जानेवारी महिन्याचे काही दिवस सरले की नव्या वर्षात केलेले व्यायामाचे संकल्प हळूहळू धूसर व्हायला लागतात. गुसाबी थंडीत सकाळची झोप हवीहवीशी वाटते आणि व्यायामाचा पुन्हा एकदा कंटाळा केला जातो. नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहाने सुरु केलेला व्यायम हळूहळू बंद होत जातो आणि वाढलेले वजन पुन्हा एकदा सतावायला सुरुवात करते.
पण असे होऊ द्यायचे नसेल तर व्यायम सुरु करतानाच काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. चालू केलेल्या व्यायामात सातत्य आणि प्रेरणा असेल तर वजन कमी करणे किंवा तब्येत चांगली ठेवणे हे फार मोठे आव्हान निश्चितच नाही.
मात्र यासाठी खालील टिप्सचा निश्चितच विचार करायला हवा. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना किंवा त्यातील सातत्य टिकवून ठेवताना योग्य ते नियोजन करणे गरजेचे असते. यामध्ये अगदी एका दिवसापासून ते एका आठवड्यापर्यंतच्या नियोजनाचा समावेश होतो.
व्यायामाची सुरुवात करताना सुरुवातीला फिटनेस तज्ज्ञांचा सल्ला घ्या. यामुळे आपल्याला नेमका कोणत्या प्रकारचा आणि किती प्रमाणात व्यायाम करणे आवश्यक आहे याचा अंदाज येण्यास मदत होईल.
एखाद्या वहीत आपल्या फिटनेसच्या गोष्टींबाबत योग्य ती नोंद ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्यात व्यायामामुळे होणाऱ्या बदलांची नोंद राहू शकेल.
वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच आहाराचे योग्य ते नियोजन करणेही आवश्यक असते. आहार हा व्यायामासाठी पूरक असणे गरजेचे असल्याने यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते.
व्यायामाच्या बाबतीत आपल्याला आवडेल, झेपेल असाच व्यायामप्रकार करावा जेणेकरुन त्यामध्ये सातत्य राहण्याचे प्रमाण जास्त असेल. आपण करत असलेले व्यायामप्रकार आपल्याला आवडत नसतील तर व्यायाम टाळण्याकडे कल वाढतो आणि सातत्य राहत नाही.