आज शालेय जीवनापासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत शारीरिक शिक्षण या विषयाचा महत्त्वाचा शैक्षणिक विषय म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यात काही गुण प्रात्यक्षिक व काही गुण लिखित स्वरूपाच्या परीक्षेला असतात. शालेय जीवनात मुले या विषयाचा आनंद घेताना दिसतात, पण जसे कॉलेज सुरू होते, तसे अभ्यासाच्या नावाखाली फक्त गुण मिळविण्यासाठी प्रोजेक्ट लिहून देणे व ज्या दिवशी प्रात्यक्षिक परीक्षा आहे, त्या दिवशी जाऊन शिक्षक सांगतील तेवढे खेळ, व्यायाम जमतील तसे करून येणे, एवढेच या विषयाचे स्वरूप राहिले आहे. यावरून असे लक्षात येते की व्यायाम व खेळ यांना आपण दुय्यम दर्जा देतो व त्यामुळे आमचे खेळाडूसुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेतरी कमी पडतात.
आपल्यापैकी काही जण नियमित व्यायाम करणारे असतात. काही लोक आठवड्यातून तीन वेळा एखादा खेळ खेळायला जातात तर क्वचित प्रसंगी रोजच टेनिस, पोहणे, इत्यादी करणारेसुद्धा आपण पाहतो. व्यायामाबद्दल सल्ला देणारे सांगतात की जेवढा जमेल तेवढा करा पण थोडातरी व्यायाम आवश्यकच आहे. काही जण छंद म्हणून खेळायला जातात तर काहीजण तंदुरुस्तीसाठी खेळतात. एखादा खेळ किंवा व्यायाम का खेळावा किंवा करावा? उत्तर अगदी साधे आहे. एखादे उत्तम मशीन न चालविता बंद ठेवले व ते पडून राहिले, तर ते गंजेल व बंद पडेल. त्याचप्रमाणे शरीराची पुरेशा प्रमाणात हालचाल केली नाही, तर काही अवयव नीट काम करेनासे होतात. उदाहरणार्थ सांधे हे झाले शारीरिक हालचालींचे उदाहरण.
मानसिक तंदुरुस्तीसाठीसुद्धा व्यायाम व खेळांचे खूप महत्त्व आहे. पुढील अनुभव घेऊन बघा, जर आपण कधी दु:खी असाल, तर कुठलातरी खेळ खेळा. थोड्या वेळाने लक्षात येईल की दु:खी असण्याचे कारण विसरून आपण परत आनंदी झाल्याचे तुम्हाला जाणवेल. खेळात जसे जिंकणे-हारणे असते तसेच प्रत्येकाच्या जीवनात असते. काही सुखाचे व दुःखाचे क्षण येतात व जातात. त्यावर कशी मात करायची, हे आपल्याला खेळातून शिकता येते.
अनेक पालकांची अशी इच्छा असते की त्यांच्या मुलांनी खेळांमध्ये करियर करावे. त्यासाठी खूप कष्टसुद्धा घेतले जातात. प्रत्येक जण यशस्वी होईलच असे नसले तरीही एखादा खेळ एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात महत्त्वाचा वाटा उचलतो. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे, नेतृत्व, कौशल्ये, निष्ठा हे गुण ही यामुळे वाढीस लागतात. या गोष्टींचा आयुष्यात खूप फायदा होतो. खेळताना आपल्या शरीराला फील गुडची भावना निर्माण होते. आपला आनंदी व सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. वेगवेगळ्या खेळांचे फायदेही वेगवेगळे असतात.