रोज नियमितपणे दहा मिनिटे ध्यानधारणा करण्यामुळे हातातील कामावर चित्त एकाग्र होण्यासाठी मदत होते. मन इकडेतिकडे सैरावैरा धावत नाही. मन चिंतामुक्त आणि तणावमुक्त राहण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरते.
नियमितपणे ध्यानधारणा करण्यामुळे आपले विचार, विचारपद्धती आणि भावना समजून घेण्यास मदत होते. त्यातून मग कोणत्याही वाक्यावर, घटनेवर, चर्चेमध्ये कशा पद्धतीने व्यक्त व्हावे, कुठे प्रतिसाद द्यावा, कुठे प्रतिक्रिया व्यक्त करावी, हे लक्षात येण्यास मदत होते. आपण जागृत बुद्धीने निवड करू शकतो.
ध्यानधारणेमुळे आपली कार्यक्षमता वाढते. तसेच उत्पादकताही वाढते. ध्यान धारणेमुळे शिकण्याची क्षमता आणि समजावून घेण्याची क्षमता वाढीस लागते. त्याचबरोबर तुम्ही हाती घेतलेल्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकता.
ध्यानधारणेमुळे भावनांचे नियमन करणे सोपे होते. अनेकदा आपल्याला भावनांचे नियमन व नियंत्रण कसे करायचे हे समजत नाही आणि मग आपण अनावश्यकरीत्या भावना व्यक्त करतो. जर का तुम्ही नियमितपणे ध्यानधारणा करत असाल तर भावनांवर नियंत्रण ठेवणे, त्यांचे नियमन करणे हळूहळू जमू लागते. म्हणजेच कुठलाही पूर्वग्रह न ठेवता तुम्ही तुमच्या भावनांकडे तटस्थपणे पाहू शकता आणि आपल्या मनावर त्यांचा कोणताही परिणाम न होता तडकाफडकी भावना व्यक्त करण्याची सवय कमी कमी होत जाईल याकडे आपण शांतपणे पाहू शकतो.
नियमित ध्यानधारणेमुळे आपल्या झोपेची गुणवत्ता सुधारते. ध्यानधारणा करत असताना आपण मनस्वास्थ्याची तंत्रे हळूहळू अवगत करत जातो. त्याचा परिणाम स्वाभाविकपणे आपल्या झोपेची गुणवत्ता सुधारण्यात होतो. ध्यानधारणा करण्यामुळे आपल्याला शांत व गाढ झोप लागण्यास मदत होते.
वेदनांचे व्यवस्थापन शक्य होते. अनेकदा आपल्याला शारीरिक किंवा मानसिक वेदना होतात. जेव्हा तुम्ही ध्यानधारणा करता, तेव्हा अशा वेदना कशा पद्धतीने सहजपणे सहन करायच्या हे समजू लागते. जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासावर आणि तुम्ही उच्चारत असलेल्या मंत्रावर लक्ष केंद्रित करता तेव्हा स्वाभाविकपणे तुमच्या मनातील अस्वस्थता हळूहळू कमी होत जाते.
सृजनशीलतेत वाढ होते. जेव्हा तुम्ही नियमितपणे रोज दहा मिनिटे ध्यानधारणा करण्याची सवय लावता त्यावेळी तुमचे मन स्वस्थ चित्त होते आणि त्याचा परिणाम म्हणजे तुमच्यातील सृजनशीलतेला चालना मिळते. विविध कल्पना आणि संकल्पना सहजपणे तुमच्या मनात येऊ लागतात आणि त्यातूनच पुढे तुम्ही चौकटी बाहेरचा विचार करू शकता.
प्रतिकारशक्ती वाढते. ध्यानधारणेमुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे प्रतिकारशक्ती बळकट होते. शरीर विविध आजारांना अधिक प्रभावीपणे प्रतिकार करू लागते.
अनुभूतीत वाढ होते. ध्यानधारणेमुळे माणसांमध्ये सहजपणे दयाळूपणा, दुसऱ्या प्रती संवेदना जाणून घेणे तसेच क्षमाशीलता, सकारात्मकता अशा गुणांचे संवर्धन होत जाते. त्यातून तुम्ही समोरच्या व्यक्तीला अधिक चांगल्या प्रकारे समजावून घेता आणि त्यातून नाती अधिक अर्थपूर्ण आणि दृढ होत जातात.
संतुलित दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होते. ध्यानधारणेमुळे एकंदरीत शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते आणि त्यातून जीवनाकडे पाहण्याचा संतुलित दृष्टिकोन व्यक्तीमध्ये विकसित होतो.
The post ‘शरीरच नाही तर मनही तंदुरुस्त राहते’ रोज ध्यानधारणा केल्याने होतात ‘हे’ फायदे appeared first on Dainik Prabhat.