पुणे – डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग होण्याच्या (डोळे येणे) प्रकारात वाढ झाली असून, काळजी घ्यावी असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे. याशिवाय उपाययोजना करण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना आरोग्य विभागाने आदेशही काढले आहेत.
राज्यातील अनेक भागात उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात डोळे येण्याची विषाणूजन्य साथ सुरू झाली आहे. डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग हा मुख्यत्वे ऍडिनो व्हायरसमुळे होतो. सध्या पुणे जिल्ह्यातील आळंदी, शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप या भागांत तसेच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात डोळे आलेले अनेक रुग्ण आढळत आहेत. हा संसर्ग सौम्य प्रकारचा असला, तरीही नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे पत्रकात म्हटले आहे. आरोग्य सेवा विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी हे आदेश काढले आहेत.
जिल्ह्यात सर्वेक्षण आणि तपासणीच्या सूचना
दरम्यान, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या भागात आरोग्य सेवक, सेविका, आशा वर्करच्या मदतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावेत. शाळा, अंगणवाडी, वसतीगृहांना भेटी देऊन मुलांची तपासणी करावीत आणि आवश्यक त्या उपाययोजना ग्रामपंचायतींनी कराव्यात, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी परिपत्रकाद्वारे सूचित केले आहे.
डोळे येण्याची लक्षणे
डोळे आलेल्या रुग्णांमध्ये डोळे लाल होणे. डोळ्यांतून वारंवार पाणी गळणे. डोळ्यांना सूज येणे अशी लक्षणे आढळतात. डोळ्यांचा हा संसर्ग सौम्य स्वरुपाचा असला, तरी यामध्ये वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी जनजागृती करण्यात यावी.
डोळ्यांचा संसर्ग झाल्यास काय करावे?
बाधित व्यक्तींनी जनसंपर्क कमी करावा. तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.
डोळे स्वच्छ पाण्याने सतत धुवावे, चष्म्याचा वापर करावा, कचऱ्यावर माशा बसतात आणि त्या डोळ्यांची साथ पसरवतात, म्हणून परिसर स्वच्छ ठेवावा.
शाळा, वसतिगृहे, अनाथालय, अशा ठिकाणी जर अशी साथ आली असेल, तर डोळे आलेल्या मुलाला किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे.
The post विषाणूजन्य संसर्गाने डोळे येण्याची साथ; आरोग्य विभागाचा अलर्ट appeared first on Dainik Prabhat.