वटपौर्णिमा
आज वटपौर्णिमा. पावसाळ्यात येणारा पहिला सण म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. या दिवसापासूनच सणांना सुरुवात होते. महाराष्ट्रात हा सण महिला उत्साहात साजरा करतात. यावर्षी दिवसभरात महिला कधीही वडाची पूजा करू शकता.
वटपौर्णिमेचा पूजा विधी
वडाखाली चौरंग मांडून ही पूजा केली जाते अथवा वडाला हळद कुंकू वाहून त्याला धागा बांधून सात फेऱ्या मारून प्रार्थना करण्यात येते. वडाच्या झाडाला फेऱ्या मारणे शक्य नसल्यास, घरच्या घरी तुम्ही चौरंग मांडा. व्रताचा संकल्प सोडा अर्थात प्रार्थना करा. त्यानंतर देवांचे स्मरण करून चौरंगावर मांडलेल्या देवांना हळद कुंकू वाहून फुलं वाहा. त्यानंतर तयार करण्यात आलेले पंचामृत तुम्ही देवांना नेवैद्य म्हणून दाखवा. धूप, दीप आणि अगरबत्ती दाखवून वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक करा. नमस्कार करून तयार केलेला शिऱ्याचा अथवा फुटाण्याचा प्रसाद सर्वांना वाटावा.
वटपौर्णिमेच्या पूजेसाठी साहित्य
वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काही ठराविक साहित्य लागते. ते साहित्य खालीलप्रमाणे-
वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती, धूप, दीप, अगरबत्ती, तूप, हळद-कुंकू, तर केळी, संत्री, सफरचंद, मोसंबी, चिकू अशी पाच प्रकारची फळे, फुले, दिवा ठेवण्यासाठी एक वस्तू, पाणी भरलेला एक कलश, लहान हिरव्या बांगड्या, तसेच तूप, दही, दूध, मध आणि साखर यांचे मिश्रण एका वाटीत घालून पंचामृत तयार करावे.
शास्त्रीय कारण
पूर्वी “चूल आणि मूल’ आणि “रांधा वाढा उष्टी काढा’ असे स्त्रियांच्या कामाचे स्वरूप होते. त्यामुळे या दिवस महिलांना नटण्याची आणि एकत्र राहण्याची संधी मिळायची. यावेळी उखाणेही घेतले जातात. ही एक प्रकराचा आनंद घेण्याचा दिवस आहे. शिवाय वडाच्या झाडाजवळ चांगला ऑक्सिजन मिळतो. महिला बऱ्यापैकी वेळ वडाच्या झाडाखाली घालवतात त्यामुळे त्यांना थोडीफार मोकळीक मिळते.
वटपौर्णिमा कशी साजरी करावी
सकाळीच महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी वडाला सात फेऱ्या मारून सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी गाणी गाऊन प्रार्थना केली जाते. या दिवशी सुवासिनी सौभाग्यलंकार परिधान करून आणि अगदी नव्या कोऱ्या साड्या नेसून खास पूजा करायला एकत्र जमतात. संपूर्ण दिवस पौर्णिमा असल्यामुळे सकाळी आपल्या वेळेप्रमाणे वटसावित्री व्रताचा संकल्प करून तुम्ही वडाची पूजा करून घ्यावी.
वटपौर्णिमेचे व्रत
सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली आणि यमदेवाने तिथेच सत्यवानाला त्याचे प्राण परत दिले असा समज आहे. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. तीन दिवसांचे हे व्रत सध्या केवळ वटपौर्णिमेच्या एका दिवशीच करतात. महिला या दिवशी सजूनधजून वडाच्या झाडाची पूजा करायला जातात.
घरीच साजरी करा वटपौर्णिमा
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घरात राहूनच पूजा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. बाहेर जाऊन पूजा करण्यापेक्षा मनोभावे तुम्ही घरच्या घरी उपवास करून देवाकडे प्रार्थना करावी. वडाची फांदी घरी आणून पूजा करू शकता. आजही आधुनिक महिलाही संपूर्ण रूढी परंपरा जपत ही वडाची पूजा पूर्ण करतात. दिवसभर उपवास करून यादिवशी रात्री हा उपवास सोडावा.