शहरातील धावपळीचे जीवन, गर्दी, गोंगाट आणि तणाव या सगळ्यांपासून काही दिवस लांब राहायचे असेल तर त्यासाठी हिमालयाच्या कुशीतील हाबन या निसर्गरम्य ठिकाणी एकदा गेल्यावर तुम्हांला नक्की पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल. हे ठिकाण हिमाचल प्रदेशात असले तरी चंडीगडपासून केवळ 135 किलोमीटर अंतरावर आहे. पर्यटकांसाठीचा जिल्हा अशी ओळख असलेल्या सिरमौरमधील चूडधार पर्वतरांगेच्या कुशीत हाबन वसलेले आहे.
राजगढ या तालुक्याच्या ठिकाणापासून ते 30 किलोमीटर अंतरावर आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यात याठिकाणी तुफान बर्फवृष्टी होते. या सगळ्या परिसरात मोठमोठ्या देवदार वृक्षांचे
घनदाट जंगल आहे. त्यामुळेच पर्यटक इथे पुन्हा पुन्हा भेट देत असतात.
हाबन हे गाव स्वातंत्र्यलढ्यातील अनेक सेनानींचे गाव म्हणूनही ओळखले जाते. कारगिल युद्धातील वीरजवानांची भूमी अशीही गावाची ओळख आहे. पहाडी लोक संस्कृतीच्या रक्षणासाठी याठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. इथले कलेविषयी प्रेम असणारे डॉ. वाय. एस. परमार यांनी हाबनमध्ये पहाडी कलाकार संघाची स्थापना केली. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 7000 फूट उंचावर आहे. चूडधार पर्वतरांगातून वाहणारे छोटे झरे, ओढे आणि नद्यांमुळे इथल्या निसर्गसौंदर्यात भर पडलेली आहे. हाबनच्या जवळच फागू हे आणखी एक रमणीय ठिकाण आहे.
स्थानिक युवकांनी त्याठिकाणी पर्यटकांसाठी कॅम्पिंगची सोय केलेली आहे. जवळच नैसर्गिक ओढे आणि झऱ्यांमधून येणाऱ्या पाण्याला दिशा देऊन निसर्गसुंदर तलावही तयार करण्यात आला आहे. त्यामुळेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये देशभरातून पर्यटक याठिकाणी येत असतात. हाबनपासून चूडाधार पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर जेमतेम आठ ते ऩऊ किलोमीटर अंतरावर आहे. हाबनमध्ये राहण्यासाठी पर्यटक निवास, हॉटेल्स तसेच घरांमध्येही पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था आहे. चंडीगडहून सोलन राजगढ मार्गे रस्त्याने हाबनला पोचता येते. राजधानी सिमल्यापासून हे ठिकाणी 75 किलोमीटर आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ चायलहून सनोरा, नेरीपूलमार्गेही हाबनला जाता येते.