आजकाल सगळेजण आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. कुणाला वजन वाढवण्याची चिंता असते, तर कुणी वजन कमी करण्यासाठी कडक डायटिंग करतात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रात्रीच्या जेवणातून एक पदार्थ कमी करावा लागेल. तो पदार्थ कोणता, हे जाणून घेण्यासाठी ही बातमी तुम्हाला नक्कीच सहाय्यक ठरेल.
आहारतज्ज्ञ सांगतात, की ज्या जेवणामुळे तुम्हाला मनापासून आनंद मिळेल, तेच जेवण घ्या. मन मारून उगाच डायटिंग केल्याने शरीराला नुकसानच होऊ शकते. त्यामुळे डाएट न करताही योग्य प्रमाणात योग्य आहार घेऊन वजन नियंत्रणात ठेवता येते. अनेकजण वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण घेतच नाहीत, किंवा फक्त चपाती अथवा भात खातात. खरे तर रात्र ते सकाळ या कालावधीत वेळेचं खूप मोठं अंतर असल्यामुळे रात्रीचं जेवण खूप महत्त्वाचं ठरते. त्यामुळे रात्री नेमकं काय खाल्लं पाहिजे, हे जाणून घेणं गरजेचं आहे.
रात्री चपाती आणि भात खाणं पूर्णपणे सोडून दिल्याने आपलं नुकसानच होतं. कारण चपाती आणि भातात कर्बोदके असतात, जे आपल्या शरीराला आवश्यक असतात. या दोन्ही पदार्थांचे आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, रात्रीच्या जेवणात या दोन्ही पदार्थांपैकी कुठला पदार्थ आपल्याला वजन कमी करण्यास उपयुक्त ठरेल, हे पाहू.
रात्रीच्या जेवणात साधारणपणे सर्वचजण चपाती आणि भाताचा समावेश करतात. चपाती आणि भाताचे स्वतःचे काही गुणधर्म आहेत. चपाती खाल्ल्याने पोट पूर्ण भरते तर भातात असणाऱ्या स्टार्चमुळे आहाराचे चटकन पचन होते. चपाती आणि भातातील पोषक तत्वे पाहता या दोन्हींमध्ये फक्त सोडियमचा फरक आहे. भातात सोडियमचे प्रमाण कमी असते तर चपातीत (120 ग्रॅम पिठात) 190 मिलिग्राम सोडियम असते. भातात चपातीच्या तुलनेत फायबर, प्रोटीन आणि फॅटचे प्रमाण कमी असते. मात्र भातात चपातीपेक्षा जास्त कॅलरीज असतात. त्यासोबतच भातात पाण्यात चटकन मिसळणारे व्हिटॅमिन असते, जे आरोग्यासाठी खूप चांगले असते.
भात लवकर पचतोही. दुसरीकडे चपातीतून आपल्याला कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, फॉस्फोरस मिळतं. भातात कॅल्शियम नसतं. यात पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाणही कमी असते. रात्र आणि सकाळ या कालावधीत वेळेचं जास्त अंतर असल्यामुळे रात्रीच्या आहारात चपाती खाणं उत्तम असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. तसं पाहता आरोग्यपूर्ण आहारासाठी चपाती आणि भात दोन्हीही चांगलेच आहेत. मात्र, जर तुम्हाला वजन घटवायचंय असेल, तर भाताच्याऐवजी चपाती खाणंच योग्य ठरेल.
The post वजन घटवायचंय? मग रात्रीच्या जेवणात ‘हे’ अजिबात खाऊ नका! appeared first on Dainik Prabhat.