वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडच्या संशोधनातील निष्कर्ष
लंडन : जगभरात सर्वत्रच शाकाहाराचे महत्त्व लक्षात येऊ लागले आहे. शाकाहारामुळे अनेक रोगांना दूर ठेवता असे आत्तापर्यंत आरोग्य विषयक संशोधनातून समोर आले आहे. आता एका नवीन संशोधनाप्रमाणे शाकाहारी व्यक्तींना मांसाहार करणाऱ्या व्यक्तींपेक्षा कॅन्सरचा धोका 14 टक्के कमी असतो असे सिद्ध झाले आहे.
वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड आणि रिसर्च युके आणि पॉप्युलेशन हेल्थ या महत्त्वपूर्ण संस्थांनी संयुक्तपणे केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. मेडिसिन जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संस्थांनी जगभरातील एकूण चार लाख 72 हजार लोकांवर संशोधन केले. गेल्या सुमारे बारा वर्षातील या सर्व लोकांच्या आहार विषयक सवयींचा अभ्यास करण्यात आला या सर्व लोकांना चार विभागांमध्ये वाटण्यात आले होते. त्यामध्ये आठवड्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्तवेळा मासांहार करणारे त्यानंतर आठवड्यात तीनपेक्षा जास्तवेळा मांसाहार करणारे आणि फक्त मत्स्याहार करणारे आणि फक्त शाकाहार करणारे असे चार गट तयार करण्यात आले होते.
या सर्व लोकांच्या आरोग्याचा अभ्यास करता जास्त मांसाहार करणाऱ्यापेक्षा कमी मांसाहार करणार्यांना कर्करोगाचा धोका दोन टक्के कमी होतो. तसेच फक्त मत्स्याहार करणाऱ्यांचा कर्करोगाचा धोका दहा टक्क्यांनी कमी होतो. तर फक्त शाकाहार करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण 14 टक्के यापेक्षाही जास्त आहे. म्हणजेच फक्त शाकाहार करणार्यांना कर्करोग होण्याचा धोका 14 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
शाकाहारी महिलांमध्ये मेनोपॉजनंतर स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाणही 18 टक्क्याने कमी असल्याचे या संशोधनातून समोर आले. शाकाहारामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होतेच, शिवाय डायबिटीस सारख्या रोगांना दूर ठेवता येते. त्याशिवाय वजनही नियंत्रित राहत असल्याने या लोकांना कॅन्सर पासूनही दूर राहता येते असा या संशोधनातील निष्कर्ष आहे.
error: Content is protected !!