करोनाची तिसरी लाट
करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त संसर्ग होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. लहान बालकांना जन्मजात रोग प्रतिकारशक्ती जास्त असल्याने सौम्य प्रकाराचे संक्रमण होते त्यामुळे गंभीर लक्षणे दिसत नाहीत.
लहान मुलांमध्ये एसीई 2 रिसेप्टर्स श्वसन संस्थेत कमी संख्येने असल्याने करोना विषाणूंचा पेशीमध्ये शिरकाव कमी प्रमाणात होतो. तसेच लहान मुलांमध्ये कोविड आजारांवेळी “सायटोकाइन स्ट्रोम’ होत नसल्याने बालकांमध्ये मृत्यू प्रमाण कमी व संसर्ग सौम्य स्वरूपाचा होतो.
सध्या तिसऱ्या लाटेची उपाय योजना म्हणून बालरोगतज्ज्ञ टास्कफोर्स व सरकार लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालये व उपचार केंद्रे सुरू करीत आहेत. केंद्र सरकारने मात्र तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता फेटाळली आहे. पुढे जर करोना विषाणूमध्ये अधिक बदल झाला तरच मुलांना अधिक संसर्ग होऊ शकतो, असे सांगितले जाते.
यासोबत चिंतेचा विषय म्हणजे 18 वर्षांखालील मुलांचे करोना लसीकरण अजूनही उपलब्ध झाले नाही, मात्र केंद्र सरकारने 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरणास लस कंपन्यांना चाचणी घेण्याची परवानगी दिली असल्याने या वयोगटातील लसीकरणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे पण अजूनही 12 वर्षांखालील वयोगटातील मुलांबाबतचे लसीकरणाचे प्रश्न अधांतरीच आहेत.
अशावेळी मुलांना पालकांनी करोना नियमावलीचे मार्गदर्शन केले पाहिजे. फायझर, मॉडर्ना, कोव्हॅक्सिन सारख्या कंपन्या लहान मुलांसाठी लसी उपलब्ध करीत आहेत, त्यांच्या चाचण्या अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच बाजारात उपलब्ध होतील.
इन्फ्लुएन्झा लस
तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याची तयारी म्हणून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लहान मुलांना इन्फ्लुएन्झा लस द्यावी, असे राज्य सरकारच्या कोविड व बाल रोगतज्ज्ञ टास्क फोर्सने सरकारला शिफारस केली होती. या लसीमुळे इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे होणारे गंभीर आजार रोखता येऊ शकतात आणि जीवही वाचवता येऊ शकतो.
अशी आहेत लक्षणे
इन्फ्लुएन्झा हा करोना आजारासारखाच श्वसनाची लक्षणे असणारा फ्लूचा प्रकार आहे. सर्दी, ताप, खोकला, न्यूमोनिया, जुलाब अशी सर्वसामान्य लक्षणे असतात. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यापूर्वी अशा प्रकारच्या साथीचे आजार डोके वर काढतात. असे फ्लू सारखे आजार रोखण्यासाठी इन्फ्लुएन्झा लस बालकांना देणे गरजेचे आहे.
इन्फ्लुएन्झा लस आणि करोना संबंध?
या लसीचा व करोना आजाराचा काहीही संबंध नाही. या लसीमुळे करोना संक्रमण थोपवता येत नाही. सध्याच्या परिस्थितीतील साधा सर्दी ताप सुद्धा डॉक्टर व पालकांना करोना संक्रमण झाले, असे वाटते. इन्फ्लुएन्झा हा संसर्गजन्य आजार असल्याने करोना काळात याची लक्षणे आली तर द्विधा मनस्थिती होईल व कारण नसताना कोविडसाठी तपासण्या केल्या जातील आणि आरोग्य यंत्रणेवर ताण पडेल.
इन्फ्लुएन्झा लस ही राष्ट्रीय लसीकरणात समाविष्ट नाही. या लसीमध्ये इन्फ्लुएन्झा ए व बी, अशी दोन स्ट्रेन असतात. सध्याच्या नवीन स्ट्रेन प्रमाणे ही लस उपलब्ध असते. ट्रायव्हॅलेंट ऐवजी ऍडव्हान्स टेट्राव्हॅलेंट प्रकारची लस बनवून किंमत वाढवली आहे.
ही एक सुरक्षित व प्रभावी लस आहे. बारा महिन्यापर्यंत यामुळे संरक्षण मिळते. ही लस पंधराशे ते दोन हजार रुपये इतकी असल्याने गोरगरिबाला परवडणारी नाही. त्यामुळे सरकारने ही लस स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी, असेही तज्ज्ञांनी सुचवले आहे.
या बालकांसाठी इन्फ्लुएन्झा लस अधिक उपयोगी
ज्या बालकांना जन्मजात आजार आहे अथवा त्यावरील औषधे सुरू आहेत, हृदयविकार, किडनी विकार, मधुमेह, ऑर्गन ट्रान्सप्लांट, रक्ताचे विकार, कॅन्सर, टीबी, एड्स, प्रतिकारशक्ती कमी अशा बालकांना कोणतेही संक्रमण होण्याचा व आजार तीव्र होण्याचा धोका जास्त असल्याने इन्फ्लुएन्झासारखी लस फ्लू सारखी लक्षणे व त्याची तीव्रता रोखण्याकरिता उपयोगाची ठरते.
स्वच्छतेकडेही द्या लक्ष
या लसी सोबतच पालकांनी लहान मुलांच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्यायला हवे. मुलांनी वारंवार हात धुणे, हात निर्जंतुक करणे, मास्क वापरणे, गर्दीत जाणे टाळणे, डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे शक्यतो टाळावे आणि स्वच्छ राहणे अत्यंत गरजेचे आहे.