[[{“value”:”
मथुराबाई आमच्या गावाकडच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या ६७ वर्षांच्या आजी. चेहऱ्यावरचे हसू, नऊवारी साडी, गोंदलेले कपाळ आणि सडपातळ बांध्याच्या मथुराबाई अजूनही घरातले आणि अंगणातली सगळी कामे करत. त्यांच्या डाव्या गुडघ्याने मात्र त्या काही दिवसापासून त्रस्त होत्या. त्यांनी आपल्या गुडघ्या बद्दल सुनेला सांगितले. “अगं माझा डावा गुडघा थोडा दुखायला लागलाय”. सून म्हणाली. “आई, आता वय झालय, थोडा अराम करा, कमी होईल”. १-२ दिवस गेले तरी गुडघ्याचा त्रास कमी नाही झाला. कुरकुर नको म्हणून त्यांनी ते शेजारच्या शेळके काकूंना सांगितलं. काकू म्हणाल्या, “आजी आता अजून काय अपेक्षा आहे, थोडा तर दुखणारच, वयानुसार होत असं, थोडा मलम लावून शेका त्याला”.
५-७ दिवस झाले, गुडघा थोडा अधिकच त्रास द्यायला लागला. न राहवून त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं. “बंडू, माझा डावा गुडघा थोडा दुखतोय”. बंडू म्हणाला, “आई, उगाच घरातली कामं कशाला करत बसतेस या वयात, आराम कर”. तरी आई च्या विनंती नंतर तो तिला दवाखान्यात घेऊन गेला. मथुराबाई डॉक्टर ला म्हणाल्या, “माझा डावा गुडघा खूपच त्रास देतोय”. डॉक्टर ने तपासले, आणि म्हणाले, “आजी आता वय झालय, थोडा दमाने घ्या, वयानुसार असं होणारच”. त्यावर मथुराबाई म्हणाल्या, ” आहो डॉक्टर साहेब, माझा उजवा गुडघा सुद्धा ६७ वर्षांचाच आहे, तो नाही दुखत मग डावाच का दुखतोय?
देशमुख काका आमच्या पुण्याच्या फ्लॅट च्या जवळ राहायचे. माझ्या मित्राचे ते वडील. खाली बाकड्यावर लोकांच्या घोळक्यात बसायचे, परंतु अलीकडे खूप शांत-शांत बसायचे, मोजकेच शब्द बोलायचे. अधून मधून माझी त्यांची भेट व्हायची. काकांना काही विचारले कि त्यांचे ठरलेले उत्तर असायचे “छान चालू आहे”. परंतू स्पेसिफिक उत्तर देताना ते कचरायचे. काल माझ्या मित्राचा वाढदिवस झाला, मला जाणे झाले नाही. मी काकांना विचारलं, ” काय काका, काल काय काय केलं?”. काकांचा चेहरा गोंधळ्यासारखा झाला, कसेबसे सावरून ते म्हणले, “ छान होता कालचा दिवस”. खोदून विचारलं तरी सविस्तर असं काही बोलले नाहीत. मी मित्राला रात्री फोन केला आणि म्हणालो, “मला काकांची काळजी वाटती आहे, त्यांची डिप्रेशन किंवा डिमेन्शिया ची तपासणी करून घेणे गरजेचे आहे”. तो म्हणाला, “बाबा तर नेहमी हसत असतात, थोडीशी झोप कमी झाली आहे, आणि थोडं विसरतात, पण आता वयामुळे ते तर साहजिक आहे”.
हि आणि अशी कितीतरी उदाहरणे आपल्या आजूबाजूला आपण नेहमी पाहतो. हि वायोवादाची उदाहरणे आहेत.
वयोवादाचे तीन भाग आहेत –
१. वृधांबद्दल आणि वृध्दावस्थेबद्दल असलेले पूर्वग्रह
२. वृधांबद्दल होणारा गैरसमज आणि वृद्धांवर होणारा अन्याय
३. वृधांबद्दल साचेबंद दृष्टिकोनाला बळकटी देणाऱ्या चालीरीती/विचार
मथुराबाई असो किंवा देशमुख काका, यांच्या केसमध्ये असेच दिसते कि वयोवाद केवळ अशिक्षितांमध्येच नाही तर शिक्षित समजल्या जाणाऱ्या समाज घटकातही तेवढाच बळावला आहे.
मथुराबाई किंवा देशमुख काका, यांच्या मुलांना त्यांच्याबद्दल प्रेम आहेच, पण आईच्या किंवा बाबांच्या आजाराला न ओळखता, केवळ हे वयामुळे असे होत असेल, असे ते मानत होते.
वयोवाद म्हणजे समाजाचा वृधांबद्दलचा एक साचेबंद पुर्वाग्रह आणि त्यामुळे अनुभवला जाणारा भेदभाव (Discrimination) आणि निष्काळजीपणा (Negligence). “साठी बुद्धी नाठी” या म्हणीतून हा दृष्टिकोन दिसून येतो. हि अत्यंत चुकीची म्हण आहे.
वयोवादाची रोज दिसणारी काही परिचित उदाहरणे – या वयात स्मृती कमी होणारच, वाढत्या वयात बुद्धी क्षीण होणे हे स्वाभाविक आहे, , या वयात त्यांना त्यांच्या आजाराबद्दल काही सांगू नका, त्यांना सहन होणार नाही, या वयात लघवी वरील नियंत्रण जाणारच, पाय/गुडघे दुखणाराच. घरातलं काम करू नये, अराम करावा/बसून राहावं इत्यादी.
कित्येक वेळेला तर वृद्धांच्या शारीरिक व्याधींना ,‘लक्ष वेधण्यासाठी केलेली खटाटोप’ (Attention Seeking Behaviour), किंवा मानसिक व्याधींना, ‘वयामुळे होणारे बदल’; म्हणून दुर्लक्षित केल्याचे आढळते.
या प्रकारच्या पूर्वग्रही दृष्टिकोनाचा अथवा गृहीत धरलेल्या संकल्पनेचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. कित्येक अहवाल आणि संशोधनामध्ये याचा अकाली मृत्यूशी संबंध असल्याचे सिद्ध केले आहे,
वयोवादामुळे वृद्धांसोबत गैरवर्तन किंवा त्यांचे शोषण (Abuse) होण्याचे प्रमाण वाढते. (WHO) डब्ल्यू एच ओ च्या २०१७ च्या अहवाला नुसार असे आढळले आहे की 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील प्रत्येक 6 पैकी 1 व्यक्तीला कोणत्या-ना-कोणत्या प्रकारच्या शोषणाला सामोरे जावे लागते, ज्यामध्ये भावनिक, शारीरिक, लैंगिक किंवा आर्थिक शोषणाचा समावेश असू शकतो.
खूपदा आपण असे पाहतो कि डॉक्टर कडे आल्यानंतर मुले/मुली हि आई-वडिलांची आजाराची लक्षणे स्वतःच सांगत बसतात (रुग्ण स्वतःला काय होते हे जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतात कारण ते स्वतः ते अनुभवत असतात). त्याच बरोबर आई-वडिलांना/आजी/आजोबाला काही कळत नाही/समजणार नाही, अशा प्रकारे (चुकीचे) ग्रहीत धरून, मला आजाराबद्दल आणि औषधांबद्दल सांगा असा अट्टहास किंबहुना दबाव टाकतात.
दि जेरोन्टोलॉजिस्ट या जर्नल मध्ये एप्रिल २०१९ मध्ये एक संशोधन लेख प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये वृद्धवाद/ वयोवाद हा आरोग्यसेवेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून येतो हे दाखवण्यात आले. आरोग्यसेवेच्या प्रत्येक पैलूवर याचा परिणाम होतो. आजाराच्या निदानापासून (Diagnosis) ते वैद्यकीय स्थितीचा संभाव्य कोर्स ठरू (Prognosis) पर्यंत याचा परिणाम ((दुष्परिणाम) दिसतो.
याव्यतिरिक्त, एखाद्या व्यक्तीचे वयाबद्दलचे स्वतःचे विचार, कल्पना, आणि दृष्टीकोन हे सुद्धा त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम करू शकतात.
वायोवाद हा केवळ इतरांबद्दल असतो असे नाही, तर वरिष्ठ नागरिकहि या अपसमजाला बळी पडतात. अनेक वरिष्ठ त्यांच्या आजारपणांना वार्धक्य जीवनाचा नैसर्गिक परिणाम मानतात. यामुळे अनेकदा बरा होऊ शकणाऱ्या आजारांवर सुद्धा उपचार घेतला जात नाही. “या वयात किती स्वतःची काळजी घेणार, आपली तब्येत महत्वाची कि मुलांची, नातवांची? ते बरे राहिले म्हणजे झाले”, यासारखे स्वतःला महत्व न देता कुटुंबासाठी म्हणून वैयक्तिक गरजांकडे, परिणामांकडे दुर्लक्ष करणारे सुद्धा खूप आढळतात. विशेष म्हणजे, यात मोठेपणा सांगणे हा पण एक (चुकीचा) दृष्टिकोन आढळून येतो.
ज्या लोकांमध्ये वायोवादी दृष्टिकोन आहे अशा लोकांमध्ये एक बाब आढळून येते, ती म्हणजे, ते स्वतःच्या आरोग्याची काळजी कमी प्रमाणात घेतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. त्याचबरोबर, नंतरच्या आयुष्यात आजारपणाचा धोका कमी करणाऱ्यासाठी ज्या उपयुक्त सवयी असतात त्या राखण्यात ते कमी पडतात.
WHO – डब्ल्यू एच ओ (जी जागतिक स्तरावरील आरोग्य क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था आहे) असे म्हणते की, वयोवादाचा (Ageism) सामना करण्याचे तीन मार्ग आहेत: –
१. मिथक आणि रूढी दूर करण्यासाठी आणि वयोवादा संदर्भातील चुकीच्या दृष्टिकोनाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी योग्य प्रशिक्षण देणे.
२. Intergenerational – दोन वयोगटामध्ये सुसंवाद, सहकार्य आणि सहानुभूती निर्माण करणे.
३. कायदा आणि धोरणात्मक बदल, जे विषमता आणि भेदभाव कमी करू शकतात यावर व्यापक विचार आणि योजनाबद्ध कार्य करणे.
व्यक्ती, कुटुंब आणि समाज या तीनही पातळ्यांवर वृद्धाप काळामुळे होणाऱ्या आजरांचा प्रभाव फार मोठा आहे, मग ते काळजी घेण्यातील आव्हाने असोत, वा शारीरिक अक्षमता असो किंवा त्याकरिता लागणारा पैसा (चा अभाव) असो.
सहानुभूती (Empathy) वाढवणारे, पूर्वाग्रह कमी करणारे, आंतरपिढीतील संबंध दृढ करणारे विशिष्ट कार्यक्रम/कार्यशाळा याद्वारे , वयोवाद (Ageism) कमी करण्यास मदत होऊ शकते.
डॉ. अभिजीत पाटील,
MBBS (Mumbai), MD (USA) जेरियाट्रिक मेडिसिन स्पेशालिस्ट
The post वयोवाद । वृद्धांच्या कार्यक्षम व गुणात्मक आयुष्याचा आणि आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू appeared first on Dainik Prabhat.
“}]]