स्त्री- पुरूषांच्या मैत्रीची कन्सेप्ट कोणती योग्य? याबद्दल नुकतेच नव्याने काही मुद्दे चर्चेत आले. निमित्त होते ते मैत्रिणींच्या एका व्हॉट्स ऍप ग्रूपवर ती सध्या काय करते? या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर आलेली स्त्री- पुरूष मैत्रीची पोस्ट. आजही, इतक्या मोठ्या प्रमाणावर सामाजिक, कौटुंबिक व वैचारिक बदल घडत असलेल्या काळातही आपल्या मनात नैतिक अनैतिकतेच्या कल्पना किती भाबड्या आहेत याचे आश्चर्य वाटले.
यात एक बाब समोर आली ती म्हणजे, लग्नानंतर स्त्रियांच्या फक्त महिला मैत्रिणी व पुरूषांचे फक्त पुरूष मित्र असणेच कसे रितीरिवाजाला धरून आहे, सो कॉल्ड नैतिक वगैरे आहे हे पटवून देण्याचा अट्टाहास दिसला. लग्नानंतर पुरूषांना मैत्रीण व स्त्रियांना मित्र असणे हा विचार आजही नैतिक अनैतिकतेच्या तराजूत मोजला जातो हे दिसले. म्हणजे अजूनही आपण चाकोरीच्या बाहेर पडायला किंवा बघायलाही तयार नसतो हेच दिसते.
कामानिमित्त होणारी जुन्या मित्र- मैत्रिणींची भेट, फेसबुकवरून भेटणारे नवे- जुने मित्र- मैत्रिणी किंवा हल्ली सुरू झालेल्या शाळकरी दहावी-बारावीच्या मुला- मुलींचे तयार होणारे व्हॉट्सऍप ग्रुप उदाहरणार्थ बघता येतील. अल्लड, अजाणत्या वयात कधीतरी गावातील, गल्लीतील, अपार्टमेंटमधील किंवा वर्गातील एखादा मुलगा किंवा मुलगी आवडून गेलेली असते. वयाच्या त्या टप्प्यावर घडणारी अगदीच स्वाभाविक अशी ही भावनिक क्रिया असते. परंतु, पुन्हा कुठं तरी भेटल्यावर तेच फिलींग मनात आले तरी आपण काही लगेच सुरू असणारे लग्न संबंध तोडून जुनी आवड, नाते म्हणून स्वीकारणार नसतो ना? अनेकदा जे आपण आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला सांगू शकत नाही तेच अगदी सहजपणे आपल्या मैत्रिणीला किंवा मित्राला सांगू शकतो.
म्हणूनच आपल्या जोडीदारासमोर आपल्या मित्र- मैत्रिणींना भेटता आलं पाहिजे. हक्काने सुख- दुःखात सामील होता आलं पाहिजे आणि टाळी देत चेष्टा मस्करी करता आली पाहिजे. हाच तर मैत्रीचा खरा चेहरा असतो. जिथे स्त्री- पुरूष हा भेद गळून फक्त मैत्र परावर्तित होत असतं. जे बहुतांशी भावनिक असतं. त्यात नात्याला शारीरिक पातळीवर पोहोचविण्याची कोणतीही धडपड, अट्टाहास नसतो.इतर नाती व मैत्री यांची सरमिसळ करतो. नेमकी इथेच आपली गल्लत होते.
विचारायचं, सांगायचं व बोलायचं तर खूप असतं. पण पुन्हा मनात नैतिक अनैतिकतेचा तराजू दोलायमान होत राहतो. लग्नानंतर आता मैत्री ठेवणं योग्य होईल का? आपला नवरा काय म्हणेल? सासू-सासऱ्यांन आवडेल का? बायकोला पटेल का? मुलांना काय वाटेल? मित्र चेष्टा करतील का? किंवा मैत्रिणी नावं ठेवतील का? समाजात बदनामी होईल का? असे भारंभार प्रश्न डोक्यात भिरभिरायला लागतात. आपल्या मनाच्या तळाशी फक्त आणि फक्त “क्यामकहेंगेमलोग?’ ही एकच चिंता सतावत असते. वयाचे मध्यांतर होत असताना भेटणाऱ्या जुन्या मित्र- मैत्रिणी मनाला सुखद गारवा देणाऱ्या असतात. ते काही लगेच आपल्या संसारात घुसणार नसतात.
पण नेमकं हेच समजून घ्यायला आपण कमी पडतो.अशा मैत्रीवरून नवा वाद निर्माण होणारच नाही असं मी म्हणत नाही. नवरा- बायकोचं नातं आणि मैत्र यातली अव्यक्त सीमारेषा मात्र आपण ओलांडता कामा नये. नात्यात सोबतीबरोबरच जबाबदारीही असते, तशी मैत्रीत ती तितकीशी नसते. तिथे फक्त सोबत असण्याचे फिलींग असते. ज्यात नैतिक की अनैतिक हा मुद्दाच नसतो. एकमेकांशी सुख- दुःखाची, बालपणाच्या आठवणींची चर्चा व कटू- गोड प्रसंगात एकमेकांना सामावून घेणं हेच तर मैत्र असतं. तोपर्यंत आपली मैत्रीची व्याख्या शुद्धच राहणार आणि ती तशीच ठेवण्यात आपणही कुठं कमी पडता कामा नये. मैत्र हे कोणतंही असो, ते विश्वासार्हतेच्या कुंपणात ठेवता आलं पाहिजे. जुन्या मैत्रीच्या आड आपल्या जोडीदाराची फसवणूक करत असू तर ती अनैतिकता ठरेल. आणि मग अशा मैत्रीला नाक मुरडणाऱ्या किंवा बदनाम ठरविणाऱ्यांचा मुद्दा खरा सिद्ध होणारच.
The post रिलेशन डॉट कॉम…. appeared first on Dainik Prabhat.