मुंबई – आजच्या नव्या पिढीला मैदानावर खेळण्यापेक्षा मोबाईलमधील गेम्सची जास्त आवड असल्याचे दिसून येते. अशा स्थितीत मुलांच्या डोळ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होणे स्वाभाविक आहे. डोळे दुखणे, लाल होणे, अंधुक दिसणे आणि डोकेदुखी डोळ्यांची कमजोरी दर्शवते. कमकुवत डोळ्यांमुळे मुलांना लहान वयातच चष्मा लागतो. डोळे निरोगी ठेवण्यासाठी मुलांच्या जीवनशैलीत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांचे डोळे निरोगी बनवण्यासाठी पुढील काही टिप्स फायदेशीर ठरू शकतात.
टीव्ही मोबाईलचे शेड्युल ठरवा
गॅजेट्सच्या अतिवापरामुळे मुलांची दृष्टी कमकुवत होऊ शकते. मुलांच्या स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मोबाइल आणि टीव्हीसाठी एक टायमिंग सेट करा यामुळे डोळ्यांचे रक्षणही होऊ शकते आणि मुलंही आनंदी राहतील.
जीवनसत्त्वे आणि खनिजे सेवन करा
मुलांचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे आणि खनिजांचे सेवन करणे आवश्यक आहे. हेडोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी ओमेगा-३ फॅटी ऍसिडचे सेवन करणे देखील फायदेशीर ठरू शकते. गाजर, ब्रोकोली, पालक, स्ट्रॉबेरी आणि रताळे यांचा मुलांच्या आहारात समावेश करायला हवा. त्यासोबतच मुलांच्या आहारात पाजेभाज्यांसह फळांचा समावेश देखील महत्वाचा आहे.
डोळ्यांची नियमित तपासणी घ्या
डोळे खूप नाजूक आहेत, त्यामुळे त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुलांनी आणि वडिलधाऱ्यांनी डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्यावी. त्यामुळे वेळेत उपचार करता येतात. दर सहा महिन्यांनी डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे.