पावसाळा म्हटलं की आपल्या सर्वांना आठवते ती नुकतीच सुरू झालेली शाळा, उन्हाळी सुट्टीतली धमाल संपवून सगळे जण पुन्हा नवीन उत्साहाने शाळेत जायला सज्ज होतात. त्यातच चाहूल लागते ते येणाऱ्या पावसाची, त्याची जय्यत तयारी पण सुरू होते, नवीन दप्तर, पुस्तके, डब्बा याच बरोबर नवीन रेनकोटसुद्धा घेतला जातो. ही सर्व तयारी करत असताना आपण आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला मात्र विसरतो, त्यासाठीच आज थोडे जाणून घेऊया की, पावसाळ्यात नेमके काय करायला हवे आणि नाही.
पावसाळा म्हणजे मराठी ऋतू पैकी वर्षा ऋतू आणि मराठी महिन्यानुसार श्रावण आणि भाद्रपद महिना या महिन्यात आपल्या मराठी सणांची नुसती रेलचेल असते. त्यामुळे आपण सर्वच जण गोड आणि चमचमीत खाद्य पदार्थांवर हात मारल्याशिवाय राहत नाही पण हे करत असताना पावसाळ्यात होणारे सर्दी, खोकला, ताप, पोट बिघडणे, पचनक्रिया मंदावणे, वेगवेगळे साथीचे रोग या सर्वांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठीच आपल्या आयुर्वेदात सगळ्या ऋतूंमध्ये ऋतूचर्या कशी असावी याचे शास्त्रोक्त वर्णन केलेले आढळते.
आयुर्वेदानुसार मराठी 6 ऋतूंचे 2 प्रकारात विभाजन केलेले आढळते- आदान काल व विसर्ग काल.
आदान काळात 3 ऋतू (शिशिर, वसंत, ग्रीष्म) व विसर्ग काळात 3 ऋतू (वर्षा, शरद, हेमंत) यांचा समावेश होतो. यातील आदान काळात सूर्याचे उत्तरायण चालू असते. त्याचे बल पूर्ण असते म्हणून तो वातावरणातील स्नेह भागाचे शोषण करतो व पर्यायाने आपल्या शरीरात देखील रुक्षता उत्पन्न करतो. तेच विसर्ग काल सुरू झाल्यावर सूर्याचे दक्षिणायन सुरू होते. पर्यायाने त्याचे बल कमी होत जाते व हळूहळू आपल्या शरीरातील रुक्षता देखील कमी होते.
नुकताच ग्रीष्म ऋतू ओसरल्याने शरीरात वात दोषाचा संचय झालेला असतो. त्याच वात दोषाचा वर्षा ऋतूत प्रकोप होतो. हा वाढलेला वात दोष पित्त व कफ या दोन्ही दोषांना दूषित करतो व आजाराची उत्पत्ती होते, म्हणून सर्वात जास्त आजारी पडण्याचे प्रमाण देखील या ऋतूत जास्त असते. त्यासाठीच जाणून घेऊया की, पावसाळ्यात आपण आहार आणि विहारात कोणते बदल करणे आवश्यक आहे.
पावसाळ्यातील आहार
साधारण: सर्वो विधिर्वर्षासू शस्यते, असे आचार्य चरकांनी सांगून ठेवले आहे. म्हणजेच तिन्ही दोषांचे शमन करणाऱ्या व जठराग्नी प्रदीप्त करणाऱ्या क्रिया वर्षा ऋतूत कराव्या. ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजेच उन्हाळ्यामध्ये आपली भूक कमी झालेली असते, जठराग्नी मंद झालेला असतो. म्हणूनच पावसाळ्यात आपले बल वाढेल, जठराग्नी वाढेल व झालेला वातप्रकोप कमी होईल, असे अन्न आपण खावे. पचायला जड असा आहार या दिवसांत शक्यतो करू नये, आधीच मंद झालेला अग्नी त्यात जड खाल्ल्याने अजून त्रासदायक होऊ शकतो. म्हणून आधी पचण्यास हलके असे अन्न खावे. अन्न हे शक्यतो गरम, ताजे व पूर्ण शिजवलेले असावे. चव आणि अग्नी प्रदीप्त करण्यासाठी आंबट, तिखट आणि थोडेसे क्षारीय पदार्थ जसे की लोणचे, पापड इत्यादीचा समावेश असावा.
ज्वारीच्या लाह्या, साळीच्या लाह्या, भाकरी, मुगाचे वरण अथवा विविध भाज्यांचे सूप यांचा समावेश असावा. आहारात जुनी धान्ये (गहू, हातसडीचा तांदूळ) वापरावी व नवीन धान्ये वापरायची असल्यास ती भाजून वापरावी. श्रुतशीत जल म्हणजेच उकळून गार केलेले पाणी प्यावे, याने रोग पसरण्याची शक्यता कमी होते. भेंडी, फ्लॉवर, कोबी, पडवळ, दोडका, कारले अशा सर्व प्रकारच्या फळभाज्या खाव्यात, पालेभाज्या खाऊ नयेत. गाजर, मुळा, कांदा, टोमॅटो प्रमाणात खावे, काकडी खाऊ नये.
आलं, तुळस, पुदिना, गवती चहाने युक्त आणि भरपूर उकळलेला चहा घ्यावा. स्निग्ध पदार्थांचा जेवणात समावेश करावा जसे की तूप, लोणी, दूध, दही हे कफ वाढवणारे असल्याने खाऊ नये, ताक हे मंद झालेल्या जठराग्नीला दीपन करण्याचे कार्य करते. त्यामुळे गोड, ताजे ताक काळे मीठ टाकून प्यावे. लसूण हा स्निग्ध, उष्ण आणि उत्तम वातनाशक आहे. त्यामुळे त्याचे सेवन करावे. हिंग, सुंठ, मिरे, जिरे, आले, लिंबू, पुदिना यांचा समावेश अवश्य असावा. स्निग्ध पदार्थ जरी खायचे असले तरी तेलकट भजी, वडे असे बाहेरील पदार्थ मात्र खाऊ नयेत. त्याने साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते.
पावसाळ्यातील विहार
या ऋतूत वातावरण पावसामुळे कोंदट झालेले असते. त्यामुळे कोणतेही काम करण्यास उत्साह वाटत नाही, म्हणून या दिवसात शक्यतो दिवसा झोपणे व रात्रीचे जागरण टाळावे. बाहेर जाऊन व्यायाम करणे अथवा चालायला जाणे या दिवसांत शक्य होत नाही. त्यामुळे घरातच सूर्यनमस्कार घालणे, योगासने करणे, प्राणायाम करणे इत्यादींचा समावेश करावा.
या सर्वांचा अतिरेक टाळावा, प्रमाणातच या गोष्टी कराव्यात. थोड्या प्रमाणात सर्दी, खोकला असल्यास घरी वाफ घेणे, हळद, मीठ व कोमट पाण्याच्या गुळण्या करणे तसेच गूळ-हळद, दूध-हळद यांचे सेवन करावे. उघड्यावरील अन्नपदार्थ सेवन करणे शक्यतो टाळावे, जेणेकरून साथीचे आजार पसरण्याचे प्रमाण कमी होईल.
जर जास्त प्रमाणात सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी, घसा दुखणे अशी लक्षणे जाणवल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. निर्जंतुकीकरण करण्याच्या उद्देशाने घरात गुग्गुळ, चंदन, ओवा या सर्वांचा धूप करावा. तळपाय शक्यतो कोरडे ठेवावे जेणेकरून पायांच्या बोटांमध्ये इन्फेक्शन होणार नाही. बाहेर पडताना शक्यतो पाय घसरणार नाही आणि कोरडे राहतील अशा पद्धतीचे चप्पल अथवा शूज वापरावे. अशी सर्व काळजी घ्या व आपला पावसाळा आनंददायी आणि निरोगी बनवा.