नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन प्रकाराची भारतातही अनेक प्रकरणे समोर आली आहेत. दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात ओमायक्रॉनचे 138 रुग्ण दाखल होते, त्यापैकी 95 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एलएनजेपी रुग्णालयात दाखल 138 रुग्णांपैकी केवळ 5 रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे दिसून आली. इतर सर्व रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे नव्हती. 138 मध्ये, 136 रुग्णांनी दोन्ही लसींचे डोस घेतले होते.
एलएनजीपी रुग्णालयाचे संचालक सुरेश कुमार म्हणाले की, आता दररोज रुग्णांची संख्या वाढणार आहे. दोन्ही डोस घेतल्यानंतरही ओमायक्रॉन होऊ शकतो याची पुष्टी झाली आहे, परंतु ज्यांनी लस घेतली आहे ते लवकरच बरे होत आहेत. तसेच नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे त्यांनी सांगितले. डॉ. सुरेश कुमार हे दिल्ली सरकारच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य आहेत. दिल्लीत करोना संसर्गाचा पॉझिटिव्ह दर 3 टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.
आत्तापर्यंत संपूर्ण देशात ओमायक्राॅनचे 1431 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 488 रुग्ण बरेही झाले आहेत. देशातील 23 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 454 प्रकरणे आहेत आणि दिल्ली 351 प्रकरणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी, ओमायक्रॉनचा धोका पाहता अनेक राज्यांनी निर्बंध वाढवण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत करोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने चिंता वाढली आहे.