पुणे – शहरातील 4.65 लाख बालकांची महापालिकेतर्फे तपासणी करण्यात आली असून, त्यातील तीन हजार 340 बालकांना अशक्तपणा, 604 बालकांना लठ्ठपणा, 380 बालकांमध्ये “व्हिटॅमिन ए’ ची कमतरता असल्याचे आढळून आले. तसेच 704 बालकांमध्ये “व्हिटॅमिन बी’ आणि एक हजार 228 “व्हिटॅमिन डी’ची कमतरता असल्याचे नोंदवण्यात आले.
राज्याच्या “जागरुक पालक, सुदृढ बालक’ तपासणी कार्यक्रमांतर्गत पुणे महापालिकेने शहरातील खाजगी, सरकारी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील लक्ष्य गटातील 6.79 लाखांपैकी 4.65 लाख विद्यार्थ्यांची तपासणी केली आहे. दि. 9 फेब्रुवारीपासून हा कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये मुलांमधील जीवनसत्त्वांची कमतरता, दोष आणि अन्य विकारांची तपासणी करण्यात आली होती आणि आता त्यांच्यावर नंतर त्यानुसार उपचार केले जातील. सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की मुलांमध्ये नोंदवलेल्या बहुतांश कमतरतांपैकी अशक्तपणा किंवा लाल रक्तपेशींची कमतरता सर्वात जास्त नोंदवली गेली आहे, त्यानंतर “व्हिटॅमिन डी’ची कमतरता, “व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स’, लठ्ठपणा आणि नंतर “व्हिटॅमिन ए’ कमतरता दिसून आली आहे.
राज्य आरोग्य विभागाच्या कार्यक्रमाअंतर्गत मुलांमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच तपासणी आहे. या डेटासह आम्ही आता मुलांमधील पोषणाच्या कमतरतेवर लक्ष केंद्रित करू शकतो. मुलांची ही शारीरिक विकासाची वर्षे असतात. त्यामध्ये कोणत्याही पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे त्यांना पुढे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. या माहितीच्या सहाय्याने आम्ही आमचे आरोग्य कार्यक्रम देखील त्यानुसार डिझाइन करू शकतो. गंभीर आजार असणाऱ्या, शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्या मुलांना तत्काळ आरोग्यसेवाकेंद्रात उपचार सुरू केले आहेत.
– डॉ. वैशाली जाधव,सहायक आरोग्य अधिकारी, मनपा
साथरोग काळात अनेक भागातील मुलांना पोषक आहार मिळत नव्हता त्यामुळे अशा मुलांमध्ये जीवनसत्त्वांचा अभाव दिसून आला होता. या अभावामुळे मुलांच्या सर्वांगिण विकासावर परिणाम होतो. आम्ही त्याविषयी जागृती करत आहोत.
– डॉ. आरती किणीकर, बालरोग विभागप्रमुख, ससून रुग्णालय
The post साडेचार लाख बालकांमध्ये ‘व्हिटॅमिन-डी’ कमतरता ! पुणे शहरातील 4.65 लाख बालकांची महापालिकेतर्फे तपासणी appeared first on Dainik Prabhat.