अक्रोड हा सुकामेव्यामधील एक लोकप्रिय पदार्थ आहे. अक्रोड हे नाव लॅटिन शब्द “गॅलिक नट’ यावरून पडले आहे. त्याचे उगमस्थान इटली आहे. अक्रोडची लागवड प्रतिकूल परिस्थितीत अजिबात होऊ शकत नाही. यास्तव भारतात त्याची लागवड फक्त काश्मीरमध्येच होते. जगभरात अक्रोडची लागवड युरोप, जपान, कॅनडा, अर्जेंटिना, इटली येथे होते. कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणावर होते. अक्रोडला योग्य प्रमाणात पाणी, सूर्यप्रकाश, पौष्टिक-सुपीक जमीन व वाऱ्यापासून संरक्षण लागते. अक्रोडचे झाड आकर्षक असते.
झाडाची उंची साधारणत: 30 ते 130 फूट वाढते. लाकडासारखे कोरीव काम केल्याप्रमाणे कवच, चमकदार रंग व अक्रोडची चव यामुळे सुकामेव्यातील तो एक महत्त्वाचा व सर्वांचा आवडता प्रकार ठरला आहे. अक्रोडचे निरनिराळे प्रकार आढळतात. जसे काळे अक्रोड, बटर नट, रॉयल अक्रोड, अर्जेंटाइन वॉलनट, काश्मीरमध्ये पिकणारे व भारतात सर्वत्र वापरले जाणारे अक्रोड म्हणजे रॉयल अक्रोड. जम्मू-काश्मीरमध्ये दोन प्रकारच्या अक्रोडच्या झाडांची लागवड केली जाते. पहिल्या प्रकारात झाडाला फळे येतात व त्याचे लाकूड चांगल्या प्रतीचे असते.
दुसऱ्या प्रकारात झाडाला फळे येत नाहीत व लाकूड तुलनेने कमी मजबूत असते. झाडाचे काळे लाकूड मजबूत असते. ते फर्निचर व कोरीव कामाच्या वस्तूंसाठी वापरले जाते. फिकट रंगाचे लाकूड कमी मजबूत असते. कवचाचा वापर प्लॅस्टिक, लाकडी व दगडी वस्तूंच्या स्वच्छतेसाठी व पॉलिशिंगसाठी होतो. तसेच साबण, स्क्रब, क्रीम अशा सौंदर्यप्रसाधनांमध्येही त्याचा वापर केला जातो.
The post रोज अक्रोड खाण्याचे आहेत अनेक फायदे; बिनधास्त करा आहारात समावेश appeared first on Dainik Prabhat.