वाराणसीमध्ये गेल्या चार वर्षात पर्यटकांची संख्या दहापटीने वाढलेली आहे. पर्यटकांसाठी सोयी-सुविधा, मंदिराचे पुननिर्माण यामुळे या परिसराचे चित्र बदलत असून आगामी काळात येथील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची चिन्हे आहेत. करोनाची साथ सुरू होण्याच्या आधी वाराणसीतील पर्यटन व्यवसायात फार चमक नव्हती. त्यामुळेच करोनाच्या साथीनंतर येथील पर्यटन व्यवसाय बहरेल अशी फार कुणाला अपेक्षा वाटत नव्हती.
मात्र श्री काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण झाल्यानंतर पर्यटकांच्या संख्येत वेगाने वाढ होत राहिली. गेल्या काही वर्षामध्ये पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने काशीमध्ये विकासाच्या अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. वाराणसीत ( Varanasi ) आसपासच्या मिर्झापूर, प्रयागराज जिल्ह्यातून पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. त्याचबरोबर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. आता रस्ते, रेल्वे, विमानसेवेद्वारा वाराणसीला ( Varanasi ) येणे सोप्पे झाल्यानेदेखील पर्यटकांची संख्या वाढत आहे.
यावर्षी श्रावण महिन्यात येणाऱ्या भाविकांच्या संख्येने तर सगळे विक्रम मोडीत काढले. सोमवार व सुट्ट्याच्या दिवसाखेरीज अन्य दिवशीही भाविकांची गर्दी असते. बाहेरून येणाऱे भाविक प्रामुख्याने विश्वनाथाचे मंदिर, काल भैरव, संकट मोचन मंदिर, निवडक घाट तसेच मिर्झापूरच्या विंध्यवासिनी मंदिरातही जातात. कुठलाही सण, सुट्टी असली की, काशीमध्ये पर्यटकांची गर्दी होत आहे. हॉटेल पूर्ण क्षमतेने भरलेली असतात.
असे असले तरी बहुतेक भारतीय शहरांमध्ये ज्या समस्या आहेत त्याच वाराणसीमध्ये ( Varanasi ) आहे. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पार्किंगसाठी जागा न मिळणे आणि वाहतुकीची कोंडी. त्याचबरोबर आणखी एका मोठ्या हॉटेलचीही याठिकाणी गरज आहे. या तीन पातळ्यांवर काम झाले तर काशीला देशपातळीवरच नव्हे तर पर्यटनाच्या जागतिक नकाशावर स्थान मिळेल.
दुसरीकडे पर्यटन विभागाने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जलपर्यटनाला प्रोत्साहन दिले आहे. त्याअंतर्गत गंगा नदीमध्ये चार क्रूझ सुरू आहेत. त्याखेरीज 50 हून जास्त नौका आहेत. रात्री लोक नौका विहाराचा आनंद घेत असतात. ( Tenfold increase in tourists coming to Varanasi in four years )
देव दिवाळीला सगळे घाट उजळणार
यापूर्वी पंचगंगा घाटावर काही दिवे लावून सुरू झालेला देवदिवाळीचा दीपोत्सव आता मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाऊ लागला आहे. यावर्षी देवदिवाळीला दहा लाख दिवे लावण्यात येणार आहेत. विश्वनाथ मंदिराचा नवा भव्य परिसर असल्याने यंदा त्याठिकाणी देखील दिव्यांचा झगमगाट असणार आहे. या सगळ्यांमुळे देवदिवाळीच्या सुमारास वाराणसीत दहा लाख पर्यटक येतील असा अंदाज आहे.
सध्याच गंगेच्या किनाऱ्यावरील सगळ्या हॉटेल्सचे बुकींग फुल्ल झाले आहे. कार्तिक पोर्णिमेला देवदिवाळी साजरी केली जाते. यादिवशी स्वर्गातून देवता पृथ्वीवर येतात आणि गंगा नदीत स्नान करतात अशी श्रद्धा आहे. त्यामुळे यादिवशी गंगेत स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.