी ठिकठिकाणचे नागरिक, गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, पालिकेचे आजी-माजी पदाधिकारी, कर्मचारी, शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
यानंतर सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत नगरपालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहात सासवड नगरपरिषदेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत सासवडच्या जडणघडणीत योगदान असलेल्या आजी-माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, शिक्षण मंडळाचे सभापती, सदस्य, पालिकेचे आजी माजी मुख्याधिकारी, विभागप्रमुख, आरोग्य तसेच पाणीपुरवठा, बाग कर्मचार्यांचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानित करण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वा येथील पालखी तळ क्रं 2 वर चला हवा येऊ द्या टिमच्या कलाकारांच्या उपस्थितीत जल्लोष स्वच्छतेचा, जल्लोष जनतेचा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सलग सहा वेळा देशात अव्वल स्थान
सासवड नगरपरिषदेने यापूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष चंदूकाका जगताप यांच्या नेतृत्वाखाली 2002 ते 2008 या कालावधीत राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर सलग सहा वेळा प्रथम क्रमांक आणि लाखो रूपयांची बक्षिसे पटकावली असून स्वच्छचेबाबतची हीच परंपरा पुढे सुरू ठेवत केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात 2017 ते 2023 या कालावधीत सलग सहा वेळा देशात अव्वल स्थान पटकावित पुरस्कार आणि कोट्यवधींची बक्षीसे मिळविली आहेत.
The post सासवडमध्ये उद्या स्वच्छतेचा जल्लोष appeared first on Dainik Prabhat.